Thursday, May 28, 2009

स्वप्नांची मौने

स्वप्नांची मौने
ती:

तू म्हणतोस मला पाहताना शब्द वाक्यांना मिठी मारून बसतात अन् वाक्ये नजरेतून बोलू लागतात!
शब्दांचे महत्वच तू असे खोडून काढतोस,
सांग ना एकदा तरी मला, तू तरी शब्दांशीच का असा खेळतोस?

तो:

शब्द म्हणजे काय ग, एकत्र जोडली निरर्थक अक्षरे,
त्यांना आपण जोडली ती हवीती अर्थांतरे,
आपण म्हणू तीच त्यांची भाषांतरे,
मनाच्या खोलात रुजलेली, ती तर स्वप्नांची मौने,
नजरेतून जो संवाद चाले, सांग तो का शब्दांसाठी लाचारे???!!!

ती:

तू म्हणतोस, शब्द म्हणजे एकत्र जोडली निरर्थक अक्षरे,
शब्दांच्या अस्तित्वालाच तू एक शून्य करून ठेवतोस,
सांग ना एकदा मला, तरी तू मौनपणे असे शब्द का रंगवतोस??

तो:

शब्द म्हणजे काय ग, भावनांना जोडली रेशीम उपरणे,
सुंदरशा स्त्रीने ल्यालेली नक्षीदार आभूषणे,
नभी सजलेले ते नक्षत्रांचे देणे,
मनाच्या गाभा-यातील नंदादीप तेवणे,
जिथे जुळली मने, तिथे सांग कोण गातो या शब्दांचे तराणे??!!


ती:

अच्छा, म्हणजे शब्द तुझे, प्रेमाचे बहाणे!
शब्द म्हणजे, तुझे मला रिझवणे!
शब्द म्हणजे, तुझे मला सजविणे!
शब्द म्हणजे, तू मला कवितेत पहाणे!
शब्द म्हणजे, तू मला भुलवणे!
शब्द म्हणजे, तू सगळे नि:शब्दपणे सांगणे!
शब्द म्हणजे, मी तुला भान हरपून ऐकणे!!!


हिमांशु डबीर

बायको, हे फक्त तुझ्यासाठी...

माझ्या पत्नीला - निकिताला, माझ्या मिठीत जेव्हा जेव्हा पाहतो, तेव्हा तेव्हा मला असेच वाटते!!!
जेव्हा ती आता भारतात अन् मी अमेरिकेत आहे, तेव्हा तिची ओढ जास्त जाणवते!
-------------------------

तुला पाहताना शब्द वाक्यांना मिठी मारुन बसतात,
अन् वाक्ये नजरेतून बोलू लागतात,
तू माझी होताना, शब्द मिठीतच विरघळतात,
मिठी ती किती हळवी, शब्द त्यातही गुदमरतात,
तुझ्यामाझ्या प्रेमाचे क्षण, नित्यनविन अलंकार लेवून,
शब्दही त्यांचे सोहळे साजरे करतात!


हिमांशु डबीर

Tuesday, May 26, 2009

चंचला

चंचला

चिंब भिजल्या जलधारांसम,
मी ज्वलंत बुलंद आहे!
देवा-धर्माच्या नास्तिकांनो,
वीज ती, माझा हुंकार आहे!


गरजणा-या मनस्वी मेघांसम,
मी भीषण भयाण आहे!
उलट्या काळजाच्या मानवी पशूंनो,
मनस्वीता ती, माझी धमनी आहे!


कडाडणा-या त्या चारूतेसम,
मी प्रताप रुद्र आहे!
कलीयुगाच्या पुजा-यांनो,
चारुता ती, माझा श्वास आहे!


काळ्या नभातील चंचलेसम,
मी रौद्र-क्रुद्ध आहे!
सावध असा षंढांनो,
चंचला ती, माझी सखी आहे!


हिमांशु डबीर

२६ मे २००९

Monday, May 25, 2009

प्रतिबिम्ब

प्रतिबिम्ब

दिवस कसाही सरतो,
रात्र काही सरत नाही,
डोळ्यांत आसवेच फक्त,
झोप काही येत नाही!


उजेड नकळत संपतो,
भयाण काळोख कळत नाही,
लखलखाट दिव्यांचा शहरी,
उरीचे तेज दिसत नाही!

पसारा उरकतो सतत,
मला मीच सापडत नाही,
हात हवेतच हिंदोळतो,
स्पर्श तुझा लाभत नाही!


कामाच्या ढिगात गुंफतो,
विरंगुळा काही उरला नाही,
डोळ्यांत शीण साचतो,
तव दिलासा मिळत नाही!


सवयीचे झाले म्हणतो,
सवय काही होत नाही,
रोज सकाळी आता,
मीच मला ओळखत नाही!


हिमांशु डबीर
०५ मे २००९

Saturday, March 28, 2009

संकल्प

संकल्प


ठरविलेच आहे मी, तुझ्या प्रत्येक श्वासात गुदमरायचे,

उर भरून श्वास घेऊन... परत नव्याने जगायचे!

प्रत्येक श्वासात तुझ्या, माझे अस्तित्व विसरायचे...


ठरविलेच आहे मी, तुझ्या प्रत्येक मिठीत रुतायचे,

पाठीमध्ये रूतल्या बोटांना अलगद सोडवायचे!

प्रत्येक मिठीत तुझ्या, माझे सर्वस्व अर्पायचे!


ठरविलेच आहे मी, तुझ्यावर फक्त प्रेम करायचे,

रोज उठून तुझ्या परत प्रेमात पडायचे!

प्रेमामधे तुझ्या, आपले विश्व थाटायचे!


हिमांशु डबीर

Wednesday, March 25, 2009

सेवानिवृत्ती

आमचे बाबा रिटायर होवून आता जवळपास २.५ वर्षे होतील. या सेवानिवृत्तीनंतर काय यावर त्यांनी काही दिवसांपूर्वी एक छोटासा लेख लिहीला आहे. त्यांच्या परवानगीने हा लेख मी माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध करत आहे.
जवळ जवळ ३२ वर्षे त्यांनी स्टेट बँकेत काढली. ब्रँच मॅनेजर म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांना 'सेवानिवृत्ती'बद्दल जे वाटते ते त्यानी या लेखात लिहीले आहे.
हिमांशु
----------------------------------------------------

सेवानिवृत्ती झाली - पुढे काय?

आयुष्याची पाने उलटली,
सेवानिवृत्ती देखील झाली,
संसाराची कर्तव्ये संपली,
वृत्तीदेखील निमाली,
अन् 'निवृत्तीची' सुरुवात झाली!!!

प्रत्येक व्यक्तीची ओळख समाजात दोन गोष्टींमुळे होते. जन्मानंतरचे चिकटलेले नावाचे लेबल अन् नोकरी / व्यवसायाचे लेबल. दोन्ही गोष्टीची सुरुवात एका ध्येयाने होत असते, पाट्या टाकण्यासाठी कोणीच जन्म घेत नाही की नोकरी व्यवसाय करत नाही.

जन्मतः 'स्व'चा शोध घेण्याचे अन् त्या परमेश्वरात विलीन होण्याचे ध्येय असते. नोकरी, व्यवसाय सुखाने चरितार्थ चालविण्याचे ध्येय. ध्येयाचा प्रवास सतत सुरु असतो. ध्येय म्हटले की मर्यादा आली. 'स्व'चा शोध घेण्यासाठी आयुष्य ही मर्यादा अन् नोकरीसाठी सर्वसाधारणपणे वय वर्ष साठीची. तीस वर्षांपेक्षा अधिक नोकरीत एकाच ध्येयाने धावल्यानंतर जो एक मुक्कामाचा पडाव येतो, तो 'सेवानिवृत्तीचा'! काही क्षणाची उसंत, पुढच्या प्रवासाची तयारी, एक सिंहावलोकन करण्याचा टप्पा.

एक सिंहावलोकन - आयुष्याची अन् उमेदीची, तीस वर्षांपेक्षा अधिक व्यस्ततेत घालविलेला काळ! नोकरी अन् संसारात झालेली तारेवरची कसरत. एका वर्तुळासारखा झालेला हा प्रवास - कधी परिघावरून तर कधी केंद्रबिंदू. ही धडपड म्हणजेच जिवंतपणाचे लक्षण मानायचे, कर्ता-करविता असल्याचा भास निर्माण करायचा. जबाबदारी, कर्तव्य यांची सांगड घालता घालता लक्षात येते की लग्नानंतर सुरुवातीला दोघे होते, तेच आता देखील आहेत. मुलांचे शिक्षण पूर्ण होवून ती नोकरीला लागली आहेत. पंखात बळ घेवून गगनभरारी घेत आहेत अन् साथीदाराबरोबर घरट्यात रमली आहेत. प्रगतिचा आलेख खूप उंचावलेला असतो. कर्ता-करविता कोणी वेगळाच आहे, हे जाणवत असते, पण त्याचा प्रयत्नपूर्वक विसर पडलेला असतो. तीस वर्षांपेक्षा जास्त उमेदीचा काळ ज्या ठिकाणी घालवलेला असतो, त्याच ठिकाणी नारळ अन् शाल याचा स्वीकार करावा लागतो. त्याचक्षणी भान ठेवून संसारातून मानाचे श्रीफळ अन् मायेची उबदार शाल मनापासून आनंदाने स्वीकारायची असते. ख-या अर्थाने 'सेवानिवृत्त' होवून 'निवृत्ती' स्वीकारायची असते.

सेवानिवृत्तीने वयाची जाणीव करुन दिलेली असते, शरीर कुरकुरायला लागते. बुद्धी अन् मनाचे विचार काय कमावले आणि काय गमावले याचा ताळेबंद मांडत असतात. काय काय करायचे राहिले याचा विचार सुरु होतो. सप्तसुरांचे संगीत मनाला भुरळ पाडते. पु.ल., गदिमा, कुसुमाग्रज... सारे जवळचे वाटायला लागतात. आमटे कुटुंबियांचे उत्तुंग ध्येय अन् त्यागाने भारावून गेल्यासारखे होते. आगगाडीचे रुळ मृगजळाच्यामागे धावायला लागतात. विपुल संतसाहित्यात कुठून प्रवेश करायचा याचा अंदाजच येत नाही. 'सत्संग' अन् 'आस्था' यासारखे कार्यक्रम गोंधळात भर घालतात. प्राणायाम आणि योगाचे वर्ग शरीरस्वास्थ्यासाठी बोलावत असतात. थोडक्यात काय तर सेवानिवृत्तीनंतर काय हा प्रश्न तसाच राहतो आणि त्याचे उत्तर शोधण्याचा हा एक प्रयत्न!

सेवानिवृत्तीनंतर खरतर आयुष्यातला एक नविन टप्पा, नविन मार्ग, 'स्व'चा शोध घेण्याचा श्री गणेशा! सुरुवात अशी की जी सहज असावी, आनंद देणारी अन् आनंद घेणारी असावी. 'हृदयातून' अन् हृदयाच्या प्रत्येक 'स्पंदना'तून असावी. जगण्याची उर्मी असावी, जगण्याची स्फुर्ती असावी. खरतर ही एक नविन ओळख असते, स्वतःची स्वतःशी झालेली! तीस-चाळीस वर्षांच्या 'वृत्ती'तून म्हणजे राग, लोभ, द्वेष, मत्सर, अहंकार, सुख-दु:ख यातून बाहेर पडण्याची वेळ. 'सेवानिवृत्ती' स्वीकारायची, 'वृत्ती' सोडायची, पण निवृत्त व्हायचे नाही. आयुष्याच्या दैवी देणगीतून निवृत्त व्हायचे नाही. ज्या ज्या वेळेला जे जे होईल, ते ते स्वीकारत जायचे, अगदी सहजतेने अन् आनंदाने.

याची सुरुवात दोन फुलस्केप पेपर्सपासून करायची, एका पेपरवर क्लेशदायक घटना, दु:खद क्षण - अगदी थेट लहानपणापासून. आई-वडिलांचे धपाटे, मास्तरांची पट्टी, प्रतिसादाला साद न देणारी कॉलेजकन्या! नोकरीतील तारस्वरातील मैफल, आठवणीतील अशा अनेक गोष्टी या कागदावर उतरवून काढायच्या.

दुस-या पेपरवर आनंददयी घटनांची साखळी जोडायची. उंच उडवलेला पतंग, सायकल चालविता येण्याचा क्षण - ज्या ज्या छोट्या गोष्टीतून आनंद दिला, बघितला, घेतला सारे क्षण टिपायचे. एका क्षणाचे वजन काकणभर जास्त होते. मन आनंदाने भरून जाते. दिसतो, जाणवतो तो फक्त आनंदच आनंद!

दु:ख देणा-या गोष्टींची परत परत उजळणी करायची. अन् तो कागद चक्क फाडून फेकून द्यायचा. त्या दु:खद आठवणी मनाच्या मुळापासून उपटून टाकायच्या. स्मृतीतून हद्दपार करायच्या, परत त्यांची आठवण न काढण्यासाठी. मग राहतात त्या फक्त दुस-या कागदावरील आनंददायी घटना! चुकून काही दु:खद प्रसंग, घटना घडल्या तरी आनंददायी घटनांची उजळणी करायची. मग जी प्रक्रिया सुरू होते ती शुद्धिकरणाची - मनाच्या शुद्धतेची पहिली पायरी!

मग मनाची झेप फक्त आनंददायी क्षणांपर्यंतच जाते. आनंददायी क्षण हृदयाकडे प्रवाहित होतात आणि मन आपोआप हृदयात विरून जाते. बुद्धि हा सारा खेळ चौकसपणे बघत असते. बघता बघता सा-या कसोट्या पार करीत नकळत बुद्धिदेखील त्यात प्रवाही होते. मेंदूची तल्लखता अधिकच वाढते. आनंदाच्या या लहरी शरीरभर प्रवाहित होतात. नित्यनविन श्वासासारखी अन् हृदयाच्या स्पंदनाप्रमाणे आनंद देणारी, जिवंतपणाची जाणीव करून देणारी अन् म्हणूनच हृदयाच्या स्पंदनातून जगण्याची एक लय गवसते!

हृदयाचे 'स्पंदन' हीच खरी ओळख. देहाला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणे आणि जिवंतपणा जपणे, हे कर्तव्य हृदय सतत, सहजपणे अन् आनंदाने करत असते. खरतर प्राणवायू अगदी सूक्ष्म स्वरूपात लागतो, पण तो सतत लागतो. स्पंदनातून रक्त शुद्ध करण्यासाठी अन् यातून शरीरभर प्राणाचा, चैतन्याचा, तेजाचा, अगदी परमेश्वराचादेखील संचार होण्यापुरता! प्राण, चैतन्य, तेज... ज्याला जसे भावते, तसे नाव दिले जाते. या क्रियेतून हृदय सा-या देहाला आनंद देते आणि त्याच आनंदात आनंदून जाते. खरतर या क्रियेला देहातील, मेंदूतील कुठलीही शक्ति उपयोगी पडत नाही. आनंद देणारा अन् घेणारा, स्पंदनातून जाणवणारा श्वासच! मन, बुद्धी डोळ्यांना दिसत नाही किंवा कुठल्याही अवयवाप्रमाणे दाखवता येत नाही. पण हृदय दाखवता येते... हृदयाचे स्पंदन जाणवते, अगदी आनंदाच्या कारंज्याप्रमाणे नाचणारे, बागडणारे! स्पंदनातून श्वास पुरवण्याचे, देहात अन् देहाबाहेरील विश्वाला श्वास पुरवणा-याचे आभार मानीत त्या विश्व-निर्मात्या परमेश्वराचा जप हृदय सतत करीत असते. इथेच हृदय, 'स्व'चा शोध करीत आनंदाने 'स्व'त विलीन होण्याची प्रक्रिया सुरू होते, स्पंदनातून परमेश्वरात विलीन होण्याचा मार्ग गवसतो!

या आनंदाचा शोध घेत मार्गस्थ होणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य बाकी राहते. श्वासाचा प्रवाह, स्पंदनाचे संगीत ऐकत बुद्धीला आणि मनाला त्या प्रवाहात विसर्जीत करणे हाच काय तो प्रवास चालू राहतो. स्पंदनाचा आवाज तोच खरा 'स्व'चा 'स्व'शी झालेला 'संवाद'! ज्याला भावेल तसा तो 'आतला आवाज'! अगदी अनंत स्वरूपात अन् अनंत नामात! आपापल्यापरीने या आनंदाचा शोध घेणे हाच निवृत्तीनंतरचा मार्ग! एकदा का हा आनंदाचा ठेवा सापडला की निवृत्तीचा अर्थ उमगायला लागतो. मग बाकी व्यावहारीक, पारमार्थिक गोष्टी अगदी आपोआप, सहजपणे घडायला लागतात. अगदी स्पंदनातून विश्व-निर्मात्यात विलीन होत आपण निवृत्त होतो.

हृदयातून जीवनाचा आनंद देणे,

हृदयातून जीवनाचा आनंद घेणे,

स्वतःचा स्वतःशी 'संवाद' साधणे

हेच खरे 'निवृत्ती'नंतरचे जगणे!!!!!

यशवंत हरी डबीर
पुणे

Sunday, March 22, 2009

एका वाल्याची "नविन" गोष्ट

सध्या देव काय करतोय? कधी प्रश्न पडला का हा तुम्हाला? मला कालच पडला, तसा या प्रश्नाला काही अर्थ नाही, खूप थोर लोक याचे उत्तर एका मिनिटात देतील. हे जग हा परमेश्वर चालवतो, हा वारा त्याच्या आज्ञेने वाहतो, आपण त्याच्याचमुळे जगतो, आपली सगळी कार्ये त्या परमेश्वरच्या प्रेरणेने होत असतात! आपले आयुष्य आपण कसे जगणार आहोत हेसुद्धा त्याने आधीच लिहून ठेवलेले आहे, आपण फक्त ते त्याप्रमाणे जगतो. मग प्रश्न पडतो, की जर माझे आयुष्य या देवाने लिहिले आहे, माझे म्हणजे आपल्यासकट सर्व प्राणीमात्रांचे आयुष्य याने लिहून ठेवलेले आहे. कुठल्या क्षणी कुठे काय होणार याचे गणित त्याने आधीच मांडून आणि सोडवून ठेवलेले आहे. जे काही आपण करतो, ते सगळे आधीच ठरलेले आहे, आपण फक्त त्याची अंमलबजावणी करतो. आपण मी केले म्हणून उगाच मिरवत असतो, पण खरा कर्ता करविता तो बाप्पा आहे. मग मी काय करतो? मोठा विचित्र प्रश्न आहे हा? काहींना तर हे असले प्रश्न, विचार हे नैराश्यवादी वाटतात. पण तो त्यांचा प्रश्न आहे.
माझे सगळे आयुष्य कसे जगणार आहे मी हे जर त्या बाप्पाने आधीच लिहून ठेवलेले आहे, तर मग तो आत्ता काय करतो आहे? कोणी कुठे कुधी कसे जन्मायचे, कसे कधी कुठे मरायचे, आयुष्यात काय काय प्रकारचे कार्य करायचे हे सगळे त्याने आधीच लिहून ठेवले आहे, मग त्याला आता उद्योग काय आहे? हा वारा म्हणजे वायुदेव, आपल्याला दिसले नाहित तरी जाणवतात, हा पाऊस म्हणजे वरूणदेव आपल्याला भिजवतात, पूर निर्माण करतात, हा सूर्य म्हणजे सूर्यदेव आपल्याला रोज दिसतात, आपल्याला प्रकाश देतात, झाडा-पानांना नविन जीवन देतात, हा अग्नि म्हणजे अग्निदेव आपल्या मंगलकार्यात आपल्याबरोबर असतात, आणि आपल्या आयुष्याच्या शेवटी हेच आपली चितेवर सोबत करतात! म्हणजे तात्पर्य काय की हे चार देव त्यांचे अस्तित्व आपल्याला सतत दाखवून देतात, पण मग बाकीचे देव काय करतात? ते ब्रम्हदेव, ते विष्णूदेव, आणि शंकर भगवान आणि या सगळ्यांबरोबर इंद्रदेव, आणि बाकीचे सगळे त्यांचे सहकारी देव देवता हे काय करतात? कारण जर सगळ्यांचे नशीब, आयुष्य जगण्याची शैली हे जर आधीच लिहून ठेवले आहे तर मग ते "मॉनिटर" जरी करायचे तरी काय करणार? आणि "मॉनिटर" करायचे म्हणजे देवाने खुद्द स्वतःच लिहिल्या गोष्टीवर देवानेच अविश्वास दाखवण्यासारखे नाही का? शाळेच्या वर्गात मॉनिटर लागतो तो "मॉनिटरपणा" आणि देवाचा मॉनिटरपणा यात काहीच साम्य नाही, हे तर सगळ्यांनाच माहित आहे. मग हा देव करतो काय? सगळी युगे संपल्यावर एका नविन विश्वाची उत्पत्ती होणार आहे, जसे या पृथ्वीवर आधी डायनॉसोर्सचे राज्य होते त्यांचा नाश झाला, त्यानंतर अनेकविध प्राणी, मग आदिमानव, मग आजचा प्रगत मानव यांची निर्मिती असे चक्र चालत राहीले. डायनॉसोर्सच्या पर्वा नंतर दुसरे पर्व देवाने निर्माण केले, त्या परमेश्वराचे हे सगळे प्रयोग होते, आता माणूस निर्माण झाल्यावर देवाने त्याला हळूहळू बुद्धी दिली, त्याच्याकडून वेगवेगळी कार्ये करवून घेतली, आणि आपल्याला वाटले की आपण नवनविन शोध लावले. पण ते शोध लावणे हे सुद्धा त्या परमेश्वरी इच्छेनुसार घडत होते, मानव केवळ निमित्तमात्र होता, आहे. देवाने मानवाला निर्माण केला, त्याला बुद्धि दिली, आणि भल्या-बु-याची निवड करायची ताकद दिली. बाकी प्राण्यांना नाही दिली. उगाच नाही म्हणत ना "विनाश काले विपरीत बुद्धि". इथे बुद्धिच का म्हटले? काही अजून का नाही वापरले? कारण खरोखर मानवाला विचार करण्याची क्षमता आहे, इतर प्राण्यांमध्ये ही क्षमता एकतर खूप कमी आहे किंवा मुळीच नाही! चांगले किंवा वाईट हे मानव ठरवू शकतो, पण सगळेच जण त्या अंतिम सत्याला बांधले गेलेले आहेत, आणि ते म्हणजे मानव जे काही बरे-वाईट करतो, ते त्याच्या नशिबात लिहिलेले असते म्हणून! म्हणतात ना "कोणी चोर म्हणून जन्माला येत नाही" तो त्याच्या कर्माने चोर अथवा साधू बनतो. त्याच्या कर्मांची प्रेरणा देणारा बाप्पाच असतो. वाल्याचा वाल्मिकी झाला, का झाला? गम्मत म्हणून? नाही, नारदमुनी भेटण्याआधी तो खून मारामा-या आणि दरोडे असले कर्म करतच होता ना? मग त्याचवेळी त्याला नारदमुनींनी दिक्षा दिली आणि त्याच्या कर्मांची दिशा बदलली, आणि पुढे तो वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध झाला. आता या वाल्यालाच का भेटले नारदमुनी, त्यावेळी जगात कोणी दुसरा मनुष्य नव्हता? होते ना, अनेक होते, पण या वाल्याच्या नशिबात देवाने वाल्मिकी बनणे आधीच लिहून ठेवले होते, तर मग दुसराकोणी कसा वाल्मिकी बनला असता बरे?
आता असे पाहा की देवाने या सगळ्या "प्रोसेसेस्" "डिफाईन" करून ठेवल्या आहेत, त्यात कुठलीही गडबड कोणीही करू शकतच नाही, या जगच्या शेवटापर्यंत या "प्रोसेसेस्" अशाच अविरतपणे चालूच राहाणार आहेत. त्यामुळे आता देव निवांत विश्रांती घेत झोपले आहेत. जे काही चांगले आत्मे या पृथ्वीतलावरून मरून परमेश्वराकडे जातात ते सगळे आत्मे आता या विश्वाच्या विनाशानंतर तयार होणा-या नविन विश्वासाठी "रिसर्च" करत आहेत. देवाने त्यांना या कामावर नेमलेले आहे, जिथे त्यांना अडेल तिथे नविन निर्मितीच्यावेळी देव त्यांना मदत करेल, पण तूर्तास तरी तो निवांतपणा अनुभवत आहे.
त्यामुळे या जगात जोवर तुम्ही आहात, तोवर परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा आपल्या अंतरंगात डोकवून पाहा, पाहा कुठे तुम्हाला वाल्या भेटतो का? आणि भेटलाच तर मग त्याचा वाल्मिकी कसा करायचा याचा प्रयत्न करा! तुम्हाला यश येईलच, कारण जेव्हा तुम्हाला असे वाटेल की आपण देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, तेव्हा तुम्हाला ती प्रेरणा देणारा दुसरा-तिसरा कोणी नसून साक्षात परमेश्वरच असेल यात शंका नाही.

मला माझ्यातला वाल्या भेटला आहे, पाहू आता त्याला देव कसा वागवतो?

तूर्तास तरी, हे आर्टिकल लिहायला देवाने मला प्रेरणा दिली, त्याबद्दल त्या बाप्पाचे अनेक आभार!


हिमांशु डबीर

२२-मार्च-२००९