Saturday, March 28, 2009

संकल्प

संकल्प


ठरविलेच आहे मी, तुझ्या प्रत्येक श्वासात गुदमरायचे,

उर भरून श्वास घेऊन... परत नव्याने जगायचे!

प्रत्येक श्वासात तुझ्या, माझे अस्तित्व विसरायचे...


ठरविलेच आहे मी, तुझ्या प्रत्येक मिठीत रुतायचे,

पाठीमध्ये रूतल्या बोटांना अलगद सोडवायचे!

प्रत्येक मिठीत तुझ्या, माझे सर्वस्व अर्पायचे!


ठरविलेच आहे मी, तुझ्यावर फक्त प्रेम करायचे,

रोज उठून तुझ्या परत प्रेमात पडायचे!

प्रेमामधे तुझ्या, आपले विश्व थाटायचे!


हिमांशु डबीर

Wednesday, March 25, 2009

सेवानिवृत्ती

आमचे बाबा रिटायर होवून आता जवळपास २.५ वर्षे होतील. या सेवानिवृत्तीनंतर काय यावर त्यांनी काही दिवसांपूर्वी एक छोटासा लेख लिहीला आहे. त्यांच्या परवानगीने हा लेख मी माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध करत आहे.
जवळ जवळ ३२ वर्षे त्यांनी स्टेट बँकेत काढली. ब्रँच मॅनेजर म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांना 'सेवानिवृत्ती'बद्दल जे वाटते ते त्यानी या लेखात लिहीले आहे.
हिमांशु
----------------------------------------------------

सेवानिवृत्ती झाली - पुढे काय?

आयुष्याची पाने उलटली,
सेवानिवृत्ती देखील झाली,
संसाराची कर्तव्ये संपली,
वृत्तीदेखील निमाली,
अन् 'निवृत्तीची' सुरुवात झाली!!!

प्रत्येक व्यक्तीची ओळख समाजात दोन गोष्टींमुळे होते. जन्मानंतरचे चिकटलेले नावाचे लेबल अन् नोकरी / व्यवसायाचे लेबल. दोन्ही गोष्टीची सुरुवात एका ध्येयाने होत असते, पाट्या टाकण्यासाठी कोणीच जन्म घेत नाही की नोकरी व्यवसाय करत नाही.

जन्मतः 'स्व'चा शोध घेण्याचे अन् त्या परमेश्वरात विलीन होण्याचे ध्येय असते. नोकरी, व्यवसाय सुखाने चरितार्थ चालविण्याचे ध्येय. ध्येयाचा प्रवास सतत सुरु असतो. ध्येय म्हटले की मर्यादा आली. 'स्व'चा शोध घेण्यासाठी आयुष्य ही मर्यादा अन् नोकरीसाठी सर्वसाधारणपणे वय वर्ष साठीची. तीस वर्षांपेक्षा अधिक नोकरीत एकाच ध्येयाने धावल्यानंतर जो एक मुक्कामाचा पडाव येतो, तो 'सेवानिवृत्तीचा'! काही क्षणाची उसंत, पुढच्या प्रवासाची तयारी, एक सिंहावलोकन करण्याचा टप्पा.

एक सिंहावलोकन - आयुष्याची अन् उमेदीची, तीस वर्षांपेक्षा अधिक व्यस्ततेत घालविलेला काळ! नोकरी अन् संसारात झालेली तारेवरची कसरत. एका वर्तुळासारखा झालेला हा प्रवास - कधी परिघावरून तर कधी केंद्रबिंदू. ही धडपड म्हणजेच जिवंतपणाचे लक्षण मानायचे, कर्ता-करविता असल्याचा भास निर्माण करायचा. जबाबदारी, कर्तव्य यांची सांगड घालता घालता लक्षात येते की लग्नानंतर सुरुवातीला दोघे होते, तेच आता देखील आहेत. मुलांचे शिक्षण पूर्ण होवून ती नोकरीला लागली आहेत. पंखात बळ घेवून गगनभरारी घेत आहेत अन् साथीदाराबरोबर घरट्यात रमली आहेत. प्रगतिचा आलेख खूप उंचावलेला असतो. कर्ता-करविता कोणी वेगळाच आहे, हे जाणवत असते, पण त्याचा प्रयत्नपूर्वक विसर पडलेला असतो. तीस वर्षांपेक्षा जास्त उमेदीचा काळ ज्या ठिकाणी घालवलेला असतो, त्याच ठिकाणी नारळ अन् शाल याचा स्वीकार करावा लागतो. त्याचक्षणी भान ठेवून संसारातून मानाचे श्रीफळ अन् मायेची उबदार शाल मनापासून आनंदाने स्वीकारायची असते. ख-या अर्थाने 'सेवानिवृत्त' होवून 'निवृत्ती' स्वीकारायची असते.

सेवानिवृत्तीने वयाची जाणीव करुन दिलेली असते, शरीर कुरकुरायला लागते. बुद्धी अन् मनाचे विचार काय कमावले आणि काय गमावले याचा ताळेबंद मांडत असतात. काय काय करायचे राहिले याचा विचार सुरु होतो. सप्तसुरांचे संगीत मनाला भुरळ पाडते. पु.ल., गदिमा, कुसुमाग्रज... सारे जवळचे वाटायला लागतात. आमटे कुटुंबियांचे उत्तुंग ध्येय अन् त्यागाने भारावून गेल्यासारखे होते. आगगाडीचे रुळ मृगजळाच्यामागे धावायला लागतात. विपुल संतसाहित्यात कुठून प्रवेश करायचा याचा अंदाजच येत नाही. 'सत्संग' अन् 'आस्था' यासारखे कार्यक्रम गोंधळात भर घालतात. प्राणायाम आणि योगाचे वर्ग शरीरस्वास्थ्यासाठी बोलावत असतात. थोडक्यात काय तर सेवानिवृत्तीनंतर काय हा प्रश्न तसाच राहतो आणि त्याचे उत्तर शोधण्याचा हा एक प्रयत्न!

सेवानिवृत्तीनंतर खरतर आयुष्यातला एक नविन टप्पा, नविन मार्ग, 'स्व'चा शोध घेण्याचा श्री गणेशा! सुरुवात अशी की जी सहज असावी, आनंद देणारी अन् आनंद घेणारी असावी. 'हृदयातून' अन् हृदयाच्या प्रत्येक 'स्पंदना'तून असावी. जगण्याची उर्मी असावी, जगण्याची स्फुर्ती असावी. खरतर ही एक नविन ओळख असते, स्वतःची स्वतःशी झालेली! तीस-चाळीस वर्षांच्या 'वृत्ती'तून म्हणजे राग, लोभ, द्वेष, मत्सर, अहंकार, सुख-दु:ख यातून बाहेर पडण्याची वेळ. 'सेवानिवृत्ती' स्वीकारायची, 'वृत्ती' सोडायची, पण निवृत्त व्हायचे नाही. आयुष्याच्या दैवी देणगीतून निवृत्त व्हायचे नाही. ज्या ज्या वेळेला जे जे होईल, ते ते स्वीकारत जायचे, अगदी सहजतेने अन् आनंदाने.

याची सुरुवात दोन फुलस्केप पेपर्सपासून करायची, एका पेपरवर क्लेशदायक घटना, दु:खद क्षण - अगदी थेट लहानपणापासून. आई-वडिलांचे धपाटे, मास्तरांची पट्टी, प्रतिसादाला साद न देणारी कॉलेजकन्या! नोकरीतील तारस्वरातील मैफल, आठवणीतील अशा अनेक गोष्टी या कागदावर उतरवून काढायच्या.

दुस-या पेपरवर आनंददयी घटनांची साखळी जोडायची. उंच उडवलेला पतंग, सायकल चालविता येण्याचा क्षण - ज्या ज्या छोट्या गोष्टीतून आनंद दिला, बघितला, घेतला सारे क्षण टिपायचे. एका क्षणाचे वजन काकणभर जास्त होते. मन आनंदाने भरून जाते. दिसतो, जाणवतो तो फक्त आनंदच आनंद!

दु:ख देणा-या गोष्टींची परत परत उजळणी करायची. अन् तो कागद चक्क फाडून फेकून द्यायचा. त्या दु:खद आठवणी मनाच्या मुळापासून उपटून टाकायच्या. स्मृतीतून हद्दपार करायच्या, परत त्यांची आठवण न काढण्यासाठी. मग राहतात त्या फक्त दुस-या कागदावरील आनंददायी घटना! चुकून काही दु:खद प्रसंग, घटना घडल्या तरी आनंददायी घटनांची उजळणी करायची. मग जी प्रक्रिया सुरू होते ती शुद्धिकरणाची - मनाच्या शुद्धतेची पहिली पायरी!

मग मनाची झेप फक्त आनंददायी क्षणांपर्यंतच जाते. आनंददायी क्षण हृदयाकडे प्रवाहित होतात आणि मन आपोआप हृदयात विरून जाते. बुद्धि हा सारा खेळ चौकसपणे बघत असते. बघता बघता सा-या कसोट्या पार करीत नकळत बुद्धिदेखील त्यात प्रवाही होते. मेंदूची तल्लखता अधिकच वाढते. आनंदाच्या या लहरी शरीरभर प्रवाहित होतात. नित्यनविन श्वासासारखी अन् हृदयाच्या स्पंदनाप्रमाणे आनंद देणारी, जिवंतपणाची जाणीव करून देणारी अन् म्हणूनच हृदयाच्या स्पंदनातून जगण्याची एक लय गवसते!

हृदयाचे 'स्पंदन' हीच खरी ओळख. देहाला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणे आणि जिवंतपणा जपणे, हे कर्तव्य हृदय सतत, सहजपणे अन् आनंदाने करत असते. खरतर प्राणवायू अगदी सूक्ष्म स्वरूपात लागतो, पण तो सतत लागतो. स्पंदनातून रक्त शुद्ध करण्यासाठी अन् यातून शरीरभर प्राणाचा, चैतन्याचा, तेजाचा, अगदी परमेश्वराचादेखील संचार होण्यापुरता! प्राण, चैतन्य, तेज... ज्याला जसे भावते, तसे नाव दिले जाते. या क्रियेतून हृदय सा-या देहाला आनंद देते आणि त्याच आनंदात आनंदून जाते. खरतर या क्रियेला देहातील, मेंदूतील कुठलीही शक्ति उपयोगी पडत नाही. आनंद देणारा अन् घेणारा, स्पंदनातून जाणवणारा श्वासच! मन, बुद्धी डोळ्यांना दिसत नाही किंवा कुठल्याही अवयवाप्रमाणे दाखवता येत नाही. पण हृदय दाखवता येते... हृदयाचे स्पंदन जाणवते, अगदी आनंदाच्या कारंज्याप्रमाणे नाचणारे, बागडणारे! स्पंदनातून श्वास पुरवण्याचे, देहात अन् देहाबाहेरील विश्वाला श्वास पुरवणा-याचे आभार मानीत त्या विश्व-निर्मात्या परमेश्वराचा जप हृदय सतत करीत असते. इथेच हृदय, 'स्व'चा शोध करीत आनंदाने 'स्व'त विलीन होण्याची प्रक्रिया सुरू होते, स्पंदनातून परमेश्वरात विलीन होण्याचा मार्ग गवसतो!

या आनंदाचा शोध घेत मार्गस्थ होणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य बाकी राहते. श्वासाचा प्रवाह, स्पंदनाचे संगीत ऐकत बुद्धीला आणि मनाला त्या प्रवाहात विसर्जीत करणे हाच काय तो प्रवास चालू राहतो. स्पंदनाचा आवाज तोच खरा 'स्व'चा 'स्व'शी झालेला 'संवाद'! ज्याला भावेल तसा तो 'आतला आवाज'! अगदी अनंत स्वरूपात अन् अनंत नामात! आपापल्यापरीने या आनंदाचा शोध घेणे हाच निवृत्तीनंतरचा मार्ग! एकदा का हा आनंदाचा ठेवा सापडला की निवृत्तीचा अर्थ उमगायला लागतो. मग बाकी व्यावहारीक, पारमार्थिक गोष्टी अगदी आपोआप, सहजपणे घडायला लागतात. अगदी स्पंदनातून विश्व-निर्मात्यात विलीन होत आपण निवृत्त होतो.

हृदयातून जीवनाचा आनंद देणे,

हृदयातून जीवनाचा आनंद घेणे,

स्वतःचा स्वतःशी 'संवाद' साधणे

हेच खरे 'निवृत्ती'नंतरचे जगणे!!!!!

यशवंत हरी डबीर
पुणे

Sunday, March 22, 2009

एका वाल्याची "नविन" गोष्ट

सध्या देव काय करतोय? कधी प्रश्न पडला का हा तुम्हाला? मला कालच पडला, तसा या प्रश्नाला काही अर्थ नाही, खूप थोर लोक याचे उत्तर एका मिनिटात देतील. हे जग हा परमेश्वर चालवतो, हा वारा त्याच्या आज्ञेने वाहतो, आपण त्याच्याचमुळे जगतो, आपली सगळी कार्ये त्या परमेश्वरच्या प्रेरणेने होत असतात! आपले आयुष्य आपण कसे जगणार आहोत हेसुद्धा त्याने आधीच लिहून ठेवलेले आहे, आपण फक्त ते त्याप्रमाणे जगतो. मग प्रश्न पडतो, की जर माझे आयुष्य या देवाने लिहिले आहे, माझे म्हणजे आपल्यासकट सर्व प्राणीमात्रांचे आयुष्य याने लिहून ठेवलेले आहे. कुठल्या क्षणी कुठे काय होणार याचे गणित त्याने आधीच मांडून आणि सोडवून ठेवलेले आहे. जे काही आपण करतो, ते सगळे आधीच ठरलेले आहे, आपण फक्त त्याची अंमलबजावणी करतो. आपण मी केले म्हणून उगाच मिरवत असतो, पण खरा कर्ता करविता तो बाप्पा आहे. मग मी काय करतो? मोठा विचित्र प्रश्न आहे हा? काहींना तर हे असले प्रश्न, विचार हे नैराश्यवादी वाटतात. पण तो त्यांचा प्रश्न आहे.
माझे सगळे आयुष्य कसे जगणार आहे मी हे जर त्या बाप्पाने आधीच लिहून ठेवलेले आहे, तर मग तो आत्ता काय करतो आहे? कोणी कुठे कुधी कसे जन्मायचे, कसे कधी कुठे मरायचे, आयुष्यात काय काय प्रकारचे कार्य करायचे हे सगळे त्याने आधीच लिहून ठेवले आहे, मग त्याला आता उद्योग काय आहे? हा वारा म्हणजे वायुदेव, आपल्याला दिसले नाहित तरी जाणवतात, हा पाऊस म्हणजे वरूणदेव आपल्याला भिजवतात, पूर निर्माण करतात, हा सूर्य म्हणजे सूर्यदेव आपल्याला रोज दिसतात, आपल्याला प्रकाश देतात, झाडा-पानांना नविन जीवन देतात, हा अग्नि म्हणजे अग्निदेव आपल्या मंगलकार्यात आपल्याबरोबर असतात, आणि आपल्या आयुष्याच्या शेवटी हेच आपली चितेवर सोबत करतात! म्हणजे तात्पर्य काय की हे चार देव त्यांचे अस्तित्व आपल्याला सतत दाखवून देतात, पण मग बाकीचे देव काय करतात? ते ब्रम्हदेव, ते विष्णूदेव, आणि शंकर भगवान आणि या सगळ्यांबरोबर इंद्रदेव, आणि बाकीचे सगळे त्यांचे सहकारी देव देवता हे काय करतात? कारण जर सगळ्यांचे नशीब, आयुष्य जगण्याची शैली हे जर आधीच लिहून ठेवले आहे तर मग ते "मॉनिटर" जरी करायचे तरी काय करणार? आणि "मॉनिटर" करायचे म्हणजे देवाने खुद्द स्वतःच लिहिल्या गोष्टीवर देवानेच अविश्वास दाखवण्यासारखे नाही का? शाळेच्या वर्गात मॉनिटर लागतो तो "मॉनिटरपणा" आणि देवाचा मॉनिटरपणा यात काहीच साम्य नाही, हे तर सगळ्यांनाच माहित आहे. मग हा देव करतो काय? सगळी युगे संपल्यावर एका नविन विश्वाची उत्पत्ती होणार आहे, जसे या पृथ्वीवर आधी डायनॉसोर्सचे राज्य होते त्यांचा नाश झाला, त्यानंतर अनेकविध प्राणी, मग आदिमानव, मग आजचा प्रगत मानव यांची निर्मिती असे चक्र चालत राहीले. डायनॉसोर्सच्या पर्वा नंतर दुसरे पर्व देवाने निर्माण केले, त्या परमेश्वराचे हे सगळे प्रयोग होते, आता माणूस निर्माण झाल्यावर देवाने त्याला हळूहळू बुद्धी दिली, त्याच्याकडून वेगवेगळी कार्ये करवून घेतली, आणि आपल्याला वाटले की आपण नवनविन शोध लावले. पण ते शोध लावणे हे सुद्धा त्या परमेश्वरी इच्छेनुसार घडत होते, मानव केवळ निमित्तमात्र होता, आहे. देवाने मानवाला निर्माण केला, त्याला बुद्धि दिली, आणि भल्या-बु-याची निवड करायची ताकद दिली. बाकी प्राण्यांना नाही दिली. उगाच नाही म्हणत ना "विनाश काले विपरीत बुद्धि". इथे बुद्धिच का म्हटले? काही अजून का नाही वापरले? कारण खरोखर मानवाला विचार करण्याची क्षमता आहे, इतर प्राण्यांमध्ये ही क्षमता एकतर खूप कमी आहे किंवा मुळीच नाही! चांगले किंवा वाईट हे मानव ठरवू शकतो, पण सगळेच जण त्या अंतिम सत्याला बांधले गेलेले आहेत, आणि ते म्हणजे मानव जे काही बरे-वाईट करतो, ते त्याच्या नशिबात लिहिलेले असते म्हणून! म्हणतात ना "कोणी चोर म्हणून जन्माला येत नाही" तो त्याच्या कर्माने चोर अथवा साधू बनतो. त्याच्या कर्मांची प्रेरणा देणारा बाप्पाच असतो. वाल्याचा वाल्मिकी झाला, का झाला? गम्मत म्हणून? नाही, नारदमुनी भेटण्याआधी तो खून मारामा-या आणि दरोडे असले कर्म करतच होता ना? मग त्याचवेळी त्याला नारदमुनींनी दिक्षा दिली आणि त्याच्या कर्मांची दिशा बदलली, आणि पुढे तो वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध झाला. आता या वाल्यालाच का भेटले नारदमुनी, त्यावेळी जगात कोणी दुसरा मनुष्य नव्हता? होते ना, अनेक होते, पण या वाल्याच्या नशिबात देवाने वाल्मिकी बनणे आधीच लिहून ठेवले होते, तर मग दुसराकोणी कसा वाल्मिकी बनला असता बरे?
आता असे पाहा की देवाने या सगळ्या "प्रोसेसेस्" "डिफाईन" करून ठेवल्या आहेत, त्यात कुठलीही गडबड कोणीही करू शकतच नाही, या जगच्या शेवटापर्यंत या "प्रोसेसेस्" अशाच अविरतपणे चालूच राहाणार आहेत. त्यामुळे आता देव निवांत विश्रांती घेत झोपले आहेत. जे काही चांगले आत्मे या पृथ्वीतलावरून मरून परमेश्वराकडे जातात ते सगळे आत्मे आता या विश्वाच्या विनाशानंतर तयार होणा-या नविन विश्वासाठी "रिसर्च" करत आहेत. देवाने त्यांना या कामावर नेमलेले आहे, जिथे त्यांना अडेल तिथे नविन निर्मितीच्यावेळी देव त्यांना मदत करेल, पण तूर्तास तरी तो निवांतपणा अनुभवत आहे.
त्यामुळे या जगात जोवर तुम्ही आहात, तोवर परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा आपल्या अंतरंगात डोकवून पाहा, पाहा कुठे तुम्हाला वाल्या भेटतो का? आणि भेटलाच तर मग त्याचा वाल्मिकी कसा करायचा याचा प्रयत्न करा! तुम्हाला यश येईलच, कारण जेव्हा तुम्हाला असे वाटेल की आपण देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, तेव्हा तुम्हाला ती प्रेरणा देणारा दुसरा-तिसरा कोणी नसून साक्षात परमेश्वरच असेल यात शंका नाही.

मला माझ्यातला वाल्या भेटला आहे, पाहू आता त्याला देव कसा वागवतो?

तूर्तास तरी, हे आर्टिकल लिहायला देवाने मला प्रेरणा दिली, त्याबद्दल त्या बाप्पाचे अनेक आभार!


हिमांशु डबीर

२२-मार्च-२००९

Friday, March 20, 2009

मनस्वीता - एक जिवंत अनुभव

"मनस्वीता" म्हणजे काय हे ज्या प्रसंगाने मला शिकवले, तो माझ्या जीवनातला सत्य-प्रसंग आज मी इथे मांडत आहे

२००७ मधील धुलीवंदनाचा दिवस होता तो! माझ्या सम्पुर्ण जीवनात मी तो दिवस कधीही विसरणार नाही. कौस्तुभ आणि मी कानिफनाथांच्या गुहेला भेट देण्याचे ठरविले. तसा माझा आणि कानिफनाथांच्या गुहेचा संबंध खूप पुर्वी पासून येत होता. पण कधीही या गुहेला भेट देण्याचा योग आला नाही. मला जेव्हा पासून आठवते तेव्हापासून म्हणजे साधारणतः वयाच्या ८ व्या वर्षापासून मी आई-बाबांबरोबर जेजुरीला जातो तेव्हापासून या गुहेचे मला खूप आकर्षण वाटत आले आहे. इथे जाणे खूप कठीण आहे, इथे आत जाण्यासाठी एक अगदी छोटिशी खिडकी आहे आणि त्या खिडकीतून आत जायला खूप कष्ट पडतात म्हणे! सरते शेवटी २००७ साली मित्राबरोबर इथे जाण्याचा योग जुळून आला.
दिवे घाटाच्या पुण्याकडील पायथ्याकडून एक रस्ता जातो इतकेच ज्ञान आम्हाला होते आणि नंतर समजले की पुण्यातून कोंढवा गावातून बापदेव घाटातून सुद्धा एक रस्ता जातो तो थेट कानिफनाथांच्या मंदिरात जातो. आणि हा रस्ता पुढे थेट सासवडमधे पण जातो.
तर अशाप्रकारे धुलवडीच्या दिवशी आमची स्वारी कानिफनाथांच्या गुहेकडे निघाली. दिवेघाटाच्या अलीकडून उजवीकडे एक रस्ता जातो, तो थेट कानिफनाथांच्या मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याला जाऊन भिडतो. डोंगर पायथ्याला बाईक लावून आम्ही तो डोंगर चढायला सुरूवात केली. तसा डोंगर पिटुकलाच आहे, पण त्याने आमचा घाम काढला. निवडुंगाची खूप झाडी आहे इथे, काही ठिकाणी तर जाळीच आहे! त्याजाळीत फोटो काढले, आणि रमत-गमत जवळपास ५० मिनिटांमध्ये आम्ही डोंगरमाथ्यावर पोचलो. मंदिर परिसरात येतानाच एक भव्य असे नवनाथांचे भित्ती चित्र आपल्याला सामोरे येते. त्या भित्ती चित्राच्या समोर उभे असताना आपल्या उजव्याबाजूला श्री दत्त्तात्रेयांचे सुबक आणि मनमोहक मंदिर आहे, त्या देवालयातील दत्तगुरूंची मुर्ति खूप प्रसन्न आहे आणि त्या दर्शनाने आपले मन खूप सुखावते.
या मंदिराच्या समोरच कानिफनाथांच्या गुहेकडे जाणा-या पाय-या आहेत. या पाय-यांच्या बाजूने श्री ज्ञानेश्वर माउलींची मुर्ती आहे, गणपतिची मुर्ती आहे, तसेच अजून काही देवदिकांच्या मुर्ती आहेत. त्याच कमानीवर कानिफनाथ महाराजांच्या जन्माचे चित्र रेखाटलेले आहे. कानिफनाथ हे एका हत्तीच्या कानात जन्माला आले, कानात जन्मले म्हणून "कानिफा".

अंगावर येत जाणा-या पाय-यांची चढण संपवून आपण गुहेच्या प्रवेशद्वारासमोर येऊन ठेपतो. आता प्रवेशद्वार म्हट्ले की एक भव्य दिव्य असे काहीसे समोर येते ना, पण थांबा, हे प्रवेशद्वार किती मोठे आहे हे जाणून घ्यायचे आहे? ८ इंच बाय १२ इंच!!!! होय, इतकेसे आहे हे प्रवेशद्वार!!! या द्वारातूनच आत जावे लागते तर कानिफनाथांच्या गुहेत आपण पोचू शकतो. आणि आत मध्ये हि गुहा कमीतकमी १२-१५ माणसांना सामावून घेवू शकते!

आम्ही तिथे पोचलो तेव्हा एक बुवा कुठल्या तरी श्लोकाचे निरुपण सांगत होते. काही भक्तजन ते ऐकत होते, एक पुजारीबाबा त्या पिटुकल्या दारापाशी बसलेले होते आणि काहि मंडळी गुहेच्या प्रवेशद्वारापाशी खोळंबली होती. गुहेच्या आत असणारी मंडळी बाहेर आली की हि मंडळी आत जाणार होती. मी आणि माझा मित्र ते सगळे पाहत होतो. आणि आत जायचे का? यावर बोलत होतो. आता इथवर आलोच आहोत तर जाऊच आत असे ठरविले आणि तयारीला लागलो.

या गुहेत जाण्याचे काही नियम आहेतः

१. स्त्रियांना गुहेच्या आत प्रवेश नाही

२. गुहेच्या आत जाताना, शर्ट, बनियान, कमरेचा पट्टा, पाकिट, घड्याळ आदि चीजवस्तू उतरवून ठेवाव्या लागतात.

३. आधी हात, मग डोके, मग धड आणि मग पाय या क्रमानेच तुम्हाला गुहेत प्रवेश करावा लागतो

४. बाहेर पडताना वरचा क्रम उलटा करुन बाहेर यावे लागते

एकंदर तो प्रकार जरासा भीतिदायक वाटतो. आणि त्या प्रवेशद्वाराच्यावर एक वाक्य लिहिलेले आहे, "ज्याच्या उरी असे श्रद्धा त्यासी दिसे हा कानिफा". मनाची तयारी केली आणि गुहेच्या तोंडावर जाऊन उभे राहिलो, आतील लोक बाहेर आले की आम्ही आत जाणार होतो. आणि तो क्षण आला, जेव्हा मी त्या गुहेत प्रवेश करायला सिद्ध झालो.

हातात एक हार आणि काही फुले होती देवाला वाहायला घेतली होती ती. आत प्रवेश करताना, नियमाप्रमाणे योग्यक्रमाने मी आत जाण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि हात गुहेच्या आत, मधल्या चिंचोळ्या जागेत धड आणि मागे गुहेच्या बाहेर पाय अशा विचित्र अवस्थेत अडकून पडलो. आणि काही झणातच धीर सुटायला सुरुवात झाली. असे वाटू लागले की बस्स इथेच आपला शेवट!! मग सुरु झाली ती जगण्यासाठीची तडफड! आत गुहेत एकही खिडकी नाही की जिथून हवा आत येईल, पाठीमागे सगळी जागा माझ्याच देहाने अडवलेली, आता थोड्या वेळाने हवा बंद होणार आणि आपण गुदमरणार अशी भीति मनाला सतावू लागली! किती विसंगती आहे ना, समोर सक्षात परमेश्वर असताना मी मृत्युच्या भीतिने स्वतःला पछाडून घेत होतो. मग तिथेच देवाबरोबर संवाद सुरू केला, त्याला म्हट्ले, कदाचित मी अजून तुमच्या दर्शनासाठी पात्र नाही, माझी लायकी इथवरच आहे, आता मात्र मला तुम्ही परत पाठवा! तुम्हांकरता आणलेली ही फुले आणि हा हार मी तुम्हाला इथूनच अर्पण करतो, त्याचा स्वीकार करा आणि मला निरोप द्या! मान खाली झुकवली आणि एकच क्षण त्याचे ध्यान केले आणि माझे जे करायचे ते आता तूच कर, असे म्हणून त्याला संपुर्णपणे शरण गेलो आणि तो हार त्यांच्या पादुकांकडे सरकवण्यासाठी हात जितका लांब करता आला तितका केला. त्याचवेळी मागच्या पुजा-याने मला धक्का दिला आणि माझा हात थेट पादुकांवर जावून भिडला! ही सगळी घटना केवळ २५-३० सेकंद घडत असेल, माझे अडकणे, परमेश्वराशी बोलणे, त्याला शरण जाणे आणि नेमका त्याचवेळी त्या पुजा-याने मला धक्का देणे आणि ज्या कारणाकरीता आलो त्या गुहेच्या आत मध्ये मी असणे, सारेच कल्पनातीत होते! आत आल्यावर पादुकांना हार, फुले वाहिली, प्रदक्षिणा केली आणि मग ध्यान लावून नामस्मरण सुरु केले. नामस्मरण चालू असताना, एकदम एक हळूवार संवाद कानावर येऊ लागला,
"बाळा, समोर मी असा बसलेलो असताना, तुला भय कसले वाटत होते?, माझ्यावर विश्वास नव्हता का?"
बस्स इतकेच ऐकू आले आणि विचारांची श्रुंखला सुरु झाली. खरच हा परमेश्वर असा इथे असताना, त्याच्यावर सगळे सोपवून त्याला शरण जाण्याचे सोडून मीच माझी व्यर्थ धडपड करीत होतो की मी आत कसा येवू आणि जेव्हा समजले, की आत येता येत नाही तेव्हा बाहेर कसा जावू याची काळजी करत बसलो! सगळ्या जगाची काळजी घेणारा माझ्यापासून केवळ १ फुट अंतरावर होता, त्याला मी पाहातच नव्हतो! "स्वतःच्या अहंकारात होतो, की मी इथे अडकूच कसा शकतो?" सदैव हाच विचार की "मी यातून कसा बाहेर पडू?" सगळीकडे फक्त "मी, मी आणि मी"...

विचार आला, की नेमक्या त्याचवेळी जेव्हा मी त्या परमेश्वरी शक्तिला पूर्णपणे शरण गेलो, त्याचवेळी त्या पुज-याला कशी प्रेरणा मिळावी आणि त्याने मला आत ढकलावे? त्या आधी का नाही? केवळ तो हार देवापर्यंत पोचावा म्हणून लांब केलेला हात थेट पादुकांपर्यंत कसा पोचावा? आणि आत मधे पोचल्यावर मला तो आवाज का यावा? या प्रश्नांची उत्तरे मला तिथेच मिळाली. देव सतत तुमच्या बरोबर असतोच, तुम्ही त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतच नाहीत, केवळ संकटातच त्याची आठवण येते, आणि तो जी मदत करतो, ती मदतसुद्धा आपण ओळखू शकत नाही! आपण फक्त म्हणतो ही परिस्थिती का आणलीस माझ्यावर? पण जर त्याने ही परिस्थिती आणलीच आहे तर तोच या परिस्थितीतून बाहेर पडायला आपल्याला सहाय्य करतोच करतो! आपण फक्त त्याला संपूर्ण शरण जायचे, सगळे काही त्याच्यावर सोपवायचे आणि त्याचे चिंतन करायचे!

लोक म्हणतात देव कधी दिसतो का कुणाला? देव कधी बोलतो का कुणाशी? देवाचा स्पर्श होतो का कधी कुणाला?, उत्तर आहे, हो देव दिसतो अगदी सगळ्यांना दिसतो, तो आपल्याशी बोलतो सुद्धा, आणि आपण त्याचा स्पर्श अनुभवू शकतो. मला जेव्हा हा अनुभव आला, तेव्हा ना कुठे वीज चमकली, ना सोसाट्याचा वारा सुटला, ना माझ्यासमोर खूप लख्ख प्रकाश पसरला! तरीही, होय मला देव दिसला!

"मनस्वीता" म्हणजे मनस्वीपणा, आपण नेहेमी म्हणतो, मी माझ्या मनासारखे आयुष्य जगणार, पण आपली मनस्वीता ही कधीच नसते, जी असते ती त्या परमेश्वराची! आपल्या आत्म्याची जी मानसिक घडण असते ती त्या परमेश्वराच्या पायी लीन होण्यासाठी धडपडत असते, आणि शरीराने आपण आपल्या आत्म्याला कशी साथ देतो त्यावर आपल्या आध्यात्मिक प्रगतीची रुपरेषा तयार होत असते! आणि जेव्हा जेव्हा परमेश्वराच्या प्राप्तीसाठी या देहाला थोडे कष्ट होतात, तेव्हा तेव्हा हा आत्मा देहाचे आभार मानत असतो. कारण शरीर हे आत्म्याने धारण केलेले वस्त्र आहे, जे तो सतत बदलत असतो, आणि मनुष्य-जन्म हा त्या परमेश्वर प्राप्तीसाठीचा सगळ्यात चांगला मार्ग आहे कारण इतर कठल्याही योनीत परमेश्वर प्राप्तीसाठीची विचारसरणी निर्माणच होत नाही, याचा विचार डोक्यात आला, आणि डोळ्यांत पाणी दाटले. भानावर आलो आणि त्या कानिफनाथांना नमस्कार करुन गुहेच्या बाहेर आलो! खूप शांत वाटत होते, जणू काही या जगण्यातील क्षणभंगुरतेच अंदाज मला आला होता आणि या मनुष्या योनी जन्माला आल्याचे कारण मला उमगले होते.

त्याच प्रसन्न मनस्थिती मधे आम्ही डोंगर उतरून खाली आलो, आणि घराकडे परतलो!

आजही तो प्रसंग मला जसाच्या तसा आठवतो आणि मला परमेश्वराच्या चरणी वारंवार लीन करतो!

हिमांशु डबीर
२०-मार्च-२००९

Wednesday, March 18, 2009

खिडकी - एक सिद्ध योगी

खिडकी - एक सिद्ध योगी
खिडकी एक खडबडीत आणि काहीसा रूक्ष असा पण हवाहवासा शब्द! तसा खिडकी बरोबर आपला संबंध रोजयेतोच, वयोमानापरत्वे खिडकीचे संदर्भ बदलत जातात. जणू काही एखाद्या कळीचे फूल बनावे इतके हळुवारपणे हे संदर्भ बदलतात. असाच एकदा खिडकीत उभा होतो तेव्हा काही मजेदार प्रसंग डोळ्यांसमोरून घरांगळत गेले, आणि वेगवेगळ्या वयामधे आलेले खिडकीचे संदर्भ एका मजेदार चित्रपटा सारखे समोर आले.
प्रत्येकजण याच खिडकीतून आपले स्वतःचे असे एक आकाश पाहतो, आपले स्वतःचे असे एक तारंगण सजावतो, आपले स्वतःचे असे एक विश्व उभरतो. आणि याच खिडकीत उभे राहून कितीतरी वेळा पुढच्या आयुष्याची वाटचाल नियोजित करतो!
प्रत्येक घराला एकतरी खिडकी हवीच, अलिखित नियम आहे तो! एक सेल्लुलर जेल सोडला आणि खासकरून त्यातील स्वा. सावरकरांची कोठडी सोडली तर खिडकी नाही अशी वास्तू या जगात कुठे सापडणे मुश्कील आहे!
लहान असताना आईच्या कडेवर बसून खिडकीत उभे राहून बाबांची वाट पहाणे किंवा बाबांच्या खांद्यावर चढून आईने दिलेला जेवणाचा घास नाकारणे या सगळ्या गोष्टींना जसे आई-वडील साक्षीदार असतात तसेच ती खिडकीसुद्धा साक्ष असतेचना!
दुसर्‍याच्या अंगणातून चोरून आणलेला मानिप्लँट खिडकीत एका काचेच्या बाटलीत लावायचा आणि त्याने खिडकीला पूर्ण वेढा द्यायचा आणि मग त्याच्या झुल्यावर बसून एखाद्या बुलबुलाने मोहक शीळ घालावी आणि असे वाटवे की ती खिडकीच जिवंत झाली! त्याच झुल्यावर बसून एका चिमणीने आपले घरटे सजवावे आणि खिडकी अचानक बोलू लागावी असे घडते, एखादे स्वप्नच जणू! मग हळूहळू त्या बुलबुलाची शीळशिकत शिकत आपण सुद्धा शीळ घालायच्या वयात येऊन पोचतो. त्याच खिडकीत उभे राहून आपण कधी कधी आपल्याच वयाच्या मुलींना पाहून ती
"ठराविक" शीळ घालतो. त्या आल्पया उपद्व्यापला कधी प्रतिसाद म्हणून सुंदरसे स्मितहास्य मिळते टेर कधी शिळा ब्रेड खावून आपचं झालेला चेहरा जसा दिसतो तसा कोणीतरी आपल्याला पाहून शिव्याशाप देऊन निघून जातो! काय करणार वय तसेच असते ना! पण हो सगळे ती खिडकी अगदी मूकपणे पाहत असते, आपल्याला मिळालेल्या प्रतिसदाची वाच्यता ती कुणाहीकडे कधीही करत नाही किंवा आपल्याबरोबर तो प्रतिसाद साजरा करत नाही. जसे आपले वय अजुन थोडे वाढते तसे आपले खिडकीमधे जाणे पण बदलते. पावसात भिजून मनसोक्त आनंद लुटणारी मुले पाहून आपण का नाही भिजत हा प्रश्ना नाही पडत पण असे वाटते की भिजून ही मुले आजारी तर नाही पडणार? पण अगदी खरे सांगा, उद्याचे ऑफीस बुडायला नको म्हणून आपणच त्या पावसात जाण्याचे टाळतो ना! त्यावेळी सुद्धा ती खिडकी आपल्या विचारांची साक्षीदार असते. काही ना बोलता, जे घडते आहे ते नीर्वीकारपणे पाहत असते ती.
ऑफीस मधून निवृत्त झालो की मग परत सोबतीला येते ती खिडकी. सारून गेलेल्या काळाचा ताळा मांडांताना , घरी परत येणार्‍या मुलांची वाट पाहाताना, पार्ट्नर बरोबर कधी वाद तर कधी संवाद साधताना खिडकीत बसून वेळ कसा जातो ते कळतच नाही.
या सगळ्या गोष्टींचे खरतर या खिडकीला काही सोयरे नसते की काही सुटक नसते, ती आपली तशीच मूकपणे सगळे काही पाहत असते.
प्रत्येकाला कधीतरी मन मोकळे करायला ही खिडकी हक्काची वाटते. एखाद्या योग्या सारखी ती आपली सारी सुख-दु:खे ऐकून घेते, आपल्याला धीर देते, आधार देते. घरातील जवळपास सगळ्या चीज वस्तुंबरोबर आपला जीव गुंततो, अगदी ताट, वाटी, पेला , फ्लॉवरपॉट इतकाच काय पण त्या घराच्या भिंतीवर पण आपला जीव जुळतो, पण ती खिडकी विसरली जाते. पण त्या विसरण्याचीही त्या खिडकीला खन्त नसते, ती खरच सगळ्यात असून त्रयस्था सारखी सगळे काही पाहत असते. मला खरच त्यामुळे खिडकी ही एका कसलेल्या योग्या प्रमाणे वाटते, एक असा योगी जो केवळ गेल्या जन्माचे काही भोग बाकी आहेत भोगायचे म्हणून या पृथ्वीतलावर आला आहे, सगळ्या भाव-भावना यांच्या मधे असूनही तो योगी त्यांच्यापासून आगळा आहे.
प्रत्येक माणसाला हवी असते ती एक खिडकी ज्यात तो मोकळा होईल, आपल्या अंतरंगात डोकवून पाहील! एक अशी खिडकी जी हृदयस्थ परमेश्वराला आपल्या समोर आणून दाखवेल. आणि ते साध्य करायला शिकवते ती खिडकी, एकदा पहा बसून या खिडकीत, नक्की सांगतो ज्या खिडकीतून परमेश्वर दिसतो ती खिडकी तुमच्यासाठी उघडली जाईल . मनाची खिडकी उघडी ठेवा, तो परमेश्वर बाकीचे सगळे तुमच्या ओंजळीत घालील!

हिमांशु डबीर
17 मार्च 2009

मनापासून मनापर्यंत

एक प्रयत्न