Friday, August 27, 2010

आरंभ!

आरंभ!

बंध-पाश सारे इथेच विरती,
मम आत्म्याने कात टाकली!

श्वास मुक्तला पिंजा-यातूनी,
मम आत्म्याने कात टाकली!

मार्ग दिसला स्वर्गारोहिणी,
मम आत्म्याने कात टाकली!

हृदयात घुमला ओंकार ध्वनी
मम आत्म्याने कात टाकली!

सुटली आशा अन् वृत्ती निमाली,
मम आत्म्याने कात टाकली!

सजवून देह निघालो वैकुंठी,
मम आत्म्याने कात टाकली!

सवे चालती गुरू-माउलि,
मम आत्म्याने कात टाकली!

हिमांशु डबीर
१३-ऑगस्ट-२०१०
प्रेरणा स्त्रोत:- बाबांनी दिलेली "आत्म्याने कात टाकली" ही ओळ

Monday, August 16, 2010

संक्रमण - दि टिन एज

संक्रमण - दि टिन एज
(कु. पूजा प्रधान या माझ्या मैत्रिणीच्या "दि टिन एज" या इंग्रजी कवितेचा हा स्वैर मराठी अविष्कार!)

मन कशातच कसं लागत नाही?
की मनाला काय हवे तेच मला कळत नाही?
वयात येताना असंच काहीसं होत असतं का?
काही नसताना सारं काही आहे असं वाटत असतं का? अन्
सारं असताना ते नाही अस मन समजतं का?

कदाचित हे "संक्रमण" असावे!
माझ्यातल्या "मी"ला मी ओळखीचे व्हावे! की
"मी"तल्या मला माझे नविन धागे जुळावे!
विचारांचा कल्लोळ होतो, उत्तर सापडतच नाही, की
प्रश्न काय हेच मला उमगत नाही?

मोठ्यांचा मान अन् धाकट्यांचे प्रेम,
याचा "ताल" जुळत का नाही?
सगळ्यांत असून मी कुठेच का दिसत नाही?
मनातले विचार कधी थोर तर कधी बाल का वागतात?
तुम्हाला हे प्रश्न सांगा कधी का हो पडतात?

द्विधा हि मनाची स्थिती असते का?
कि केवळ एक ती अवस्था असते?
सगळ्यांनाच हे "चकवे" भेटतात का?
प्रश्नांची हि मालिका कधीतरी संपते का?

जगण्याच्या प्रवासातले हे ठराविक "थांबे" असतात का?
की जीवनावर उठलेले हे "रोमांच" असतात?
उत्तर या प्रश्नांचे असेलही... नसेलही,
पण मला सांगा ना, हे असेच "अनामिक" असतात का?

हिमांशु डबीर
२७-जुलै-२०१०

Tuesday, August 10, 2010

त्रिवार नाही

त्रिवार नाही


आहे ते असे आहे, आहे ते माझे आहे,
पटले तर घ्या?...चल हट...हा तर सवालच नाही,
तुमच्यासाठी बदलायला...
मी काही पाटीवरची अक्षरे नाही!वड्याच तेल वांग्यावर काढायला मला नाही जमत!
"ध" चा "मा" करायला मला नाही सवड!
आहे ते तोंडावर आहे, मामला सगळा रोख-ठोक आहे!
पाठीमागे बोलायला तुमच्या सवड मला नाही!
आधी मारुन मग सॉरी म्हणायला
मी काही इंग्रजांची जात नाही!


उगा लाळ घोटायला मला नाही झेपत!
खोटे गोड गोड बोलणे मला नाही खपत!
स्पष्टच बोलतो जे जसे वाटते तसे!
मला त्यावेळी ना कोणाच्या बापाची भीती वाटते!
यारी-दोस्ती माझी काही अप्पलपोटी नाही
तुमच्यासारखे छुपे स्वार्थ साधायला
मी नामर्दाची अवलाद नाही!


हिमांशु डबीर

Sunday, August 8, 2010

मैत्र

मैत्र

नाते कसे जुळले... कळलेच नाही!
बंधातून अनुबंध बंधले... कळलेच नाही!
नाहीच नाव या नात्याला तरी,
हृदय कसे जुळले... कळलेच नाही!

किना-यातून शिड सुटले... कळलेच नाही!
वादळातून ते तरले... कळलेच नाही!
नव्हतीच दिशा कुठली तरी,
मार्ग कसे गवसले... कळलेच नाही!

नभांतून नव्हता तारा(?)... शोधलेच नाही!
हरवला काफिला आपल्यांचा(?)... शोधलेच नाही!
नाहीच उरला मैत्र जीवाचा(?) तरी,
(तू) मला कसे शोधले... कळलेच नाही!

हिमांशु डबीर
५ - ऑगस्ट - २०१०

Wednesday, August 4, 2010

अभिनय

अभिनय

आठवते का तुज
सवाल मी केला होता!
उत्तर देण्याचा तूही तेव्हा
अभिनय केला होता!

का?...
प्रश्न माझ्या ओठांतच विरला होता!
हुंदका दाबण्याचा तूही तेव्हा
अभिनय केला होता!

गेलीस अशी की
ना आलीस तू परतून!
येता आठवण म्हणे झुरण्याचा तूही तेव्हा
अभिनय केला होता!

प्रश्न कसले उत्तर-रहित!
हुंदके कुठले भाव-रहित!
झुरणे कुठले प्रेम-रहित!
सवे तुझ्या जगण्याचा मीही तेव्हा
अभिनय केला होता!

हिमांशु डबीर
१०-जून-२०१०

प्रेरणा - कवीवर्य सदानंद डबीर यांची "अभिनय" हि गझल!