Friday, July 31, 2009

सह्याद्रिचे अभ्यंग-स्नान!

आषाढातल्या त्या कृष्णमेघांनी जणू पृथ्वीला आच्छादून टाकले होते! दिवस-रात्र हे त्या ढगांच्या आडून त्यांची मार्गक्रमणा करत असले तरी या काळ्या-सावळ्या ढगांनी या धरेवरील वातावरण कुंद करून टाकले होते! काहिसे गूढ पण तरीही रम्य असे त्या निसर्गाचे वर्णन करावे अशीच ती अदाकारी होती या निसर्गराजाची! पुरुषभर उंचीचे गवत... गवत कसले ते तर "रान माजले" होते! त्यात गुडघा गुडघा साचलेला चिखल! विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट आणि संगीताचा ताल धरल्याप्रमाणे बरसणा-या जलधारा! वरूणराजाच्या प्रेमाला या वसुंधरेचा प्रतिसाद म्हणून रुद्र-भीषण नाद करत आक्राळविक्राळपणे थेट पाताळात उडी ठोकणारा तो प्रपात! छे... हि तर साधीसुधी कविकल्पना! प्रेमाचा प्रतिसाद कसला हे तर या रांगड्या सह्याद्रिचे "अभ्यंग-स्नान"! याच रांगड्या सह्याद्रितून जन्माला आलेल्या या नद्या, हे ओढे हे कसे मग मागे राहतील! हे सगळे आपल्या वडिलांच्या अभ्यंग-स्नानामधे रित्या होणा-या वरूणराजाच्या जलकुंभातले जल घेवून उफाट्याने धावत सुटले होते! जणू यांना सगळ्यांना आपल्या प्रियकराला... त्या "सागराला" भेटायची घाई झाली होती! काय सांगावा तो आवेग, तो आवेश, तो जल्लोष! तो धडकी भरवणारा आवाज! अनुभव घ्यायचा म्हणजे काही सोपे नाही... हे काय आपले दिवाळीतले आई, ताई, पत्नी यांचे स्नेहार्द्र स्पर्शांचे आणि मधूर आवाजातील गाण्यांचे, त्यांच्या ओवाळणीचे अभ्यंग-स्नान वाटले कि काय? हे या सह्याद्रिचे अभ्यंग-स्नान आहे, जिथे स्नान घालायला साक्षात वरूणदेव येतात! मनसोक्तपणे आपले जलकुंभ त्यांच्या लाडक्या पुत्रावर या सह्याद्रिवर रिते करतात! लहानग्या ओहोळांपासून... मोठाल्या नद्यांपर्यंत! मोराच्या केकारवापासून त्या उन्मत्तपणे कोसळणा-या प्रपातांपर्यंत सगळेजण गाणी गातात! मधूनच साक्षात सूर्यदेव दर्शन देवून इंद्रधनूने या सह्याद्रिला ओवाळतात, अन् हि धरा तिच्या लेकाला अनेकविध वृक्षवल्लींनी मोठ्या मायेने सजवते! काय तो सोहळा! काय तो थाट! सारेच नवल! सारेच शब्दांच्या पलिकडले!

या सह्याद्रिच्या अभ्यंग-स्नानाची खरी मजा लुटायची असेल तर खर सांगतो या सह्याद्रिच्या अंगा-खांद्यावर शिवरायांनी सजविलेल्या गड-किल्ल्यांवर जायला हवे! दुर्गमहर्षी गो. नि. दांडेकर यांनी केलेले रायगडावरील महादरवाजाच्या जवळच्या प्रपाताचे वर्णन जगायला हवे! गोनिदा लिहितात, "..हा गंगासागराचा पाणलोट, तो मात्र बहु आनंददायी आहे. काय आहे, की गंगासागरालाच काही झरे आहेत. गंगासागराचं जलवहनक्षेत्र (कॅचमेंट एरिया) आहे, ते तसं काही फार मोठं आहे असं नाही. पण जे आहे, त्यातूनच गंगासागरात भरपूर पाणी एकत्र होतं. त्या शिवाय जे पाणी, ते तिथून उतरून महाद्वाराच्या शेजारून खाली उडी घेतं. आणि त्याचा हा प्रपात!"

गोनिदा पुढे म्हणतात, "... गंगासागर हे महातीर्थ! सप्त पुण्यसरितांच पाणी राज्याभिषेकानंतर राजांनी त्या तलावात ओतवलं होतं. त्याचा लवलेश शेष तर उरला असेल, की नाही अजून! तर या पुण्यजलाचं ते स्नान इतकं सुखदायी होतं. आपण स्नान करताना मंत्र म्हणतो, 'गंगेच यमुने चैव गोदावरि सरस्वति| नर्मदे सिंधु कावेरी, जलेऽस्मिन् संनिधिं कुरु||' सगळ्या भरतखंडाची विशालभूमी पावन करीत वाहणा-या या नद्या, त्यांचं जळ त्या प्रपाताच्या वाटे आपल्या अंगावर कोसळत असतं, ही कल्पनाच किती आनंददायी आहे!"

गोनिदांनी केलेले या प्रपाताचे वर्णन आता कळसाला येते... स्नान सोहळा आटोपल्यानंतर ते पुढे म्हणतात, "मन म्हणत राहतं, केवढ तुझं दैव! प्रत्यक्ष राजानं ज्या जळानं स्नान करून राज्याभिषेक करून घेतला, त्याच जळांन तूही स्नान केलसं! यापरतं भाग्य म्हणतात, ते असतं तरी काय?"

किती सुंदर हे वर्णन! आता पावसात जेव्हा जाउ रायगडावर तेव्हा रायगड पाहायच्या आधी या प्रपाताखाली स्नान केल्याशिवाय आपण पुढे जाणारच नाही!

असाच एक नितांत सुंदर क्षण मलाही लाभला! तोरण किल्ला! जेव्हा आम्ही तोरण्याच्या पायथ्याला पोचलो तेव्हा तोरणा ढगांच्या शालीखाली दडून बसला होता! त्याच्यासवे लपंडाव खेळत खेळत आम्ही गडाच्या अखेरच्या चढाईला आलो! इथे आपले स्वागत करतो तो एक प्रपात! पुणे दरवाजाच्या बाजून चढाई करताना हा प्रपात आपले डावेबाजूस कोसळत असतो! उंच आहे हा भरपूर आणि ऐन पावसात तर हा खूप मोठा असतो! काय सुंदर चव असते हो या पाण्याला! बिनधास्तपणे प्या! या प्रपाताखाली उभे राहून त्याच्या जोर अनुभवा! कुणीतरी मालिश करत आहे असेच वाटेल तुम्हाला! इथे उभे असताना गोनिदांच्या ओळी मनात रुंजी घालू लागल्या... "राजाने ज्या पाण्याने स्नान केले त्याच पाण्याने तूही स्नान केलेस! केवढे तुझे भाग्य!" मन अलगद शिवरायांच्या काळात गेले! तोरणा किल्ला जिंकून राजांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले. स्वतंत्र राज्याची हि पहिली स्वतंत्र भूमी! आणि मग मन या प्रपाताचा उगम शोधू लागले. आणि वाटले, की कोठी दरवाजाच्या पलिकडे जो एक जलाशय आहे, त्यातूनच तर हा प्रपात उगम पावत असेल! मन मोहरले, शरीर शहारले! स्वतंत्र भूमीवर पाउल ठेवून राजाने जिथले पाणी प्यायले, त्याच जलाशयातले पाणी पिण्याचे सुख मला मिळाले! गोनिदांच्या प्रेरणेने सुचलेली हि संकल्पना! मग या प्रपाताला मागे ठेवून आम्ही किल्ल्यावर पोहोचलो! चिणला दरवाजा, भगत दरवाजा यांना परत एकदा डोळे भरुन पाहिल्यावर माझ्या सगळ्यात लाडक्या "झुंजार माची"वर आलो! अंगात रग असेल आणि काळजात हिंमत असेल तरच भर पावसात झुंजार माचीवर जा! जेव्हा "तोरणा किल्ला" काय आहे हे कळण्याचे वय नव्हते तेव्हा पासून मी या किल्लावर जातो आहे! दरवेळेस "झुंजार" मला बोलावतेच! झुंजार माचीच्या टोकावर राजगडाकडे तोंडकरून उभा राहिलो, राजगड दिसत नव्हताच, पण बदाबदा कोसळणारा पाऊस, तोरण्याच्या अंगा-खांद्यावरुन उड्या मारणारे असंख्य छोटे-मोठे प्रपात! हा सह्याद्रिचा अभ्यंग-स्नानाचा सोहळा मी स्वतः साक्षात अभ्यंग-स्नान करत पाहत होतो! त्या झुंजार माचीच्या सर्वोच्य ठिकाणी मला दिसणारा आसमंत नजरेचे पारणे फेडणारा होता! सरळसोट सुटलेले ते सह्यकडे... जिथून खालच्या वेल्हा गावापेक्षा स्वर्ग जवळ वाटावा! मागे बेलाग आणि भक्कमपणे उभा असलेला खुद्द तोरणा! असा तो सगळा सोहळा! पापणी जराही लवत नव्हती... तेव्हा आजच्या सारखे "डिजिटल कॅमेरे" नव्हते आणि ना माझ्याकडे कुठला साधा कॅमेरा होता... त्यामुळे हा सगळा अभ्यंग-सोहळा मी आधाशा सारखा माझ्या नजरेत साठवून ठेवत होतो! जणु समाधी लागली होती माझी! त्या पवित्र सोहळ्याचा एक छोटासा साक्षीदार होतो याचा मला आजहि अभिमान आहे!


हिमांशु डबीर

३१-जुलै-२००९