Thursday, July 29, 2010
साम्राज्ञी
मान तू! शान तू!
मम जीवनाचा अभिमान तू!
उत्कट तू! प्रकट तू!
मम हृदयीचे स्थान बिकट तू!
लावण्य तू! मानव्य तू!
मम जीवनाचे सौंदर्य तू!
फूल तू! मूल तू!
मम श्वासांची चाहूल तू!
आकार तू! साकार तू!
मम जीवनाचा विचार तू!
शितल तू! नितल तू!
मम हृदयीचे कमल तू!
तूच तू! तुझीच तू!
मम जीवनीची साम्राज्ञी तू!
हिमांशु डबीर
०७-जून-२०१०
Monday, September 21, 2009
श्रीदेवी!
नाही नाही मंडळी मी "नवरात्री"बद्दल बोलत नाही! खरतर मी १९-०९-२००९ च्या 'दस का दम' या कार्यक्रमाबद्दल बोलतोय! श्रीदेवी हि माझी लाडकी अभिनेत्री या कार्यक्रमात आली होती! कित्येक वर्षांनंतर तिचे दर्शन घडत होते! तिला पहायला हे दोन डोळे अपूरे पडत होते! आजही ती तितकीच सुंदर दिसते! २ मुलींची आई आहे यावर अविश्वास वाटावा इतकी ती "गोड" दिसते आजही! भराभर तिचे चित्रपट, तिची गोळा केलेली छायाचित्रे, आणि कोणी तिच्याबद्दल चांगले बोलले नाही कि त्याची केलेली "धुलाई" सगळ्या गोष्टी आठवल्या! "सदमा", "मि.इंडिया", "चांदनी", "चालबाज", "लम्हे", "नगिना", "खुदा गवाह" हे तिचे अफलातून चित्रपट! प्रत्येक भूमिका वेगळी आणि तितकीच प्रभावशाली! साक्षात अमिताभ बच्चन जिथे केवळ स्वतःच्या नावावर संपूर्ण चित्रपट तारून नेत होता, तिथे "श्रीदेवी" हि एकमेव हिरॉईन असावी जी केवळ स्वतःच्या नावावर चित्रपट यशस्वी करत होती! "चांदनी", "लम्हे" जणू काही तिच्याचसाठी बनले होते! तिच्यासोबत काम करायला मिळावे म्हणून शाहरूख खानने "आर्मी" या चित्रपटात एक छोटीशी भूमिका केली होती, यावरून तिची लोकप्रियता कळून येते!
मला आठवते, ११-१२वी मधे असेन मी, आमच्या कॉलेजमधे एक मुलगी होती, ती मुलगी या "श्रीदेवी"ची "कर्मठ" "चाहती" होती! तिच्या घरी गेलो होतो तेव्हा तिच्या या "वेडा"ची जाणीव झाली आम्हा मित्र-मंडळींना! जे श्रीदेवी करेल ते सगळे तसेच्या तसे हि करायची! कॉलेजमधे गॅदरिंगला डान्स बसवायचा तर तोही श्रीदेवीच्या गाण्यावरच! अर्थात "श्रीदेवी"चे "वेड" जगणारे काही कमी नव्हते आमच्यात! आमचा आख्खाच्या आख्खा कंपू "श्री"वेडा होता! काय तर म्हणे पानशेत धरण परिसरात शूटिंग चालू आहे, आणि त्यात "श्री" आहे! मग काय आम्ही सगळे सायकलवर पानशेतला! शूटिंग वगैरे काही नव्हते, अफवा होती ती! पण आमचा १०-१२ जणांचा कंपू सुटला पानशेतच्या दिशेने! आजही हि गोष्ट घरच्यांना माहित नाहि (आता माहित होईल)! घरी येईपर्यंत वाट लागली होती पायांची, दोन दिवस कुणीच कॉलेजला गेले नाहि!
प्रत्येकी थोडे थोडे पैसे काढून आम्ही "फिल्मफेअर" वगैरे विकत घेवून त्यातिल "श्री"चे फोटो गोळा करायचो! ते नीटपणे एका वहीत चिकटवून ठेवायचो! कित्येक वेळातर वर्तमानपत्रांतून येणा-या तिच्या चित्रपटांच्या जाहिराती मिळवण्याकरिता आम्ही रद्दीवाल्याशीसुद्धा हुज्जत घातली आहे! वर्तमानपत्राचा कागद लवकर खराब होतो म्हणून मग मेणबत्तीच्या मेणाने त्या जाहिरातीची कॉपी वहिच्या कागदावर उमटवायची आणि त्या कॉपीबरोबर ती जाहिरातही वहिला चिकटवून ठेवायची! काय वाट्टेल ते करायचो! "श्री"चा एखादा फोटो रस्त्यात पडलेला दिसला तर आम्ही तो उचलूनही घेतला आहे कितीतरी वेळा! आणि एकदा असाच उकिरडा फुंकत असताना, एका मित्राच्या आईने पाहिले आणि तिच्याकडून चांगला चोपपण खाल्ला आहे! पण आम्हीपण बिलंदर त्यानंतर त्या काकूंना आम्ही २ वर्षे कुणाही मित्राच्या घरी जाऊ दिले नाहि!(हो ना! उगाच नंतर प्रत्येक मित्राच्या आईकडून मार खावा लागला असता!)
दस का दम या कार्यक्रमात तिला पाहताना जाणवली ति तिची उत्कटता! प्रश्नाचे उत्तर पाहताना तिच्या चेहर्यावरचे बदलणारे हावभाव! तिला हळूच "मुह बंद रखो" असे समजवणारा तिचा नवरा बॉनी कपूर! हे सगळेच अफलातून होते!
जसे जसे "श्री"चे दर्शन कमी होत गेले तसे तसे मग तिचे "वेड" पण ओसरू लागले! आम्हीपण वयाने मोठे होऊ लागलो होतो! कितीहि मोठी उडी मारली तरी आपण चंद्राला नाही हात लावू शकणार हे कळायला लागले! मग मित्रपरिवार विरळ झाला, जो तो आपापल्या "करिअर"च्या मागे लागला! त्या वह्या ज्यात "श्री"चे फोटो होते, काळाच्या ओघात कुणाकडे गेल्या हेही आता नाहि आठवत! इतकच काय, पण आता ०८/०९/१०/११/१२वी मधे जे मित्र होते त्यांच्याशी असलेला संपर्कही फार पातळ झाला! पण आमच्या मनांत "श्री"ची जागा घेणारी एकही हिरॉईन आली नाही!
जेव्हा "दस का दम" पाहिले, तेव्हा या सगळ्या गोष्टी परत आठवल्या! या कार्यक्रमातील तिची छबी केवळ डोळ्यातच नाहि तर लॅपटॉपवरपण साठवून ठेवली! लॅपटॉपवरचा साधा वॉलपेपर बदलून तिचाच फोटो लावला! आणि मनापासून म्हटले, " 'श्री' वी मिस यू!!!"
हिमांशु डबीर
२१-सप्टेंबर-२००९
Saturday, September 5, 2009
दान
परवा वर्तमानपत्रांतून बातम्या वाचल्या, मिरज गावात उभारलेल्या "अफजल वधाच्या" देखाव्यांवरून म्हणे आपले मुसलमान बांधव पेटून उठले! दगडफेक, जाळपोळ, मारामार्या, दंगल यांसारख्या मग 'सोयीस्कर' आणि नित्यनेमाच्या गोष्टी कशा अगदी निरलसपणे पार पडल्या! शूरवीर पोलिसांनी मग अश्रूधूराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवण्याचे काम किरकोळीत केले! आपल्या देशात असे राजरोसपणे चालू असते मग का लक्ष द्या या गोष्टीकडे? पण नाही, हिच प्रवृत्ती घातक ठरत आहे आपल्याला! आपले अलिप्त राहणे हे आजच्या समाजकारण्यांचे आणि राजकारण्यांचे बालेकिल्ले बनले आहेत! त्यांना जाब विचारणे तर दूर, त्यांच्यामागे आपण आंधळ्यासारखे चालत राहतो! आणि काळ सोकावतो!
शिवरायांनी स्वराज्य उभारले ते काही 'हिंदू' राज्य म्हणून नाही, तर एक "हिंदवी स्वराज्य" म्हणून! केवळ "हिंदूंचा" राजा म्हणवून घ्यायला नाहि तर पीडित समाजाला न्याय मिळवून द्यायला आणि अन्याया विरुध्द आवाज उठवून प्रसंगी छातीठोकपणे आपल्या हक्कासाठी लढायला शिकवले त्यांनी! आणि यांच प्रयत्नांतून स्वराज्य निर्माण झाले! राजांनी अफजलचा वध केला, हत्या नाही! हत्या आणि वध या दोहोंत फार मोठा फरक आहे! सुरत जेव्हा शिवरायांनी लुटली तेव्हा इनायतखानाने त्यांच्या शिबिरात आपला माणूस पाठवला तो शिवरायांची हत्या करायला, वध करायला नव्हे! अफजल मारला गेला तो उघड उघड भेटीत! त्याच्या कपटाला राजांनी "जशास तसे" उत्तर दिले! पण राजांनी अफजलचा वध केला तो काही तो मुसलमान होता म्हणून नाही तर तो त्यावेळी समाजाला घातक होता म्हणून! त्याने देवळे तोडली, माणसे बाटवली, स्त्री नासवली, त्या नरधमास रोखणे आणि पर्यायाने त्याचा वध करणे अनिवार्य होते म्हणून!
कुठला धर्म शिकवतो कि दुसर्या धर्माचा माणसाला जगण्याचा अधिकार नाही म्हणून? त्यांचा खातमा करा म्हणून कोणता धर्म सांगतो? मला तरी नाहि वाटत कुठला धर्म असे सांगत असेल म्हणून!
तरी आजहि आपल्या देशात त्या अफजलच्या थडग्याची नित्यनेमाने पूजा होते! आपल्या देशाचा पंतप्रधान बेंबीच्या देठापासून कोकालून सांगतो, कि या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे म्हणून! का हा देश हिंदुचा नाही??? सर्वांना समान अधिकार असायलाच हवा ना! हिंदु म्हणून जन्मलो हा काय गुन्हा झाला का?
आणि एवढे सगळे असूनही माझा मुसलमान बांधव ओरडतोच आहे अजुन सुविधा द्या म्हणून! आणि आपले राजकारणीसुद्धा त्यांचे लांगुलचालन करत आहेत! दिले होते ना ५५ कोटी, मग का नाहि गेलात त्या देशात? आता राहिला आहात ना भारतात तर भारतीय म्हणून जगा! जरा काही खुट्ट झाले कि लगेच उठले हे मारायला, का तर म्हणे यांचा इस्लाम खतर्यात आहे! अरे माझ्या बांधवांनो, तुमचा इस्लाम का एवढा कमकुवत आहे का? तुमच्या धर्मात सहिष्णूता नाही का? तुमच्याच एका महान संताने १९व्या शतकाच्या सुरवातीला सांगितले होते ते विसरलात का? त्या महान संताचे नाव होते "मेहताबशा"! काय म्हणाले होते ते? ते म्हणाले होते, "सामान देउळ, मशिदिचे| एकची आहे साचे| आकाराने भिन्नत्व त्याचे| मानून भांडू नये हो!" पुढे ते काय म्हणतात, "खुळे देउळ मशिदीची| तुम्ही नका वाढवू साची| ती वाढता दोघांची| आहे हानि होणार|" पुढे ते काय म्हणतात ते फार महत्वाचे आहे. ते म्हणतात, "यवन तेवढा खुदाचा| हिंदु काय भुताचा? पोक्त विचार करा याचा| मनुष्यपण टिकवावया!"
माझ्या बांधवांनो, जरा विचार करा, जोपर्यंत आपण असे जाती-धर्मावरून आपसांतच लढत राहू तोवर आपल्याला मुंबई १९९३, मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट मालिका, मुंबई २६/११, दिल्ली बॉम्बस्फोट, आणि या सगळ्यांत शरमेची बाब म्हणजे आपल्या संसदेवर झालेला हल्ला! संसद हल्ल्याच्या आरोपीला आपण अजूनही पोसतो आहोत! कसाब ज्याने सगळ्या जगा समोर आपल्या देशबांधवांना मारले त्याच्यावर आपण इमाने-इतबारे खटला चालवून त्याच्यावर पैसा नाहक खर्च करतच आहोत! आधी आपण सगळे भारतीय आहोत, नंतर आपल्या धर्माचे! हे आपल्याला कधी कळणार!
आज कोणी एक काही तरी बोलतो आणि आपण लगेच लागतो भांडायला! अक्कल गहाण ठेवली आहे का आपण? माणसे आहोत कि जनावरांच्या झुंडी आहोत आपण? निवडणूकांच्या तोंडावर या गोष्टी घडतात, तेव्हा दंगलीमधे दगडफेक करायच्या आधी तुमच्या डोक्यात हा विचारही येत नाहि का, कि आपण हे का करतोय? काही दुसरे विधायक उद्योग नाहीत का आपल्याला? जाळपोळ करायची, देशाची हानी करायची हि कसली रानटीवृत्ती? यापेक्षा देशासाठी तुम्ही काय करणार, आणि नाही केले तर काय हे प्रश्न विचाराना त्या निवडणुकीत मत मागयला आलेल्या उमेदवारांना! ते नाही जमणार!
विचार करा जरा, लोकसभा मतदान झाले त्यात किती मतदान झाले? ५०% पेक्षा कमी! म्हणजे ५०% अधिक जनतेला असे वाटते कि आजचे राजकारणी राज्य चालवायच्या लायकीचे नाही! पण ज्यांनी मतदान केले त्यातून हे आले निवडून! साधी भाजी घेताना आपण पारखून घेतो, तर मग ज्याच्या हाती आपण आपल्या देशाची सत्ता सोपवतो त्यांची पारख आपण काय एक दारूची बाटली आणि एका १०० रुपयांच्या नोटेवर करणार? कधी येणार अक्कल?
मत न देण्याचा अधिकार आहे आपल्याला! बजवावा कि तो! त्याला सुध्दा मोठि किंमत आहे! पण ते नाही जमणार तुम्हाला, कारण मत न देण्याचा अधिकार बजावलात तुम्ही तर तुम्हाला कोणी बाटली नाही देणार, ना कोणी नोट देणार! मग काय तुम्ही नेहेमीप्रमाणे आंधळ्यासारखे मत"दान" करणार! पण मित्रहो, "दान" या शब्दाचा अर्थ काय, परतीची अपेक्षा न करता जे दिले जाते ते "दान"! पण तुम्ही तर या पवित्र शब्दाचा अर्थच बाटवला आहे!
जास्त काय लिहू! सुज्ञांस सांगणे न लगे! या मतदानावेळी जर परत नेहेमी प्रमाणे घडले तर एक गोष्ट नक्की म्हणावीशी वाटेल "जनतेला अक्कल नसते!"
हिमांशु डबीर
०५-सप्टेंबर-२००९
Saturday, August 22, 2009
एकटा
जलांत चिंब भिजताना...
मनांत रितं हसताना...
उरांत रडं दुखताना...
अंगात भिनते एकटेपणं!
खग एकटा फिरताना...
वारा पिसाट घुमताना...
तरू उन्मळून तुटताना...
अंगात भिनते एकटेपणं!
दर्या बेभान उठताना...
तारू दिशा शोधताना...
वारा शिडं तोडताना...
अंगात भिनते एकटेपणं!
बुध्दी विचार करताना...
हृदयांस पीळ पडताना...
काळजांत कळ उठताना...
अंगात भिनते एकटेपणं!
कुणी कुणीच नसताना...
एकटे एकटे असताना...
घर खायला उठताना...
अंगात भिनते एकटेपणं!
सुर्य शांत विझताना...
चंद्र आग ओकताना...
आकाश शून्य होताना...
अंगात भिनते एकटेपणं!
"आई" हाक मारताना...
नजर "बाबा" शोधताना...
प्रतिसाद "तिचा" नसताना...
अंगात भिनते एकटेपणं!
हिमांशु डबीर
२२-ऑगस्ट-२००९
Wednesday, August 12, 2009
इथे प्राणांच्याच निरांजनी होती!
फौज चालून आली थोर,
थोरले महाराज विजापूरी कैद,
ऐसी भवतीनभवती जाली,
राजांनी मग युक्ती मांडली!
फौज मुठभर मिळविली,
पुरंदरावर उडी मारली,
फतेखान जमला गडाखाली,
म्हणे क्षणांत संपवू हि नादानी!
भ्रांत हि त्याची निमिषांत निमाली,
पुरंदरावरूनि धोंडे सुटती,
फौज तयाची सैरभर जाहली,
पळता भुई थोडकी जाहली!
दाती धरून तृणांची माती, म्हणे खान,
"गोष्ट कैसी आगळी घडली...इथे तो गवतालाही भाले फुटती!... इथे तो गवतालाही भाले फुटती!"
होता सजला शामियाना,
जणू रचिला होता सापळा,
सावज होता खान अफजुल्ला,
म्हणे मारितो आज या शिवाला!
भीतिचे ते रचले ढोंग,
वठविले भ्याडाचे सोंग,
प्रत्येक हालचालिची ती नोंद,
ठेवित होते शिवराय!
वेळ भेटीची जमली,
राजासवे माणसे दहा निघाली,
बंडा सय्यद उभा शामियानी,
राजाने मनात शंका धरिली!
शंका राजाची निवाराया,
खाने सय्यद दूर धाडिला,
हात पसरुनि "आओ" म्हणाला,
मनी मात्र हेत आगळा धरिला!
गर्दन डाव्या बगलेला,
दाबून कट्यारीचा वार काढिला,
चिलखताशी वार आडिला,
अन् शिवराये डाव साधिला!
वाघनखे ती चालविता जाला,
कोथळा खानाचा लोंबू लागला,
"दगा... दगा..." खान कोकलला!
परी तयाचा खेळ संपला!
पराक्रमा त्या पाहून "इतिहास" वदला... "येथेच नरातून सिंह घडला...!!येथेच नरातून सिंह घडला...!!"
स्वराज्याचा झंझावात सुटला,
निवेद अफझुल्याचा पचला!
तळ-कोकण कब्जा जाला,
पन्हाळी तो अंमल बसला!
हल्ला विजापुरी आला,
शत्रू दसहजारी जमला,
उघड मैदानी सोहळा सजला!
गोदाजी, नेताजीसह खुद्द शिवाजी रणी उतरला!
रणांगणी तो जोर चढला,
शत्रूचा तो धीर खचला,
सैरावैरा तो पळत सुटला,
थेट विजापूरी जाउन थांबला!
बडी बेगम पुसे अल्लाला..."या खुदा हा कैसा खेळ मांडिला?.. इथे तो हुंकारातून वादळ जन्मला!.. इथे तो हुंकारातून वादळ जन्मला!"
जेर कराया शिवाजीला,
जौहर तो सिद्दी निघाला,
राजा होता पन्हाळ्याला,
म्हणे येथोनिच भांडू जौहराला!
लागला होता पावसाळा
परी सिद्दी जिद्दीला पेटला,
नेटाने तो वेढा चालविला,
राजांनि मग जासूद धाडिला!
निरोपाने त्या कार्यभाग साधिला,
वेढा नकळत गाफिल जाहला!
जौहरास तो ईरादा उमगला,
फौज सुटली पाठलागा!
घोडखिंडीत लढा पेटला,
राजा विशाळगडी निसटला,
बांध खिंडीला पडला,
उभा होता फक्त तीनशे मावळा!
म्होरक्या तो हिरडस मावळाचा,
खडा पहा तो, "बाजी देशपांडा"
होता तो ईरेस पेटला,
म्हणे (शत्रूला) आधी निस्तर मजला,
मगची भेटे राजा तुजला!
सिद्दी बोले ऐकून समाचारा (खिंडीतल्या लढाईचे वृत्त)
"कैशाची हि माणसे बनली!?... इथे तो छातींचेही कोट घडति! इथे तो छातींचेही कोट घडति!"
अफझुल्याच्या लढ्यासमयी, अवघा मावळ एक झाला,
परि त्यातून एक सर्वांतूनि आगळा राहिला,
स्वराज्याचा तो गद्दार पहिला,
नाव तयाचे खंडोजी खोपडा!
म्हणे काय वाचतो हा शिवराया,
मारिल यासे हा खान अफझुल्ला,
परि त्याचा अंदाज चुकला,
खान स्वतःच गर्दिस मिळाला!
खोपडा भय खाउन पळाला,
रोष शिवरायांचा ओढावला!
शरण अखेर येता जाहला,
कन्होजींकरवी शब्द लाविला! (कान्होजी जेधे)
(शिवरायांच्या) नजरेला नजर तो देता जाला,
क्षणात खोपडा पूरता भेदरला,
राजांचा तो हुकूम सुटला,
पाय डावा अन् हात उजवा (याचा) छाटावा!
राजे सखोंबीतसे जेध्यांना
"गद्दाराला माफी कैसी? उद्या ऐसे अनेक जन्मती,
स्वराज्यासी हि किड ऐसी, आम्हास ना खपणारी!
शब्द तुमचा म्हणून जिता सोडिला, नातरी छाटले असते मुंडक्याला!"
जेधे बोलला मनाला, "कैसा जाणता राजा लाभला, केवढा थोर विचार वदला! याचे तो हृदयात अंगार फुलला!...याचे तो हृदयात अंगार फुलला...!!"
मिर्झाराजा चालून आला,
सवे घेउन दिलेरखाना!
पुरंदरासी तो वेढून बैसला,
(जिंकण्याचा) शिकस्त तो थोर चालला!
सफेद बुरुज तो उडविला,
प्राण पुरंदराचा कंठी आला,
फास तो आवळत चालला,
मुरारबाजी कासाविस जाहला!
योजना तो आखता झाला,
म्हणे फोडून जाऊ वेढ्याला!
उघडून किल्ल्याच्या द्वारा,
रणशिंग तो फुंकता जाला!
दिलेर होता हत्ती बैसला,
ओरडून बोले तो मुरारा,
"ये सैन्यात माझ्या, देतो मनसब तुजला!"
झिडकारले त्या अमिषा, पेलला हातात भाला,
जळजळीत नजरेने मुरार बोलला, "घे हि तुझी मनसब तुला!"
खान तो चकित झाला,
तीर (कमानीतून) सोडता जाला,
लक्षून मुराराच्या कंठा
मुरार पडला रणांगणा!
खान होता दिलेर,
बोलता जाहला सत्वर, "ऐसा न शत्रू पाहिला... सलाम तुझ्या शौर्याला!
जैसा पाहता तु मजला...नजर तुझी अंगार होता!...नजर तुझी अंगार होता!"
मिर्झाच्या राजकारणास,
राजा झाला मवाळ,
दिली मान्यता तहास,
निघाला औरंग्याच्या भेटीस!
होता औरंग्याचा वाढदिवस,
जमला होता दरबारास,
म्हणती जयाला "दिवाण-ए-खास"
येथेच भेटला राजा औरंग्यास!
राजा उभारला मनसबेस...
परी पाहून पुढे जयसिंगास,
उसळला तो नरसिंहासमान,
बोले "हा तर उघड अपमान,
नको मजला हि मनसब!"
निघाला राजा तडक,
अर्धा सोडून तो दरबार,
सरदार जाहले स्तंभित,
म्हणती काय हि आगळिक!
औरंग्या राहिला स्वस्थचित्त
परि चित्ती करितसे विचार,
"खरेच हा आहे शूर,
उगा ना पळाला मामा शाइस्त!"
औरंगजेब बोलला खुदासी,
"शुक्र है अल्लाचा, दुश्मन दिया तोभी शिवा जैसा!
याच्या तो वाणीतही विजा गर्जतात! याच्या तो वाणीतही विजा गर्जतात!"
दिवस होता जून सहा
रायगड होता सजला,
सह्याद्रितो आनंदला,
राजा आज "छत्रपति" बनला!
सप्तसरितांचे वारी,
आणविले स्नानासी,
सोहळा मोठा राज्याभिषेकी,
वेद उच्चारती ऋषी-मुनी!
राजा सिंहासनी बसला,
मनात आठवणींचा पूर लोटला,
राजा गहिवरोन गेला,
आठवे तो तानाजीला,
आठवे तो मुरारला!
पुरंदराच्या लढ्यासमयी
पहिलीच उसळली होती गर्दि,
पडली त्यात ज्यांची आहूति
आठवती ते पासलकर बाजी!
आठवला तो शिवा न्हावी,
फसविला ज्याने जौहर सिद्दी!
गेला हसत चालून काळाच्या मुखी
म्हणे राजाचे कार्य नेतो मी सिद्धी!
हृदयी कळ उठली..
आठवता ते प्रभूबाजी
पराक्रमाचे ते मेरूमणी!
एकहाती खिंड अडविली
स्वर्गालाच घातली गवसणी, दिन होता गुरुपौर्णिमी!
दाटला कंठ स्मरता प्रतापरावासी (प्रतापराव गुजर)
म्हणती काय वेडेपणा केलासी!
कैसे चुकवू तुमचे ऋणांसी!
एक-एक पायरी (सिंहासनाची), तुमची आहूति!
सुवासिनी राजाला ओवाळती, घेवून अनेक निरांजनी,
वदला राजा पाहून निरांजनीसी "या तो त्यांच्या प्राणज्योती!! इथे प्राणांच्याच निरांजनी होती... इथे प्राणांच्याच निरांजनी होती...!!"
हिमांशु डबीर
११-ऑगस्ट-२००९
Monday, August 3, 2009
हट्ट
नाही मजला हट्ट त्या बेहोष मोग-याचा,
नाही मजला हट्ट त्या बेधुंद कुंदकळ्यांचा!
परी सांग आता तू हृदयी गुलाब होशील ना? होशील ना?
नाही मजला हट्ट चिंब भिजल्या पावसाचा,
नाही मजला हट्ट रम्य खुलल्या इंद्रधनूचा!
परी सांग आता तू स्पर्शातून मोहरशील ना? मोहरशील ना?
नाही मजला हट्ट गीतांतल्या शब्दांचा,
नाही मजला हट्ट सुरेल त्या मैफिलीचा!
परी सांग आता तू ओठांवरी ओथंबशील ना? ओथंबशील ना?
सोडला बघ राणी हट्ट मी निशिगंधाचा,
सोडला बघ राणी हट्ट मी रातराणीचा!
परी सांग आता तू मिठीतून बहरशील ना? बहरशील ना?
हिमांशु डबीर
०३-ऑगस्ट-२००९
Friday, July 31, 2009
सह्याद्रिचे अभ्यंग-स्नान!
आषाढातल्या त्या कृष्णमेघांनी जणू पृथ्वीला आच्छादून टाकले होते! दिवस-रात्र हे त्या ढगांच्या आडून त्यांची मार्गक्रमणा करत असले तरी या काळ्या-सावळ्या ढगांनी या धरेवरील वातावरण कुंद करून टाकले होते! काहिसे गूढ पण तरीही रम्य असे त्या निसर्गाचे वर्णन करावे अशीच ती अदाकारी होती या निसर्गराजाची! पुरुषभर उंचीचे गवत... गवत कसले ते तर "रान माजले" होते! त्यात गुडघा गुडघा साचलेला चिखल! विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट आणि संगीताचा ताल धरल्याप्रमाणे बरसणा-या जलधारा! वरूणराजाच्या प्रेमाला या वसुंधरेचा प्रतिसाद म्हणून रुद्र-भीषण नाद करत आक्राळविक्राळपणे थेट पाताळात उडी ठोकणारा तो प्रपात! छे... हि तर साधीसुधी कविकल्पना! प्रेमाचा प्रतिसाद कसला हे तर या रांगड्या सह्याद्रिचे "अभ्यंग-स्नान"! याच रांगड्या सह्याद्रितून जन्माला आलेल्या या नद्या, हे ओढे हे कसे मग मागे राहतील! हे सगळे आपल्या वडिलांच्या अभ्यंग-स्नानामधे रित्या होणा-या वरूणराजाच्या जलकुंभातले जल घेवून उफाट्याने धावत सुटले होते! जणू यांना सगळ्यांना आपल्या प्रियकराला... त्या "सागराला" भेटायची घाई झाली होती! काय सांगावा तो आवेग, तो आवेश, तो जल्लोष! तो धडकी भरवणारा आवाज! अनुभव घ्यायचा म्हणजे काही सोपे नाही... हे काय आपले दिवाळीतले आई, ताई, पत्नी यांचे स्नेहार्द्र स्पर्शांचे आणि मधूर आवाजातील गाण्यांचे, त्यांच्या ओवाळणीचे अभ्यंग-स्नान वाटले कि काय? हे या सह्याद्रिचे अभ्यंग-स्नान आहे, जिथे स्नान घालायला साक्षात वरूणदेव येतात! मनसोक्तपणे आपले जलकुंभ त्यांच्या लाडक्या पुत्रावर या सह्याद्रिवर रिते करतात! लहानग्या ओहोळांपासून... मोठाल्या नद्यांपर्यंत! मोराच्या केकारवापासून त्या उन्मत्तपणे कोसळणा-या प्रपातांपर्यंत सगळेजण गाणी गातात! मधूनच साक्षात सूर्यदेव दर्शन देवून इंद्रधनूने या सह्याद्रिला ओवाळतात, अन् हि धरा तिच्या लेकाला अनेकविध वृक्षवल्लींनी मोठ्या मायेने सजवते! काय तो सोहळा! काय तो थाट! सारेच नवल! सारेच शब्दांच्या पलिकडले!
या सह्याद्रिच्या अभ्यंग-स्नानाची खरी मजा लुटायची असेल तर खर सांगतो या सह्याद्रिच्या अंगा-खांद्यावर शिवरायांनी सजविलेल्या गड-किल्ल्यांवर जायला हवे! दुर्गमहर्षी गो. नि. दांडेकर यांनी केलेले रायगडावरील महादरवाजाच्या जवळच्या प्रपाताचे वर्णन जगायला हवे! गोनिदा लिहितात, "..हा गंगासागराचा पाणलोट, तो मात्र बहु आनंददायी आहे. काय आहे, की गंगासागरालाच काही झरे आहेत. गंगासागराचं जलवहनक्षेत्र (कॅचमेंट एरिया) आहे, ते तसं काही फार मोठं आहे असं नाही. पण जे आहे, त्यातूनच गंगासागरात भरपूर पाणी एकत्र होतं. त्या शिवाय जे पाणी, ते तिथून उतरून महाद्वाराच्या शेजारून खाली उडी घेतं. आणि त्याचा हा प्रपात!"
गोनिदा पुढे म्हणतात, "... गंगासागर हे महातीर्थ! सप्त पुण्यसरितांच पाणी राज्याभिषेकानंतर राजांनी त्या तलावात ओतवलं होतं. त्याचा लवलेश शेष तर उरला असेल, की नाही अजून! तर या पुण्यजलाचं ते स्नान इतकं सुखदायी होतं. आपण स्नान करताना मंत्र म्हणतो, 'गंगेच यमुने चैव गोदावरि सरस्वति| नर्मदे सिंधु कावेरी, जलेऽस्मिन् संनिधिं कुरु||' सगळ्या भरतखंडाची विशालभूमी पावन करीत वाहणा-या या नद्या, त्यांचं जळ त्या प्रपाताच्या वाटे आपल्या अंगावर कोसळत असतं, ही कल्पनाच किती आनंददायी आहे!"
गोनिदांनी केलेले या प्रपाताचे वर्णन आता कळसाला येते... स्नान सोहळा आटोपल्यानंतर ते पुढे म्हणतात, "मन म्हणत राहतं, केवढ तुझं दैव! प्रत्यक्ष राजानं ज्या जळानं स्नान करून राज्याभिषेक करून घेतला, त्याच जळांन तूही स्नान केलसं! यापरतं भाग्य म्हणतात, ते असतं तरी काय?"
किती सुंदर हे वर्णन! आता पावसात जेव्हा जाउ रायगडावर तेव्हा रायगड पाहायच्या आधी या प्रपाताखाली स्नान केल्याशिवाय आपण पुढे जाणारच नाही!
असाच एक नितांत सुंदर क्षण मलाही लाभला! तोरण किल्ला! जेव्हा आम्ही तोरण्याच्या पायथ्याला पोचलो तेव्हा तोरणा ढगांच्या शालीखाली दडून बसला होता! त्याच्यासवे लपंडाव खेळत खेळत आम्ही गडाच्या अखेरच्या चढाईला आलो! इथे आपले स्वागत करतो तो एक प्रपात! पुणे दरवाजाच्या बाजून चढाई करताना हा प्रपात आपले डावेबाजूस कोसळत असतो! उंच आहे हा भरपूर आणि ऐन पावसात तर हा खूप मोठा असतो! काय सुंदर चव असते हो या पाण्याला! बिनधास्तपणे प्या! या प्रपाताखाली उभे राहून त्याच्या जोर अनुभवा! कुणीतरी मालिश करत आहे असेच वाटेल तुम्हाला! इथे उभे असताना गोनिदांच्या ओळी मनात रुंजी घालू लागल्या... "राजाने ज्या पाण्याने स्नान केले त्याच पाण्याने तूही स्नान केलेस! केवढे तुझे भाग्य!" मन अलगद शिवरायांच्या काळात गेले! तोरणा किल्ला जिंकून राजांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले. स्वतंत्र राज्याची हि पहिली स्वतंत्र भूमी! आणि मग मन या प्रपाताचा उगम शोधू लागले. आणि वाटले, की कोठी दरवाजाच्या पलिकडे जो एक जलाशय आहे, त्यातूनच तर हा प्रपात उगम पावत असेल! मन मोहरले, शरीर शहारले! स्वतंत्र भूमीवर पाउल ठेवून राजाने जिथले पाणी प्यायले, त्याच जलाशयातले पाणी पिण्याचे सुख मला मिळाले! गोनिदांच्या प्रेरणेने सुचलेली हि संकल्पना! मग या प्रपाताला मागे ठेवून आम्ही किल्ल्यावर पोहोचलो! चिणला दरवाजा, भगत दरवाजा यांना परत एकदा डोळे भरुन पाहिल्यावर माझ्या सगळ्यात लाडक्या "झुंजार माची"वर आलो! अंगात रग असेल आणि काळजात हिंमत असेल तरच भर पावसात झुंजार माचीवर जा! जेव्हा "तोरणा किल्ला" काय आहे हे कळण्याचे वय नव्हते तेव्हा पासून मी या किल्लावर जातो आहे! दरवेळेस "झुंजार" मला बोलावतेच! झुंजार माचीच्या टोकावर राजगडाकडे तोंडकरून उभा राहिलो, राजगड दिसत नव्हताच, पण बदाबदा कोसळणारा पाऊस, तोरण्याच्या अंगा-खांद्यावरुन उड्या मारणारे असंख्य छोटे-मोठे प्रपात! हा सह्याद्रिचा अभ्यंग-स्नानाचा सोहळा मी स्वतः साक्षात अभ्यंग-स्नान करत पाहत होतो! त्या झुंजार माचीच्या सर्वोच्य ठिकाणी मला दिसणारा आसमंत नजरेचे पारणे फेडणारा होता! सरळसोट सुटलेले ते सह्यकडे... जिथून खालच्या वेल्हा गावापेक्षा स्वर्ग जवळ वाटावा! मागे बेलाग आणि भक्कमपणे उभा असलेला खुद्द तोरणा! असा तो सगळा सोहळा! पापणी जराही लवत नव्हती... तेव्हा आजच्या सारखे "डिजिटल कॅमेरे" नव्हते आणि ना माझ्याकडे कुठला साधा कॅमेरा होता... त्यामुळे हा सगळा अभ्यंग-सोहळा मी आधाशा सारखा माझ्या नजरेत साठवून ठेवत होतो! जणु समाधी लागली होती माझी! त्या पवित्र सोहळ्याचा एक छोटासा साक्षीदार होतो याचा मला आजहि अभिमान आहे!
हिमांशु डबीर
३१-जुलै-२००९