Monday, September 21, 2009

श्रीदेवी!

श्रीदेवी!

नाही नाही मंडळी मी "नवरात्री"बद्दल बोलत नाही! खरतर मी १९-०९-२००९ च्या 'दस का दम' या कार्यक्रमाबद्दल बोलतोय! श्रीदेवी हि माझी लाडकी अभिनेत्री या कार्यक्रमात आली होती! कित्येक वर्षांनंतर तिचे दर्शन घडत होते! तिला पहायला हे दोन डोळे अपूरे पडत होते! आजही ती तितकीच सुंदर दिसते! २ मुलींची आई आहे यावर अविश्वास वाटावा इतकी ती "गोड" दिसते आजही! भराभर तिचे चित्रपट, तिची गोळा केलेली छायाचित्रे, आणि कोणी तिच्याबद्दल चांगले बोलले नाही कि त्याची केलेली "धुलाई" सगळ्या गोष्टी आठवल्या! "सदमा", "मि.इंडिया", "चांदनी", "चालबाज", "लम्हे", "नगिना", "खुदा गवाह" हे तिचे अफलातून चित्रपट! प्रत्येक भूमिका वेगळी आणि तितकीच प्रभावशाली! साक्षात अमिताभ बच्चन जिथे केवळ स्वतःच्या नावावर संपूर्ण चित्रपट तारून नेत होता, तिथे "श्रीदेवी" हि एकमेव हिरॉईन असावी जी केवळ स्वतःच्या नावावर चित्रपट यशस्वी करत होती! "चांदनी", "लम्हे" जणू काही तिच्याचसाठी बनले होते! तिच्यासोबत काम करायला मिळावे म्हणून शाहरूख खानने "आर्मी" या चित्रपटात एक छोटीशी भूमिका केली होती, यावरून तिची लोकप्रियता कळून येते!

मला आठवते, ११-१२वी मधे असेन मी, आमच्या कॉलेजमधे एक मुलगी होती, ती मुलगी या "श्रीदेवी"ची "कर्मठ" "चाहती" होती! तिच्या घरी गेलो होतो तेव्हा तिच्या या "वेडा"ची जाणीव झाली आम्हा मित्र-मंडळींना! जे श्रीदेवी करेल ते सगळे तसेच्या तसे हि करायची! कॉलेजमधे गॅदरिंगला डान्स बसवायचा तर तोही श्रीदेवीच्या गाण्यावरच! अर्थात "श्रीदेवी"चे "वेड" जगणारे काही कमी नव्हते आमच्यात! आमचा आख्खाच्या आख्खा कंपू "श्री"वेडा होता! काय तर म्हणे पानशेत धरण परिसरात शूटिंग चालू आहे, आणि त्यात "श्री" आहे! मग काय आम्ही सगळे सायकलवर पानशेतला! शूटिंग वगैरे काही नव्हते, अफवा होती ती! पण आमचा १०-१२ जणांचा कंपू सुटला पानशेतच्या दिशेने! आजही हि गोष्ट घरच्यांना माहित नाहि (आता माहित होईल)! घरी येईपर्यंत वाट लागली होती पायांची, दोन दिवस कुणीच कॉलेजला गेले नाहि!

प्रत्येकी थोडे थोडे पैसे काढून आम्ही "फिल्मफेअर" वगैरे विकत घेवून त्यातिल "श्री"चे फोटो गोळा करायचो! ते नीटपणे एका वहीत चिकटवून ठेवायचो! कित्येक वेळातर वर्तमानपत्रांतून येणा-या तिच्या चित्रपटांच्या जाहिराती मिळवण्याकरिता आम्ही रद्दीवाल्याशीसुद्धा हुज्जत घातली आहे! वर्तमानपत्राचा कागद लवकर खराब होतो म्हणून मग मेणबत्तीच्या मेणाने त्या जाहिरातीची कॉपी वहिच्या कागदावर उमटवायची आणि त्या कॉपीबरोबर ती जाहिरातही वहिला चिकटवून ठेवायची! काय वाट्टेल ते करायचो! "श्री"चा एखादा फोटो रस्त्यात पडलेला दिसला तर आम्ही तो उचलूनही घेतला आहे कितीतरी वेळा! आणि एकदा असाच उकिरडा फुंकत असताना, एका मित्राच्या आईने पाहिले आणि तिच्याकडून चांगला चोपपण खाल्ला आहे! पण आम्हीपण बिलंदर त्यानंतर त्या काकूंना आम्ही २ वर्षे कुणाही मित्राच्या घरी जाऊ दिले नाहि!(हो ना! उगाच नंतर प्रत्येक मित्राच्या आईकडून मार खावा लागला असता!)

दस का दम या कार्यक्रमात तिला पाहताना जाणवली ति तिची उत्कटता! प्रश्नाचे उत्तर पाहताना तिच्या चेहर्‍यावरचे बदलणारे हावभाव! तिला हळूच "मुह बंद रखो" असे समजवणारा तिचा नवरा बॉनी कपूर! हे सगळेच अफलातून होते!

जसे जसे "श्री"चे दर्शन कमी होत गेले तसे तसे मग तिचे "वेड" पण ओसरू लागले! आम्हीपण वयाने मोठे होऊ लागलो होतो! कितीहि मोठी उडी मारली तरी आपण चंद्राला नाही हात लावू शकणार हे कळायला लागले! मग मित्रपरिवार विरळ झाला, जो तो आपापल्या "करिअर"च्या मागे लागला! त्या वह्या ज्यात "श्री"चे फोटो होते, काळाच्या ओघात कुणाकडे गेल्या हेही आता नाहि आठवत! इतकच काय, पण आता ०८/०९/१०/११/१२वी मधे जे मित्र होते त्यांच्याशी असलेला संपर्कही फार पातळ झाला! पण आमच्या मनांत "श्री"ची जागा घेणारी एकही हिरॉईन आली नाही!

जेव्हा "दस का दम" पाहिले, तेव्हा या सगळ्या गोष्टी परत आठवल्या! या कार्यक्रमातील तिची छबी केवळ डोळ्यातच नाहि तर लॅपटॉपवरपण साठवून ठेवली! लॅपटॉपवरचा साधा वॉलपेपर बदलून तिचाच फोटो लावला! आणि मनापासून म्हटले, " 'श्री' वी मिस यू!!!"


हिमांशु डबीर
२१-सप्टेंबर-२००९

Saturday, September 5, 2009

दान

"दान"

परवा वर्तमानपत्रांतून बातम्या वाचल्या, मिरज गावात उभारलेल्या "अफजल वधाच्या" देखाव्यांवरून म्हणे आपले मुसलमान बांधव पेटून उठले! दगडफेक, जाळपोळ, मारामार्‍या, दंगल यांसारख्या मग 'सोयीस्कर' आणि नित्यनेमाच्या गोष्टी कशा अगदी निरलसपणे पार पडल्या! शूरवीर पोलिसांनी मग अश्रूधूराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवण्याचे काम किरकोळीत केले! आपल्या देशात असे राजरोसपणे चालू असते मग का लक्ष द्या या गोष्टीकडे? पण नाही, हिच प्रवृत्ती घातक ठरत आहे आपल्याला! आपले अलिप्त राहणे हे आजच्या समाजकारण्यांचे आणि राजकारण्यांचे बालेकिल्ले बनले आहेत! त्यांना जाब विचारणे तर दूर, त्यांच्यामागे आपण आंधळ्यासारखे चालत राहतो! आणि काळ सोकावतो!

शिवरायांनी स्वराज्य उभारले ते काही 'हिंदू' राज्य म्हणून नाही, तर एक "हिंदवी स्वराज्य" म्हणून! केवळ "हिंदूंचा" राजा म्हणवून घ्यायला नाहि तर पीडित समाजाला न्याय मिळवून द्यायला आणि अन्याया विरुध्द आवाज उठवून प्रसंगी छातीठोकपणे आपल्या हक्कासाठी लढायला शिकवले त्यांनी! आणि यांच प्रयत्नांतून स्वराज्य निर्माण झाले! राजांनी अफजलचा वध केला, हत्या नाही! हत्या आणि वध या दोहोंत फार मोठा फरक आहे! सुरत जेव्हा शिवरायांनी लुटली तेव्हा इनायतखानाने त्यांच्या शिबिरात आपला माणूस पाठवला तो शिवरायांची हत्या करायला, वध करायला नव्हे! अफजल मारला गेला तो उघड उघड भेटीत! त्याच्या कपटाला राजांनी "जशास तसे" उत्तर दिले! पण राजांनी अफजलचा वध केला तो काही तो मुसलमान होता म्हणून नाही तर तो त्यावेळी समाजाला घातक होता म्हणून! त्याने देवळे तोडली, माणसे बाटवली, स्त्री नासवली, त्या नरधमास रोखणे आणि पर्यायाने त्याचा वध करणे अनिवार्य होते म्हणून!

कुठला धर्म शिकवतो कि दुसर्‍या धर्माचा माणसाला जगण्याचा अधिकार नाही म्हणून? त्यांचा खातमा करा म्हणून कोणता धर्म सांगतो? मला तरी नाहि वाटत कुठला धर्म असे सांगत असेल म्हणून!

तरी आजहि आपल्या देशात त्या अफजलच्या थडग्याची नित्यनेमाने पूजा होते! आपल्या देशाचा पंतप्रधान बेंबीच्या देठापासून कोकालून सांगतो, कि या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे म्हणून! का हा देश हिंदुचा नाही??? सर्वांना समान अधिकार असायलाच हवा ना! हिंदु म्हणून जन्मलो हा काय गुन्हा झाला का?

आणि एवढे सगळे असूनही माझा मुसलमान बांधव ओरडतोच आहे अजुन सुविधा द्या म्हणून! आणि आपले राजकारणीसुद्धा त्यांचे लांगुलचालन करत आहेत! दिले होते ना ५५ कोटी, मग का नाहि गेलात त्या देशात? आता राहिला आहात ना भारतात तर भारतीय म्हणून जगा! जरा काही खुट्ट झाले कि लगेच उठले हे मारायला, का तर म्हणे यांचा इस्लाम खतर्‍यात आहे! अरे माझ्या बांधवांनो, तुमचा इस्लाम का एवढा कमकुवत आहे का? तुमच्या धर्मात सहिष्णूता नाही का? तुमच्याच एका महान संताने १९व्या शतकाच्या सुरवातीला सांगितले होते ते विसरलात का? त्या महान संताचे नाव होते "मेहताबशा"! काय म्हणाले होते ते? ते म्हणाले होते, "सामान देउळ, मशिदिचे| एकची आहे साचे| आकाराने भिन्नत्व त्याचे| मानून भांडू नये हो!" पुढे ते काय म्हणतात, "खुळे देउळ मशिदीची| तुम्ही नका वाढवू साची| ती वाढता दोघांची| आहे हानि होणार|" पुढे ते काय म्हणतात ते फार महत्वाचे आहे. ते म्हणतात, "यवन तेवढा खुदाचा| हिंदु काय भुताचा? पोक्त विचार करा याचा| मनुष्यपण टिकवावया!"

माझ्या बांधवांनो, जरा विचार करा, जोपर्यंत आपण असे जाती-धर्मावरून आपसांतच लढत राहू तोवर आपल्याला मुंबई १९९३, मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट मालिका, मुंबई २६/११, दिल्ली बॉम्बस्फोट, आणि या सगळ्यांत शरमेची बाब म्हणजे आपल्या संसदेवर झालेला हल्ला! संसद हल्ल्याच्या आरोपीला आपण अजूनही पोसतो आहोत! कसाब ज्याने सगळ्या जगा समोर आपल्या देशबांधवांना मारले त्याच्यावर आपण इमाने-इतबारे खटला चालवून त्याच्यावर पैसा नाहक खर्च करतच आहोत! आधी आपण सगळे भारतीय आहोत, नंतर आपल्या धर्माचे! हे आपल्याला कधी कळणार!

आज कोणी एक काही तरी बोलतो आणि आपण लगेच लागतो भांडायला! अक्कल गहाण ठेवली आहे का आपण? माणसे आहोत कि जनावरांच्या झुंडी आहोत आपण? निवडणूकांच्या तोंडावर या गोष्टी घडतात, तेव्हा दंगलीमधे दगडफेक करायच्या आधी तुमच्या डोक्यात हा विचारही येत नाहि का, कि आपण हे का करतोय? काही दुसरे विधायक उद्योग नाहीत का आपल्याला? जाळपोळ करायची, देशाची हानी करायची हि कसली रानटीवृत्ती? यापेक्षा देशासाठी तुम्ही काय करणार, आणि नाही केले तर काय हे प्रश्न विचाराना त्या निवडणुकीत मत मागयला आलेल्या उमेदवारांना! ते नाही जमणार!

विचार करा जरा, लोकसभा मतदान झाले त्यात किती मतदान झाले? ५०% पेक्षा कमी! म्हणजे ५०% अधिक जनतेला असे वाटते कि आजचे राजकारणी राज्य चालवायच्या लायकीचे नाही! पण ज्यांनी मतदान केले त्यातून हे आले निवडून! साधी भाजी घेताना आपण पारखून घेतो, तर मग ज्याच्या हाती आपण आपल्या देशाची सत्ता सोपवतो त्यांची पारख आपण काय एक दारूची बाटली आणि एका १०० रुपयांच्या नोटेवर करणार? कधी येणार अक्कल?

मत न देण्याचा अधिकार आहे आपल्याला! बजवावा कि तो! त्याला सुध्दा मोठि किंमत आहे! पण ते नाही जमणार तुम्हाला, कारण मत न देण्याचा अधिकार बजावलात तुम्ही तर तुम्हाला कोणी बाटली नाही देणार, ना कोणी नोट देणार! मग काय तुम्ही नेहेमीप्रमाणे आंधळ्यासारखे मत"दान" करणार! पण मित्रहो, "दान" या शब्दाचा अर्थ काय, परतीची अपेक्षा न करता जे दिले जाते ते "दान"! पण तुम्ही तर या पवित्र शब्दाचा अर्थच बाटवला आहे!

जास्त काय लिहू! सुज्ञांस सांगणे न लगे! या मतदानावेळी जर परत नेहेमी प्रमाणे घडले तर एक गोष्ट नक्की म्हणावीशी वाटेल "जनतेला अक्कल नसते!"


हिमांशु डबीर
०५-सप्टेंबर-२००९

Saturday, August 22, 2009

एकटा

एकटा

जलांत चिंब भिजताना...
मनांत रितं हसताना...
उरांत रडं दुखताना...
अंगात भिनते एकटेपणं!

खग एकटा फिरताना...
वारा पिसाट घुमताना...
तरू उन्मळून तुटताना...
अंगात भिनते एकटेपणं!

दर्या बेभान उठताना...
तारू दिशा शोधताना...
वारा शिडं तोडताना...
अंगात भिनते एकटेपणं!


बुध्दी विचार करताना...
हृदयांस पीळ पडताना...
काळजांत कळ उठताना...
अंगात भिनते एकटेपणं!


कुणी कुणीच नसताना...
एकटे एकटे असताना...
घर खायला उठताना...
अंगात भिनते एकटेपणं!


सुर्य शांत विझताना...
चंद्र आग ओकताना...
आकाश शून्य होताना...
अंगात भिनते एकटेपणं!


"आई" हाक मारताना...
नजर "बाबा" शोधताना...
प्रतिसाद "तिचा" नसताना...
अंगात भिनते एकटेपणं!


हिमांशु डबीर
२२-ऑगस्ट-२००९

Wednesday, August 12, 2009

इथे प्राणांच्याच निरांजनी होती!

इथे प्राणांच्याच निरांजनी होती!

फौज चालून आली थोर,
थोरले महाराज विजापूरी कैद,
ऐसी भवतीनभवती जाली,
राजांनी मग युक्ती मांडली!

फौज मुठभर मिळविली,
पुरंदरावर उडी मारली,
फतेखान जमला गडाखाली,
म्हणे क्षणांत संपवू हि नादानी!

भ्रांत हि त्याची निमिषांत निमाली,
पुरंदरावरूनि धोंडे सुटती,
फौज तयाची सैरभर जाहली,
पळता भुई थोडकी जाहली!

दाती धरून तृणांची माती, म्हणे खान,
"गोष्ट कैसी आगळी घडली...इथे तो गवतालाही भाले फुटती!... इथे तो गवतालाही भाले फुटती!"


होता सजला शामियाना,
जणू रचिला होता सापळा,
सावज होता खान अफजुल्ला,
म्हणे मारितो आज या शिवाला!

भीतिचे ते रचले ढोंग,
वठविले भ्याडाचे सोंग,
प्रत्येक हालचालिची ती नोंद,
ठेवित होते शिवराय!

वेळ भेटीची जमली,
राजासवे माणसे दहा निघाली,
बंडा सय्यद उभा शामियानी,
राजाने मनात शंका धरिली!

शंका राजाची निवाराया,
खाने सय्यद दूर धाडिला,
हात पसरुनि "आओ" म्हणाला,
मनी मात्र हेत आगळा धरिला!

गर्दन डाव्या बगलेला,
दाबून कट्यारीचा वार काढिला,
चिलखताशी वार आडिला,
अन् शिवराये डाव साधिला!

वाघनखे ती चालविता जाला,
कोथळा खानाचा लोंबू लागला,
"दगा... दगा..." खान कोकलला!
परी तयाचा खेळ संपला!

पराक्रमा त्या पाहून "इतिहास" वदला... "येथेच नरातून सिंह घडला...!!येथेच नरातून सिंह घडला...!!"


स्वराज्याचा झंझावात सुटला,
निवेद अफझुल्याचा पचला!
तळ-कोकण कब्जा जाला,
पन्हाळी तो अंमल बसला!
हल्ला विजापुरी आला,

शत्रू दसहजारी जमला,
उघड मैदानी सोहळा सजला!
गोदाजी, नेताजीसह खुद्द शिवाजी रणी उतरला!
रणांगणी तो जोर चढला,
शत्रूचा तो धीर खचला,
सैरावैरा तो पळत सुटला,
थेट विजापूरी जाउन थांबला!

बडी बेगम पुसे अल्लाला..."या खुदा हा कैसा खेळ मांडिला?.. इथे तो हुंकारातून वादळ जन्मला!.. इथे तो हुंकारातून वादळ जन्मला!"



जेर कराया शिवाजीला,
जौहर तो सिद्दी निघाला,
राजा होता पन्हाळ्याला,
म्हणे येथोनिच भांडू जौहराला!
लागला होता पावसाळा

परी सिद्दी जिद्दीला पेटला,
नेटाने तो वेढा चालविला,
राजांनि मग जासूद धाडिला!
निरोपाने त्या कार्यभाग साधिला,
वेढा नकळत गाफिल जाहला!

जौहरास तो ईरादा उमगला,
फौज सुटली पाठलागा!
घोडखिंडीत लढा पेटला,
राजा विशाळगडी निसटला,
बांध खिंडीला पडला,
उभा होता फक्त तीनशे मावळा!

म्होरक्या तो हिरडस मावळाचा,
खडा पहा तो, "बाजी देशपांडा"
होता तो ईरेस पेटला,
म्हणे (शत्रूला) आधी निस्तर मजला,
मगची भेटे राजा तुजला!

सिद्दी बोले ऐकून समाचारा (खिंडीतल्या लढाईचे वृत्त)
"कैशाची हि माणसे बनली!?... इथे तो छातींचेही कोट घडति! इथे तो छातींचेही कोट घडति!"


अफझुल्याच्या लढ्यासमयी, अवघा मावळ एक झाला,
परि त्यातून एक सर्वांतूनि आगळा राहिला,
स्वराज्याचा तो गद्दार पहिला,
नाव तयाचे खंडोजी खोपडा!

म्हणे काय वाचतो हा शिवराया,
मारिल यासे हा खान अफझुल्ला,
परि त्याचा अंदाज चुकला,
खान स्वतःच गर्दिस मिळाला!
खोपडा भय खाउन पळाला,

रोष शिवरायांचा ओढावला!
शरण अखेर येता जाहला,
कन्होजींकरवी शब्द लाविला! (कान्होजी जेधे)
(शिवरायांच्या) नजरेला नजर तो देता जाला,
क्षणात खोपडा पूरता भेदरला,

राजांचा तो हुकूम सुटला,
पाय डावा अन् हात उजवा (याचा) छाटावा!
राजे सखोंबीतसे जेध्यांना
"गद्दाराला माफी कैसी? उद्या ऐसे अनेक जन्मती,
स्वराज्यासी हि किड ऐसी, आम्हास ना खपणारी!
शब्द तुमचा म्हणून जिता सोडिला, नातरी छाटले असते मुंडक्याला!"

जेधे बोलला मनाला, "कैसा जाणता राजा लाभला, केवढा थोर विचार वदला! याचे तो हृदयात अंगार फुलला!...याचे तो हृदयात अंगार फुलला...!!"


मिर्झाराजा चालून आला,
सवे घेउन दिलेरखाना!
पुरंदरासी तो वेढून बैसला,
(जिंकण्याचा) शिकस्त तो थोर चालला!

सफेद बुरुज तो उडविला,
प्राण पुरंदराचा कंठी आला,
फास तो आवळत चालला,
मुरारबाजी कासाविस जाहला!

योजना तो आखता झाला,
म्हणे फोडून जाऊ वेढ्याला!
उघडून किल्ल्याच्या द्वारा,
रणशिंग तो फुंकता जाला!

दिलेर होता हत्ती बैसला,
ओरडून बोले तो मुरारा,
"ये सैन्यात माझ्या, देतो मनसब तुजला!"
झिडकारले त्या अमिषा, पेलला हातात भाला,
जळजळीत नजरेने मुरार बोलला, "घे हि तुझी मनसब तुला!"
खान तो चकित झाला,
तीर (कमानीतून) सोडता जाला,
लक्षून मुराराच्या कंठा
मुरार पडला रणांगणा!

खान होता दिलेर,
बोलता जाहला सत्वर, "ऐसा न शत्रू पाहिला... सलाम तुझ्या शौर्याला!
जैसा पाहता तु मजला...नजर तुझी अंगार होता!...नजर तुझी अंगार होता!"


मिर्झाच्या राजकारणास,
राजा झाला मवाळ,
दिली मान्यता तहास,
निघाला औरंग्याच्या भेटीस!
होता औरंग्याचा वाढदिवस,

जमला होता दरबारास,
म्हणती जयाला "दिवाण-ए-खास"
येथेच भेटला राजा औरंग्यास!
राजा उभारला मनसबेस...
परी पाहून पुढे जयसिंगास,
उसळला तो नरसिंहासमान,
बोले "हा तर उघड अपमान,
नको मजला हि मनसब!"

निघाला राजा तडक,
अर्धा सोडून तो दरबार,
सरदार जाहले स्तंभित,
म्हणती काय हि आगळिक!

औरंग्या राहिला स्वस्थचित्त
परि चित्ती करितसे विचार,
"खरेच हा आहे शूर,
उगा ना पळाला मामा शाइस्त!"

औरंगजेब बोलला खुदासी,
"शुक्र है अल्लाचा, दुश्मन दिया तोभी शिवा जैसा!
याच्या तो वाणीतही विजा गर्जतात! याच्या तो वाणीतही विजा गर्जतात!"


दिवस होता जून सहा
रायगड होता सजला,
सह्याद्रितो आनंदला,
राजा आज "छत्रपति" बनला!

सप्तसरितांचे वारी,
आणविले स्नानासी,
सोहळा मोठा राज्याभिषेकी,
वेद उच्चारती ऋषी-मुनी!

राजा सिंहासनी बसला,
मनात आठवणींचा पूर लोटला,
राजा गहिवरोन गेला,
आठवे तो तानाजीला,
आठवे तो मुरारला!

पुरंदराच्या लढ्यासमयी
पहिलीच उसळली होती गर्दि,
पडली त्यात ज्यांची आहूति
आठवती ते पासलकर बाजी!

आठवला तो शिवा न्हावी,
फसविला ज्याने जौहर सिद्दी!
गेला हसत चालून काळाच्या मुखी
म्हणे राजाचे कार्य नेतो मी सिद्धी!

हृदयी कळ उठली..
आठवता ते प्रभूबाजी
पराक्रमाचे ते मेरूमणी!
एकहाती खिंड अडविली
स्वर्गालाच घातली गवसणी, दिन होता गुरुपौर्णिमी!

दाटला कंठ स्मरता प्रतापरावासी (प्रतापराव गुजर)
म्हणती काय वेडेपणा केलासी!
कैसे चुकवू तुमचे ऋणांसी!
एक-एक पायरी (सिंहासनाची), तुमची आहूति!

सुवासिनी राजाला ओवाळती, घेवून अनेक निरांजनी,
वदला राजा पाहून निरांजनीसी "या तो त्यांच्या प्राणज्योती!! इथे प्राणांच्याच निरांजनी होती... इथे प्राणांच्याच निरांजनी होती...!!"



हिमांशु डबीर

११-ऑगस्ट-२००९

Monday, August 3, 2009

हट्ट

हट्ट

नाही मजला हट्ट त्या बेहोष मोग-याचा,

नाही मजला हट्ट त्या बेधुंद कुंदकळ्यांचा!

परी सांग आता तू हृदयी गुलाब होशील ना? होशील ना?


नाही मजला हट्ट चिंब भिजल्या पावसाचा,

नाही मजला हट्ट रम्य खुलल्या इंद्रधनूचा!

परी सांग आता तू स्पर्शातून मोहरशील ना? मोहरशील ना?


नाही मजला हट्ट गीतांतल्या शब्दांचा,

नाही मजला हट्ट सुरेल त्या मैफिलीचा!

परी सांग आता तू ओठांवरी ओथंबशील ना? ओथंबशील ना?


सोडला बघ राणी हट्ट मी निशिगंधाचा,

सोडला बघ राणी हट्ट मी रातराणीचा!

परी सांग आता तू मिठीतून बहरशील ना? बहरशील ना?


हिमांशु डबीर

०३-ऑगस्ट-२००९

Friday, July 31, 2009

सह्याद्रिचे अभ्यंग-स्नान!

आषाढातल्या त्या कृष्णमेघांनी जणू पृथ्वीला आच्छादून टाकले होते! दिवस-रात्र हे त्या ढगांच्या आडून त्यांची मार्गक्रमणा करत असले तरी या काळ्या-सावळ्या ढगांनी या धरेवरील वातावरण कुंद करून टाकले होते! काहिसे गूढ पण तरीही रम्य असे त्या निसर्गाचे वर्णन करावे अशीच ती अदाकारी होती या निसर्गराजाची! पुरुषभर उंचीचे गवत... गवत कसले ते तर "रान माजले" होते! त्यात गुडघा गुडघा साचलेला चिखल! विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट आणि संगीताचा ताल धरल्याप्रमाणे बरसणा-या जलधारा! वरूणराजाच्या प्रेमाला या वसुंधरेचा प्रतिसाद म्हणून रुद्र-भीषण नाद करत आक्राळविक्राळपणे थेट पाताळात उडी ठोकणारा तो प्रपात! छे... हि तर साधीसुधी कविकल्पना! प्रेमाचा प्रतिसाद कसला हे तर या रांगड्या सह्याद्रिचे "अभ्यंग-स्नान"! याच रांगड्या सह्याद्रितून जन्माला आलेल्या या नद्या, हे ओढे हे कसे मग मागे राहतील! हे सगळे आपल्या वडिलांच्या अभ्यंग-स्नानामधे रित्या होणा-या वरूणराजाच्या जलकुंभातले जल घेवून उफाट्याने धावत सुटले होते! जणू यांना सगळ्यांना आपल्या प्रियकराला... त्या "सागराला" भेटायची घाई झाली होती! काय सांगावा तो आवेग, तो आवेश, तो जल्लोष! तो धडकी भरवणारा आवाज! अनुभव घ्यायचा म्हणजे काही सोपे नाही... हे काय आपले दिवाळीतले आई, ताई, पत्नी यांचे स्नेहार्द्र स्पर्शांचे आणि मधूर आवाजातील गाण्यांचे, त्यांच्या ओवाळणीचे अभ्यंग-स्नान वाटले कि काय? हे या सह्याद्रिचे अभ्यंग-स्नान आहे, जिथे स्नान घालायला साक्षात वरूणदेव येतात! मनसोक्तपणे आपले जलकुंभ त्यांच्या लाडक्या पुत्रावर या सह्याद्रिवर रिते करतात! लहानग्या ओहोळांपासून... मोठाल्या नद्यांपर्यंत! मोराच्या केकारवापासून त्या उन्मत्तपणे कोसळणा-या प्रपातांपर्यंत सगळेजण गाणी गातात! मधूनच साक्षात सूर्यदेव दर्शन देवून इंद्रधनूने या सह्याद्रिला ओवाळतात, अन् हि धरा तिच्या लेकाला अनेकविध वृक्षवल्लींनी मोठ्या मायेने सजवते! काय तो सोहळा! काय तो थाट! सारेच नवल! सारेच शब्दांच्या पलिकडले!

या सह्याद्रिच्या अभ्यंग-स्नानाची खरी मजा लुटायची असेल तर खर सांगतो या सह्याद्रिच्या अंगा-खांद्यावर शिवरायांनी सजविलेल्या गड-किल्ल्यांवर जायला हवे! दुर्गमहर्षी गो. नि. दांडेकर यांनी केलेले रायगडावरील महादरवाजाच्या जवळच्या प्रपाताचे वर्णन जगायला हवे! गोनिदा लिहितात, "..हा गंगासागराचा पाणलोट, तो मात्र बहु आनंददायी आहे. काय आहे, की गंगासागरालाच काही झरे आहेत. गंगासागराचं जलवहनक्षेत्र (कॅचमेंट एरिया) आहे, ते तसं काही फार मोठं आहे असं नाही. पण जे आहे, त्यातूनच गंगासागरात भरपूर पाणी एकत्र होतं. त्या शिवाय जे पाणी, ते तिथून उतरून महाद्वाराच्या शेजारून खाली उडी घेतं. आणि त्याचा हा प्रपात!"

गोनिदा पुढे म्हणतात, "... गंगासागर हे महातीर्थ! सप्त पुण्यसरितांच पाणी राज्याभिषेकानंतर राजांनी त्या तलावात ओतवलं होतं. त्याचा लवलेश शेष तर उरला असेल, की नाही अजून! तर या पुण्यजलाचं ते स्नान इतकं सुखदायी होतं. आपण स्नान करताना मंत्र म्हणतो, 'गंगेच यमुने चैव गोदावरि सरस्वति| नर्मदे सिंधु कावेरी, जलेऽस्मिन् संनिधिं कुरु||' सगळ्या भरतखंडाची विशालभूमी पावन करीत वाहणा-या या नद्या, त्यांचं जळ त्या प्रपाताच्या वाटे आपल्या अंगावर कोसळत असतं, ही कल्पनाच किती आनंददायी आहे!"

गोनिदांनी केलेले या प्रपाताचे वर्णन आता कळसाला येते... स्नान सोहळा आटोपल्यानंतर ते पुढे म्हणतात, "मन म्हणत राहतं, केवढ तुझं दैव! प्रत्यक्ष राजानं ज्या जळानं स्नान करून राज्याभिषेक करून घेतला, त्याच जळांन तूही स्नान केलसं! यापरतं भाग्य म्हणतात, ते असतं तरी काय?"

किती सुंदर हे वर्णन! आता पावसात जेव्हा जाउ रायगडावर तेव्हा रायगड पाहायच्या आधी या प्रपाताखाली स्नान केल्याशिवाय आपण पुढे जाणारच नाही!

असाच एक नितांत सुंदर क्षण मलाही लाभला! तोरण किल्ला! जेव्हा आम्ही तोरण्याच्या पायथ्याला पोचलो तेव्हा तोरणा ढगांच्या शालीखाली दडून बसला होता! त्याच्यासवे लपंडाव खेळत खेळत आम्ही गडाच्या अखेरच्या चढाईला आलो! इथे आपले स्वागत करतो तो एक प्रपात! पुणे दरवाजाच्या बाजून चढाई करताना हा प्रपात आपले डावेबाजूस कोसळत असतो! उंच आहे हा भरपूर आणि ऐन पावसात तर हा खूप मोठा असतो! काय सुंदर चव असते हो या पाण्याला! बिनधास्तपणे प्या! या प्रपाताखाली उभे राहून त्याच्या जोर अनुभवा! कुणीतरी मालिश करत आहे असेच वाटेल तुम्हाला! इथे उभे असताना गोनिदांच्या ओळी मनात रुंजी घालू लागल्या... "राजाने ज्या पाण्याने स्नान केले त्याच पाण्याने तूही स्नान केलेस! केवढे तुझे भाग्य!" मन अलगद शिवरायांच्या काळात गेले! तोरणा किल्ला जिंकून राजांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले. स्वतंत्र राज्याची हि पहिली स्वतंत्र भूमी! आणि मग मन या प्रपाताचा उगम शोधू लागले. आणि वाटले, की कोठी दरवाजाच्या पलिकडे जो एक जलाशय आहे, त्यातूनच तर हा प्रपात उगम पावत असेल! मन मोहरले, शरीर शहारले! स्वतंत्र भूमीवर पाउल ठेवून राजाने जिथले पाणी प्यायले, त्याच जलाशयातले पाणी पिण्याचे सुख मला मिळाले! गोनिदांच्या प्रेरणेने सुचलेली हि संकल्पना! मग या प्रपाताला मागे ठेवून आम्ही किल्ल्यावर पोहोचलो! चिणला दरवाजा, भगत दरवाजा यांना परत एकदा डोळे भरुन पाहिल्यावर माझ्या सगळ्यात लाडक्या "झुंजार माची"वर आलो! अंगात रग असेल आणि काळजात हिंमत असेल तरच भर पावसात झुंजार माचीवर जा! जेव्हा "तोरणा किल्ला" काय आहे हे कळण्याचे वय नव्हते तेव्हा पासून मी या किल्लावर जातो आहे! दरवेळेस "झुंजार" मला बोलावतेच! झुंजार माचीच्या टोकावर राजगडाकडे तोंडकरून उभा राहिलो, राजगड दिसत नव्हताच, पण बदाबदा कोसळणारा पाऊस, तोरण्याच्या अंगा-खांद्यावरुन उड्या मारणारे असंख्य छोटे-मोठे प्रपात! हा सह्याद्रिचा अभ्यंग-स्नानाचा सोहळा मी स्वतः साक्षात अभ्यंग-स्नान करत पाहत होतो! त्या झुंजार माचीच्या सर्वोच्य ठिकाणी मला दिसणारा आसमंत नजरेचे पारणे फेडणारा होता! सरळसोट सुटलेले ते सह्यकडे... जिथून खालच्या वेल्हा गावापेक्षा स्वर्ग जवळ वाटावा! मागे बेलाग आणि भक्कमपणे उभा असलेला खुद्द तोरणा! असा तो सगळा सोहळा! पापणी जराही लवत नव्हती... तेव्हा आजच्या सारखे "डिजिटल कॅमेरे" नव्हते आणि ना माझ्याकडे कुठला साधा कॅमेरा होता... त्यामुळे हा सगळा अभ्यंग-सोहळा मी आधाशा सारखा माझ्या नजरेत साठवून ठेवत होतो! जणु समाधी लागली होती माझी! त्या पवित्र सोहळ्याचा एक छोटासा साक्षीदार होतो याचा मला आजहि अभिमान आहे!


हिमांशु डबीर

३१-जुलै-२००९

Saturday, June 27, 2009

एक फ्युनेरल!

एक फ्युनेरल!

एकदा मी एक "फ्युनेरल" पाहिले! सगळे लोक जमलेले होते त्या स्मशानभूमीत, काळ्या - पांढर-या कपड्यांत! काही रडत होते, तर काही शांतपणे मोठ्या प्रयासाने डोळ्यांतील पाणी मागे सारत होते! केवढा तो निर्धार! त्या स्मशानभूमीच्या बाहेर उभारून मीपण ते सगळे पहात होतो! जे कोणी तिथे होते त्यांचा मी कोणीच नव्हतो, आणि जे कोणी तिथे होते त्यांतले माझे कोणीच नव्हते! पण तरीही मी तिथेच थांबलो होतो! काही साधे सैनिक होते तर काही सैन्यांतील अधिकारी होते. बिगुल वाजत होता आणि सात सैनिकांनी ३ वेळा बंदुकीच्या फैरी झाडल्या! जि कोणी व्यक्ती "गेली" होती तिला दिलेली ती सलामी! इतक्यात मला त्यांतल्या एका वयस्कर माणसाने त्याच्याजवळ बोलावले. मी त्याच्यापर्यंत गेलो. बसलो त्याच्या शेजारी! तो जराही रडत नव्हता! देशाचा झेंडा त्या शवपेटीवरून काढून एका विशिष्ट शैलीत गुंडाळून त्या मृत व्यक्तीच्या नातलगाला सैन्यातल्या एका वरिष्ठ अधिका-याने दिला. खालीवाकून तो झेंडा त्याने दिला तेव्हा तो म्हणाला, तुमचा नातलग खूप शूर होता, त्याच्या जाण्याने अवघ्या देशाची हानी झाली आहे! या दु:खात संपूर्ण लष्कर, संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे! तेव्हा त्या ६.५फूट उंच माणसाला फुटलेला हुंदका मला चार रांगा मागे पण ऐकू आला! आणि लक्ष गेले त्या माणसाच्या बाजूला उभ्या असलेल्या चिमुरड्या गोंडस मुलाकडे! त्याला बिचा-याला कळतही नसेल हे काय चालू आहे! तो त्या माणसाला खूप घट्ट बिलगून उभा होता! मला ज्या वयस्कर माणसाने बोलावले होते तो खूप शांतपणे उभा होता. मला तो म्हणाला, या माणसाची बायको होती ती जिचे हे "फ्युनेरल"! मी त्या मुलीचा बाप आहे! मला काय बोलावे सुचेना! मला शब्द सापडतच नव्हते! त्या माणसाचा हात मी हातात घेतला आणि एकटक त्याच्याकडे पाहात बसलो! थोड्यावेळाने ते "फ्युनेरल" संपले आणि प्रत्येकजण निघाला! तो वयस्कर गृहस्थपण निघाला, मला "थँक्यू" म्हणाला, का ते नाही समजले मला? पण मी परत काहीच बोललो नाही, नुसतेच त्याच्या खांद्यावर थोपटल्यासारखे केले आणि तो निघून गेला!

मी निघालो तेव्हा मला एक संवाद ऐकू आला! एक साधारणतः ४०-४५ वर्षांची स्त्री एका सैनिकाबरोबर बोलत होती, "युद्धावर काय परिस्थिती आहे? माझ्या मुलाचा मला गेल्या २ महिन्यांत काही संपर्क नाही. तो याच स्रीच्या युनिट मधे होता, जिचे आज हे फ्युनेरल होते! त्याचे बाबा ३ महिन्यांपूर्वीच निवर्तले, त्यावेळी जो काही संपर्क झाला तो शेवटचा! तो त्यांच्या "फ्युनेरल"ला पण नाही येवू शकला! काय झाले आहे, तो सुखरूप आहे ना? खरतर तो माझा सावत्र मुलगा आहे, पण त्याच्या बाबांची इच्छा होती की एकदातरी त्याने त्यांना भेटावे, पण ते काही घडले नाही. खरे कोणीच सांगत नाही, त्याच्या युनिटमधील हि स्त्री शेवटची होती, आख्खे युनिट संपले, पण त्याचे बाबा गेल्यापासून सैन्यातूनपण मला काहीच माहिती मिळत नाही!"

तो सैनिक सगळे ऐकत होता, काही बोलत नव्हता. त्याची अस्वस्थता माझ्या नजरेतून सुटली नाही ना त्या स्त्रीच्या! त्यामुळे ती अजूनच अजिजीने बोलत होती. "तू त्याचा जवळचा मित्र आहेस, मला माहित आहे, तुम्ही खूपदा मजा करायचात, तो सुट्टीवर आला, की तुम्ही भेटायचात, पार्टीला जायचात, मला खरं सांग रे, माझा मुलगा कुठे आहे? कागदोपत्री मला त्याच्या आयुष्यात काही स्थान नाही त्यामुळे सैन्यदल मला काही सांगत नाही! पण याचे बाबा माझ्या रोज स्वप्नात येतात, मला विचारतात, कुठे आहे माझा मुलगा म्हणून? मी काही उत्तर नाही रे देवू शकत त्यांना! मला मदत कर प्लिज!" तो सैनिक थोडासा मागे उभा राहिला होता, काही म्हणजे काही बोलत नव्हता तो! मला त्याचा खरतरं खूप राग येत होता, वाटत होते, अरे ती माता इतकी आर्जवे करत आहे, सांग ना काहीतरी तिला! सरतेशेवटी त्या स्त्रीने त्याला एकच प्रश्न विचारला आणि मीपण हबकलो! तिने विचारले," जर मी त्याची खरी आई असले असते तर मला पण झेंडा मिळाला असता का....?"

माझ्या डोळ्यांत आसवे होती... का कोण जाणे त्या स्त्रीचे ते बोलणे मनाला भेदून जात होते! कायद्याच्या परिभाषेत ती त्याची माता नसल्याने सैन्याकडून तिला कोणतीच मदत मिळत नव्हती आणि म्हणून ती दरवेळी सैन्यदलाच्या सगळ्या "फ्युनेरल" ला हजर राहत होती! कोणीतरी काहीतरी तिला सांगेल आणि ती तिच्या सावत्र मुलाच्या सख्या बाबांना काहीतरी उत्तर देवू शकेल!

तो सैनिक आता मात्र बोलला, म्हणाला "जर तू त्याची कायदेशीर माता असतीस तर तुला झेंडा मिळाला असता! पण खरं सांगू फक्त झेंडाच मिळाला असता, त्याचा मृतदेह सैन्यालासुध्दा नाही सापडला!"

ती स्त्री तिथेच कोसळली, तिचा आक्रोश तिथे उपस्थितांच्या काळजाला घरे पाडून गेला! किती हि विदारकता! अवघा २४ वर्षांचा होता तो! आणि त्याच्या जाण्याने या त्याच्या सावत्र आईला जवळपास वेड लागले होते! कारण तिला कोणीच काही माहिती देत नव्हते, आणि तिच्या पतीची स्वप्ने तिला स्वस्थपणे झोपू देत नव्हती! ती स्त्री तिथेच बेशुद्ध पडली! माझ्या मनात वेगळाच विचार आला, बरे झाले तिची शुद्ध हरपली, निदान त्यामुळे तरी तिला आता थोडीशी झोप मिळेल!

हिमांशु डबीर

Tuesday, June 16, 2009

बाप माणूस


२१-जून-२००९ हा दिवस "फादर्स डे" म्हणून साजरा केला जातो! हि कविता माझ्या बाबांसाठी!

बाप माणूस


अखंड उत्साहाचा तो सागर आहे,
शितल कधी, कधी क्रुद्ध ज्वाला आहे,
सहज कधी, कधी जटील आहे,
असा माणसांतील तो "बाप माणूस" आहे!


परिस्थितीशी तो झुंजला आहे,
आम्हा लहानांत तो रमला आहे,
आमच्या आयुष्याचा तोच चित्रकार आहे,
खरंच, तो एक "बाप माणूस" आहे!


धमन्यांतून त्याचेच रक्त वाहते आहे,
मनमानसातून त्याचीच जिद्द सळाळते आहे,
हृदयातून त्याचे चैतन्य तळपते आहे,
असा हा माणूस माझा "बाप" आहे!

हिमांशु डबीर
२१-जुन-२००९

Saturday, June 13, 2009

साक्ष

साक्ष

हात होता हातात अन् नजर होती भिडलेली
लडिवाळ हालचाल अन् मौज होती स्पर्शाची
तुझ्या माझ्यातील गंमतींना, साक्ष होती पारिजाताची!

अवघेच होते नवखे, तुला मी अन् मला तुही
हुरहुर अनामिक हृदयी अन् धुंदी होती श्वासांची
तुझ्या माझ्यातील धाडसांना, साक्ष होती पारिजाताची!


सुरुवात होती सहजीवानाची, अन् ओढही सहवासाची
नजरेत होते आवाहन, अन् आलिंगनात होते आवेगही
रात्रीच्या आरक्त क्षणांना, साक्ष होती पारिजाताची!


हिमांशु डबीर

१३-जुन-२००९

प्राजक्त

प्राजक्त

कोमेजून जाईल तो, हात तयाला लावू नको

शापित आहे जणू यक्ष तो, त्याला तू शिवू नको,

पहा दुरोनिच तया, सौंदर्यास त्या बाधू नको,

ओव गजरा त्याचा, परी तो माळू नको

देवा घरचा आहे तो, त्याला माणसाळू नको

पहाटेचाच आहे सोबती तो, सांजवेळी तया शोधू नको,

रात्रीच्या आरक्त क्षणांचा, आहे प्राजक्त तो

रात्रीच्या आरक्त क्षणांचा, आहे प्राजक्त तो


हिमांशु डबीर

१३-जुन-२००९

प्राजक्त सांडला!

प्राजक्त सांडला! प्राजक्त सांडला!

उगवतीला प्रकाश फाकला, पहाटेच्या धुंदीत शुक्र मोहरला,
हलकासा धुक्याचा पदर पसरला, सोनकिरणांतून धरतीचा सखा अवतरला !
पहा सखे अंगणात तो प्राजक्त सांडला! तो प्राजक्त सांडला!

स्पर्श होता तुझा कोवळा, जीव माझा आतुरला,
सलज्ज नेत्रपाकळी अन्, मुखडा तव आरक्तला!
पहा सखे अंगणात तो प्राजक्त सांडला! तो प्राजक्त सांडला!

आरक्तरात्र प्रहर सरला, बहर प्रणयाचा अन्, तव देह दरवळला!
पृथ्वी-चंद्र मीलन-क्षण, हलकेच बघ त्या दवांत गोठला!
पहा सखे अंगणात तो प्राजक्त सांडला! तो प्राजक्त सांडला!

हिमांशु डबीर
१३-जुन-२००९

Thursday, June 4, 2009

निरोप-समारंभ

वेळ तुमची संपली,
गरज तुमची सरली,
निरोप-समारंभाने मला
उखडल्याची जाणीव दिली!

वर्षे अनेक झिजली,
लोभने योजने सोडली,
निरोप-समारंभाने मला
उप-याची समज दिली!

हृदयाने विचारली,
बुद्धीने आचरली,
निरोप-समारंभाने मला
मनाची उपेक्षा दर्शविली!

दैदिप्यमान कारकीर्द,
चढता यशाचा आलेख,
निरोप-समारंभाने मला
'एकट्याची' सोबत दिली!

कालाय तस्मै नम:|
नमस्कार ऐसा स्वत:,
निरोप-समारंभाने मला
'माझी' नवी ओळख दिली!



हिमांशु डबीर
०४-जुन-२००९

Monday, June 1, 2009

अश्रू

अश्रू

तळपते वीज आकाशी, टक्कर मेघांची,
आठवण कुठलीशी, त्याच्या मनी...

उमलते तान गळ्याशी, कमाल गायकीची,
जागा कुठलीशी, त्याच्या नेत्री...

उसळते लाट सागरी, साक्ष प्रेमाची,
काटा कुठलासा, त्याच्या तळवी...

खुलते कविता, मिसाल कवीची,
शब्द कुठलासा, त्याच्या हृदयी...

निखळतो तारा, अश्रू देवाचा,
श्वास अखेरचा, त्याच्या अंतरी...

हिमांशु डबीर

Thursday, May 28, 2009

स्वप्नांची मौने

स्वप्नांची मौने
ती:

तू म्हणतोस मला पाहताना शब्द वाक्यांना मिठी मारून बसतात अन् वाक्ये नजरेतून बोलू लागतात!
शब्दांचे महत्वच तू असे खोडून काढतोस,
सांग ना एकदा तरी मला, तू तरी शब्दांशीच का असा खेळतोस?

तो:

शब्द म्हणजे काय ग, एकत्र जोडली निरर्थक अक्षरे,
त्यांना आपण जोडली ती हवीती अर्थांतरे,
आपण म्हणू तीच त्यांची भाषांतरे,
मनाच्या खोलात रुजलेली, ती तर स्वप्नांची मौने,
नजरेतून जो संवाद चाले, सांग तो का शब्दांसाठी लाचारे???!!!

ती:

तू म्हणतोस, शब्द म्हणजे एकत्र जोडली निरर्थक अक्षरे,
शब्दांच्या अस्तित्वालाच तू एक शून्य करून ठेवतोस,
सांग ना एकदा मला, तरी तू मौनपणे असे शब्द का रंगवतोस??

तो:

शब्द म्हणजे काय ग, भावनांना जोडली रेशीम उपरणे,
सुंदरशा स्त्रीने ल्यालेली नक्षीदार आभूषणे,
नभी सजलेले ते नक्षत्रांचे देणे,
मनाच्या गाभा-यातील नंदादीप तेवणे,
जिथे जुळली मने, तिथे सांग कोण गातो या शब्दांचे तराणे??!!


ती:

अच्छा, म्हणजे शब्द तुझे, प्रेमाचे बहाणे!
शब्द म्हणजे, तुझे मला रिझवणे!
शब्द म्हणजे, तुझे मला सजविणे!
शब्द म्हणजे, तू मला कवितेत पहाणे!
शब्द म्हणजे, तू मला भुलवणे!
शब्द म्हणजे, तू सगळे नि:शब्दपणे सांगणे!
शब्द म्हणजे, मी तुला भान हरपून ऐकणे!!!


हिमांशु डबीर

बायको, हे फक्त तुझ्यासाठी...

माझ्या पत्नीला - निकिताला, माझ्या मिठीत जेव्हा जेव्हा पाहतो, तेव्हा तेव्हा मला असेच वाटते!!!
जेव्हा ती आता भारतात अन् मी अमेरिकेत आहे, तेव्हा तिची ओढ जास्त जाणवते!
-------------------------

तुला पाहताना शब्द वाक्यांना मिठी मारुन बसतात,
अन् वाक्ये नजरेतून बोलू लागतात,
तू माझी होताना, शब्द मिठीतच विरघळतात,
मिठी ती किती हळवी, शब्द त्यातही गुदमरतात,
तुझ्यामाझ्या प्रेमाचे क्षण, नित्यनविन अलंकार लेवून,
शब्दही त्यांचे सोहळे साजरे करतात!


हिमांशु डबीर

Tuesday, May 26, 2009

चंचला

चंचला

चिंब भिजल्या जलधारांसम,
मी ज्वलंत बुलंद आहे!
देवा-धर्माच्या नास्तिकांनो,
वीज ती, माझा हुंकार आहे!


गरजणा-या मनस्वी मेघांसम,
मी भीषण भयाण आहे!
उलट्या काळजाच्या मानवी पशूंनो,
मनस्वीता ती, माझी धमनी आहे!


कडाडणा-या त्या चारूतेसम,
मी प्रताप रुद्र आहे!
कलीयुगाच्या पुजा-यांनो,
चारुता ती, माझा श्वास आहे!


काळ्या नभातील चंचलेसम,
मी रौद्र-क्रुद्ध आहे!
सावध असा षंढांनो,
चंचला ती, माझी सखी आहे!


हिमांशु डबीर

२६ मे २००९

Monday, May 25, 2009

प्रतिबिम्ब

प्रतिबिम्ब

दिवस कसाही सरतो,
रात्र काही सरत नाही,
डोळ्यांत आसवेच फक्त,
झोप काही येत नाही!


उजेड नकळत संपतो,
भयाण काळोख कळत नाही,
लखलखाट दिव्यांचा शहरी,
उरीचे तेज दिसत नाही!

पसारा उरकतो सतत,
मला मीच सापडत नाही,
हात हवेतच हिंदोळतो,
स्पर्श तुझा लाभत नाही!


कामाच्या ढिगात गुंफतो,
विरंगुळा काही उरला नाही,
डोळ्यांत शीण साचतो,
तव दिलासा मिळत नाही!


सवयीचे झाले म्हणतो,
सवय काही होत नाही,
रोज सकाळी आता,
मीच मला ओळखत नाही!


हिमांशु डबीर
०५ मे २००९

Saturday, March 28, 2009

संकल्प

संकल्प


ठरविलेच आहे मी, तुझ्या प्रत्येक श्वासात गुदमरायचे,

उर भरून श्वास घेऊन... परत नव्याने जगायचे!

प्रत्येक श्वासात तुझ्या, माझे अस्तित्व विसरायचे...


ठरविलेच आहे मी, तुझ्या प्रत्येक मिठीत रुतायचे,

पाठीमध्ये रूतल्या बोटांना अलगद सोडवायचे!

प्रत्येक मिठीत तुझ्या, माझे सर्वस्व अर्पायचे!


ठरविलेच आहे मी, तुझ्यावर फक्त प्रेम करायचे,

रोज उठून तुझ्या परत प्रेमात पडायचे!

प्रेमामधे तुझ्या, आपले विश्व थाटायचे!


हिमांशु डबीर

Wednesday, March 25, 2009

सेवानिवृत्ती

आमचे बाबा रिटायर होवून आता जवळपास २.५ वर्षे होतील. या सेवानिवृत्तीनंतर काय यावर त्यांनी काही दिवसांपूर्वी एक छोटासा लेख लिहीला आहे. त्यांच्या परवानगीने हा लेख मी माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध करत आहे.
जवळ जवळ ३२ वर्षे त्यांनी स्टेट बँकेत काढली. ब्रँच मॅनेजर म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांना 'सेवानिवृत्ती'बद्दल जे वाटते ते त्यानी या लेखात लिहीले आहे.
हिमांशु
----------------------------------------------------

सेवानिवृत्ती झाली - पुढे काय?

आयुष्याची पाने उलटली,
सेवानिवृत्ती देखील झाली,
संसाराची कर्तव्ये संपली,
वृत्तीदेखील निमाली,
अन् 'निवृत्तीची' सुरुवात झाली!!!

प्रत्येक व्यक्तीची ओळख समाजात दोन गोष्टींमुळे होते. जन्मानंतरचे चिकटलेले नावाचे लेबल अन् नोकरी / व्यवसायाचे लेबल. दोन्ही गोष्टीची सुरुवात एका ध्येयाने होत असते, पाट्या टाकण्यासाठी कोणीच जन्म घेत नाही की नोकरी व्यवसाय करत नाही.

जन्मतः 'स्व'चा शोध घेण्याचे अन् त्या परमेश्वरात विलीन होण्याचे ध्येय असते. नोकरी, व्यवसाय सुखाने चरितार्थ चालविण्याचे ध्येय. ध्येयाचा प्रवास सतत सुरु असतो. ध्येय म्हटले की मर्यादा आली. 'स्व'चा शोध घेण्यासाठी आयुष्य ही मर्यादा अन् नोकरीसाठी सर्वसाधारणपणे वय वर्ष साठीची. तीस वर्षांपेक्षा अधिक नोकरीत एकाच ध्येयाने धावल्यानंतर जो एक मुक्कामाचा पडाव येतो, तो 'सेवानिवृत्तीचा'! काही क्षणाची उसंत, पुढच्या प्रवासाची तयारी, एक सिंहावलोकन करण्याचा टप्पा.

एक सिंहावलोकन - आयुष्याची अन् उमेदीची, तीस वर्षांपेक्षा अधिक व्यस्ततेत घालविलेला काळ! नोकरी अन् संसारात झालेली तारेवरची कसरत. एका वर्तुळासारखा झालेला हा प्रवास - कधी परिघावरून तर कधी केंद्रबिंदू. ही धडपड म्हणजेच जिवंतपणाचे लक्षण मानायचे, कर्ता-करविता असल्याचा भास निर्माण करायचा. जबाबदारी, कर्तव्य यांची सांगड घालता घालता लक्षात येते की लग्नानंतर सुरुवातीला दोघे होते, तेच आता देखील आहेत. मुलांचे शिक्षण पूर्ण होवून ती नोकरीला लागली आहेत. पंखात बळ घेवून गगनभरारी घेत आहेत अन् साथीदाराबरोबर घरट्यात रमली आहेत. प्रगतिचा आलेख खूप उंचावलेला असतो. कर्ता-करविता कोणी वेगळाच आहे, हे जाणवत असते, पण त्याचा प्रयत्नपूर्वक विसर पडलेला असतो. तीस वर्षांपेक्षा जास्त उमेदीचा काळ ज्या ठिकाणी घालवलेला असतो, त्याच ठिकाणी नारळ अन् शाल याचा स्वीकार करावा लागतो. त्याचक्षणी भान ठेवून संसारातून मानाचे श्रीफळ अन् मायेची उबदार शाल मनापासून आनंदाने स्वीकारायची असते. ख-या अर्थाने 'सेवानिवृत्त' होवून 'निवृत्ती' स्वीकारायची असते.

सेवानिवृत्तीने वयाची जाणीव करुन दिलेली असते, शरीर कुरकुरायला लागते. बुद्धी अन् मनाचे विचार काय कमावले आणि काय गमावले याचा ताळेबंद मांडत असतात. काय काय करायचे राहिले याचा विचार सुरु होतो. सप्तसुरांचे संगीत मनाला भुरळ पाडते. पु.ल., गदिमा, कुसुमाग्रज... सारे जवळचे वाटायला लागतात. आमटे कुटुंबियांचे उत्तुंग ध्येय अन् त्यागाने भारावून गेल्यासारखे होते. आगगाडीचे रुळ मृगजळाच्यामागे धावायला लागतात. विपुल संतसाहित्यात कुठून प्रवेश करायचा याचा अंदाजच येत नाही. 'सत्संग' अन् 'आस्था' यासारखे कार्यक्रम गोंधळात भर घालतात. प्राणायाम आणि योगाचे वर्ग शरीरस्वास्थ्यासाठी बोलावत असतात. थोडक्यात काय तर सेवानिवृत्तीनंतर काय हा प्रश्न तसाच राहतो आणि त्याचे उत्तर शोधण्याचा हा एक प्रयत्न!

सेवानिवृत्तीनंतर खरतर आयुष्यातला एक नविन टप्पा, नविन मार्ग, 'स्व'चा शोध घेण्याचा श्री गणेशा! सुरुवात अशी की जी सहज असावी, आनंद देणारी अन् आनंद घेणारी असावी. 'हृदयातून' अन् हृदयाच्या प्रत्येक 'स्पंदना'तून असावी. जगण्याची उर्मी असावी, जगण्याची स्फुर्ती असावी. खरतर ही एक नविन ओळख असते, स्वतःची स्वतःशी झालेली! तीस-चाळीस वर्षांच्या 'वृत्ती'तून म्हणजे राग, लोभ, द्वेष, मत्सर, अहंकार, सुख-दु:ख यातून बाहेर पडण्याची वेळ. 'सेवानिवृत्ती' स्वीकारायची, 'वृत्ती' सोडायची, पण निवृत्त व्हायचे नाही. आयुष्याच्या दैवी देणगीतून निवृत्त व्हायचे नाही. ज्या ज्या वेळेला जे जे होईल, ते ते स्वीकारत जायचे, अगदी सहजतेने अन् आनंदाने.

याची सुरुवात दोन फुलस्केप पेपर्सपासून करायची, एका पेपरवर क्लेशदायक घटना, दु:खद क्षण - अगदी थेट लहानपणापासून. आई-वडिलांचे धपाटे, मास्तरांची पट्टी, प्रतिसादाला साद न देणारी कॉलेजकन्या! नोकरीतील तारस्वरातील मैफल, आठवणीतील अशा अनेक गोष्टी या कागदावर उतरवून काढायच्या.

दुस-या पेपरवर आनंददयी घटनांची साखळी जोडायची. उंच उडवलेला पतंग, सायकल चालविता येण्याचा क्षण - ज्या ज्या छोट्या गोष्टीतून आनंद दिला, बघितला, घेतला सारे क्षण टिपायचे. एका क्षणाचे वजन काकणभर जास्त होते. मन आनंदाने भरून जाते. दिसतो, जाणवतो तो फक्त आनंदच आनंद!

दु:ख देणा-या गोष्टींची परत परत उजळणी करायची. अन् तो कागद चक्क फाडून फेकून द्यायचा. त्या दु:खद आठवणी मनाच्या मुळापासून उपटून टाकायच्या. स्मृतीतून हद्दपार करायच्या, परत त्यांची आठवण न काढण्यासाठी. मग राहतात त्या फक्त दुस-या कागदावरील आनंददायी घटना! चुकून काही दु:खद प्रसंग, घटना घडल्या तरी आनंददायी घटनांची उजळणी करायची. मग जी प्रक्रिया सुरू होते ती शुद्धिकरणाची - मनाच्या शुद्धतेची पहिली पायरी!

मग मनाची झेप फक्त आनंददायी क्षणांपर्यंतच जाते. आनंददायी क्षण हृदयाकडे प्रवाहित होतात आणि मन आपोआप हृदयात विरून जाते. बुद्धि हा सारा खेळ चौकसपणे बघत असते. बघता बघता सा-या कसोट्या पार करीत नकळत बुद्धिदेखील त्यात प्रवाही होते. मेंदूची तल्लखता अधिकच वाढते. आनंदाच्या या लहरी शरीरभर प्रवाहित होतात. नित्यनविन श्वासासारखी अन् हृदयाच्या स्पंदनाप्रमाणे आनंद देणारी, जिवंतपणाची जाणीव करून देणारी अन् म्हणूनच हृदयाच्या स्पंदनातून जगण्याची एक लय गवसते!

हृदयाचे 'स्पंदन' हीच खरी ओळख. देहाला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणे आणि जिवंतपणा जपणे, हे कर्तव्य हृदय सतत, सहजपणे अन् आनंदाने करत असते. खरतर प्राणवायू अगदी सूक्ष्म स्वरूपात लागतो, पण तो सतत लागतो. स्पंदनातून रक्त शुद्ध करण्यासाठी अन् यातून शरीरभर प्राणाचा, चैतन्याचा, तेजाचा, अगदी परमेश्वराचादेखील संचार होण्यापुरता! प्राण, चैतन्य, तेज... ज्याला जसे भावते, तसे नाव दिले जाते. या क्रियेतून हृदय सा-या देहाला आनंद देते आणि त्याच आनंदात आनंदून जाते. खरतर या क्रियेला देहातील, मेंदूतील कुठलीही शक्ति उपयोगी पडत नाही. आनंद देणारा अन् घेणारा, स्पंदनातून जाणवणारा श्वासच! मन, बुद्धी डोळ्यांना दिसत नाही किंवा कुठल्याही अवयवाप्रमाणे दाखवता येत नाही. पण हृदय दाखवता येते... हृदयाचे स्पंदन जाणवते, अगदी आनंदाच्या कारंज्याप्रमाणे नाचणारे, बागडणारे! स्पंदनातून श्वास पुरवण्याचे, देहात अन् देहाबाहेरील विश्वाला श्वास पुरवणा-याचे आभार मानीत त्या विश्व-निर्मात्या परमेश्वराचा जप हृदय सतत करीत असते. इथेच हृदय, 'स्व'चा शोध करीत आनंदाने 'स्व'त विलीन होण्याची प्रक्रिया सुरू होते, स्पंदनातून परमेश्वरात विलीन होण्याचा मार्ग गवसतो!

या आनंदाचा शोध घेत मार्गस्थ होणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य बाकी राहते. श्वासाचा प्रवाह, स्पंदनाचे संगीत ऐकत बुद्धीला आणि मनाला त्या प्रवाहात विसर्जीत करणे हाच काय तो प्रवास चालू राहतो. स्पंदनाचा आवाज तोच खरा 'स्व'चा 'स्व'शी झालेला 'संवाद'! ज्याला भावेल तसा तो 'आतला आवाज'! अगदी अनंत स्वरूपात अन् अनंत नामात! आपापल्यापरीने या आनंदाचा शोध घेणे हाच निवृत्तीनंतरचा मार्ग! एकदा का हा आनंदाचा ठेवा सापडला की निवृत्तीचा अर्थ उमगायला लागतो. मग बाकी व्यावहारीक, पारमार्थिक गोष्टी अगदी आपोआप, सहजपणे घडायला लागतात. अगदी स्पंदनातून विश्व-निर्मात्यात विलीन होत आपण निवृत्त होतो.

हृदयातून जीवनाचा आनंद देणे,

हृदयातून जीवनाचा आनंद घेणे,

स्वतःचा स्वतःशी 'संवाद' साधणे

हेच खरे 'निवृत्ती'नंतरचे जगणे!!!!!

यशवंत हरी डबीर
पुणे

Sunday, March 22, 2009

एका वाल्याची "नविन" गोष्ट

सध्या देव काय करतोय? कधी प्रश्न पडला का हा तुम्हाला? मला कालच पडला, तसा या प्रश्नाला काही अर्थ नाही, खूप थोर लोक याचे उत्तर एका मिनिटात देतील. हे जग हा परमेश्वर चालवतो, हा वारा त्याच्या आज्ञेने वाहतो, आपण त्याच्याचमुळे जगतो, आपली सगळी कार्ये त्या परमेश्वरच्या प्रेरणेने होत असतात! आपले आयुष्य आपण कसे जगणार आहोत हेसुद्धा त्याने आधीच लिहून ठेवलेले आहे, आपण फक्त ते त्याप्रमाणे जगतो. मग प्रश्न पडतो, की जर माझे आयुष्य या देवाने लिहिले आहे, माझे म्हणजे आपल्यासकट सर्व प्राणीमात्रांचे आयुष्य याने लिहून ठेवलेले आहे. कुठल्या क्षणी कुठे काय होणार याचे गणित त्याने आधीच मांडून आणि सोडवून ठेवलेले आहे. जे काही आपण करतो, ते सगळे आधीच ठरलेले आहे, आपण फक्त त्याची अंमलबजावणी करतो. आपण मी केले म्हणून उगाच मिरवत असतो, पण खरा कर्ता करविता तो बाप्पा आहे. मग मी काय करतो? मोठा विचित्र प्रश्न आहे हा? काहींना तर हे असले प्रश्न, विचार हे नैराश्यवादी वाटतात. पण तो त्यांचा प्रश्न आहे.
माझे सगळे आयुष्य कसे जगणार आहे मी हे जर त्या बाप्पाने आधीच लिहून ठेवलेले आहे, तर मग तो आत्ता काय करतो आहे? कोणी कुठे कुधी कसे जन्मायचे, कसे कधी कुठे मरायचे, आयुष्यात काय काय प्रकारचे कार्य करायचे हे सगळे त्याने आधीच लिहून ठेवले आहे, मग त्याला आता उद्योग काय आहे? हा वारा म्हणजे वायुदेव, आपल्याला दिसले नाहित तरी जाणवतात, हा पाऊस म्हणजे वरूणदेव आपल्याला भिजवतात, पूर निर्माण करतात, हा सूर्य म्हणजे सूर्यदेव आपल्याला रोज दिसतात, आपल्याला प्रकाश देतात, झाडा-पानांना नविन जीवन देतात, हा अग्नि म्हणजे अग्निदेव आपल्या मंगलकार्यात आपल्याबरोबर असतात, आणि आपल्या आयुष्याच्या शेवटी हेच आपली चितेवर सोबत करतात! म्हणजे तात्पर्य काय की हे चार देव त्यांचे अस्तित्व आपल्याला सतत दाखवून देतात, पण मग बाकीचे देव काय करतात? ते ब्रम्हदेव, ते विष्णूदेव, आणि शंकर भगवान आणि या सगळ्यांबरोबर इंद्रदेव, आणि बाकीचे सगळे त्यांचे सहकारी देव देवता हे काय करतात? कारण जर सगळ्यांचे नशीब, आयुष्य जगण्याची शैली हे जर आधीच लिहून ठेवले आहे तर मग ते "मॉनिटर" जरी करायचे तरी काय करणार? आणि "मॉनिटर" करायचे म्हणजे देवाने खुद्द स्वतःच लिहिल्या गोष्टीवर देवानेच अविश्वास दाखवण्यासारखे नाही का? शाळेच्या वर्गात मॉनिटर लागतो तो "मॉनिटरपणा" आणि देवाचा मॉनिटरपणा यात काहीच साम्य नाही, हे तर सगळ्यांनाच माहित आहे. मग हा देव करतो काय? सगळी युगे संपल्यावर एका नविन विश्वाची उत्पत्ती होणार आहे, जसे या पृथ्वीवर आधी डायनॉसोर्सचे राज्य होते त्यांचा नाश झाला, त्यानंतर अनेकविध प्राणी, मग आदिमानव, मग आजचा प्रगत मानव यांची निर्मिती असे चक्र चालत राहीले. डायनॉसोर्सच्या पर्वा नंतर दुसरे पर्व देवाने निर्माण केले, त्या परमेश्वराचे हे सगळे प्रयोग होते, आता माणूस निर्माण झाल्यावर देवाने त्याला हळूहळू बुद्धी दिली, त्याच्याकडून वेगवेगळी कार्ये करवून घेतली, आणि आपल्याला वाटले की आपण नवनविन शोध लावले. पण ते शोध लावणे हे सुद्धा त्या परमेश्वरी इच्छेनुसार घडत होते, मानव केवळ निमित्तमात्र होता, आहे. देवाने मानवाला निर्माण केला, त्याला बुद्धि दिली, आणि भल्या-बु-याची निवड करायची ताकद दिली. बाकी प्राण्यांना नाही दिली. उगाच नाही म्हणत ना "विनाश काले विपरीत बुद्धि". इथे बुद्धिच का म्हटले? काही अजून का नाही वापरले? कारण खरोखर मानवाला विचार करण्याची क्षमता आहे, इतर प्राण्यांमध्ये ही क्षमता एकतर खूप कमी आहे किंवा मुळीच नाही! चांगले किंवा वाईट हे मानव ठरवू शकतो, पण सगळेच जण त्या अंतिम सत्याला बांधले गेलेले आहेत, आणि ते म्हणजे मानव जे काही बरे-वाईट करतो, ते त्याच्या नशिबात लिहिलेले असते म्हणून! म्हणतात ना "कोणी चोर म्हणून जन्माला येत नाही" तो त्याच्या कर्माने चोर अथवा साधू बनतो. त्याच्या कर्मांची प्रेरणा देणारा बाप्पाच असतो. वाल्याचा वाल्मिकी झाला, का झाला? गम्मत म्हणून? नाही, नारदमुनी भेटण्याआधी तो खून मारामा-या आणि दरोडे असले कर्म करतच होता ना? मग त्याचवेळी त्याला नारदमुनींनी दिक्षा दिली आणि त्याच्या कर्मांची दिशा बदलली, आणि पुढे तो वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध झाला. आता या वाल्यालाच का भेटले नारदमुनी, त्यावेळी जगात कोणी दुसरा मनुष्य नव्हता? होते ना, अनेक होते, पण या वाल्याच्या नशिबात देवाने वाल्मिकी बनणे आधीच लिहून ठेवले होते, तर मग दुसराकोणी कसा वाल्मिकी बनला असता बरे?
आता असे पाहा की देवाने या सगळ्या "प्रोसेसेस्" "डिफाईन" करून ठेवल्या आहेत, त्यात कुठलीही गडबड कोणीही करू शकतच नाही, या जगच्या शेवटापर्यंत या "प्रोसेसेस्" अशाच अविरतपणे चालूच राहाणार आहेत. त्यामुळे आता देव निवांत विश्रांती घेत झोपले आहेत. जे काही चांगले आत्मे या पृथ्वीतलावरून मरून परमेश्वराकडे जातात ते सगळे आत्मे आता या विश्वाच्या विनाशानंतर तयार होणा-या नविन विश्वासाठी "रिसर्च" करत आहेत. देवाने त्यांना या कामावर नेमलेले आहे, जिथे त्यांना अडेल तिथे नविन निर्मितीच्यावेळी देव त्यांना मदत करेल, पण तूर्तास तरी तो निवांतपणा अनुभवत आहे.
त्यामुळे या जगात जोवर तुम्ही आहात, तोवर परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा आपल्या अंतरंगात डोकवून पाहा, पाहा कुठे तुम्हाला वाल्या भेटतो का? आणि भेटलाच तर मग त्याचा वाल्मिकी कसा करायचा याचा प्रयत्न करा! तुम्हाला यश येईलच, कारण जेव्हा तुम्हाला असे वाटेल की आपण देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, तेव्हा तुम्हाला ती प्रेरणा देणारा दुसरा-तिसरा कोणी नसून साक्षात परमेश्वरच असेल यात शंका नाही.

मला माझ्यातला वाल्या भेटला आहे, पाहू आता त्याला देव कसा वागवतो?

तूर्तास तरी, हे आर्टिकल लिहायला देवाने मला प्रेरणा दिली, त्याबद्दल त्या बाप्पाचे अनेक आभार!


हिमांशु डबीर

२२-मार्च-२००९

Friday, March 20, 2009

मनस्वीता - एक जिवंत अनुभव

"मनस्वीता" म्हणजे काय हे ज्या प्रसंगाने मला शिकवले, तो माझ्या जीवनातला सत्य-प्रसंग आज मी इथे मांडत आहे

२००७ मधील धुलीवंदनाचा दिवस होता तो! माझ्या सम्पुर्ण जीवनात मी तो दिवस कधीही विसरणार नाही. कौस्तुभ आणि मी कानिफनाथांच्या गुहेला भेट देण्याचे ठरविले. तसा माझा आणि कानिफनाथांच्या गुहेचा संबंध खूप पुर्वी पासून येत होता. पण कधीही या गुहेला भेट देण्याचा योग आला नाही. मला जेव्हा पासून आठवते तेव्हापासून म्हणजे साधारणतः वयाच्या ८ व्या वर्षापासून मी आई-बाबांबरोबर जेजुरीला जातो तेव्हापासून या गुहेचे मला खूप आकर्षण वाटत आले आहे. इथे जाणे खूप कठीण आहे, इथे आत जाण्यासाठी एक अगदी छोटिशी खिडकी आहे आणि त्या खिडकीतून आत जायला खूप कष्ट पडतात म्हणे! सरते शेवटी २००७ साली मित्राबरोबर इथे जाण्याचा योग जुळून आला.
दिवे घाटाच्या पुण्याकडील पायथ्याकडून एक रस्ता जातो इतकेच ज्ञान आम्हाला होते आणि नंतर समजले की पुण्यातून कोंढवा गावातून बापदेव घाटातून सुद्धा एक रस्ता जातो तो थेट कानिफनाथांच्या मंदिरात जातो. आणि हा रस्ता पुढे थेट सासवडमधे पण जातो.
तर अशाप्रकारे धुलवडीच्या दिवशी आमची स्वारी कानिफनाथांच्या गुहेकडे निघाली. दिवेघाटाच्या अलीकडून उजवीकडे एक रस्ता जातो, तो थेट कानिफनाथांच्या मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याला जाऊन भिडतो. डोंगर पायथ्याला बाईक लावून आम्ही तो डोंगर चढायला सुरूवात केली. तसा डोंगर पिटुकलाच आहे, पण त्याने आमचा घाम काढला. निवडुंगाची खूप झाडी आहे इथे, काही ठिकाणी तर जाळीच आहे! त्याजाळीत फोटो काढले, आणि रमत-गमत जवळपास ५० मिनिटांमध्ये आम्ही डोंगरमाथ्यावर पोचलो. मंदिर परिसरात येतानाच एक भव्य असे नवनाथांचे भित्ती चित्र आपल्याला सामोरे येते. त्या भित्ती चित्राच्या समोर उभे असताना आपल्या उजव्याबाजूला श्री दत्त्तात्रेयांचे सुबक आणि मनमोहक मंदिर आहे, त्या देवालयातील दत्तगुरूंची मुर्ति खूप प्रसन्न आहे आणि त्या दर्शनाने आपले मन खूप सुखावते.
या मंदिराच्या समोरच कानिफनाथांच्या गुहेकडे जाणा-या पाय-या आहेत. या पाय-यांच्या बाजूने श्री ज्ञानेश्वर माउलींची मुर्ती आहे, गणपतिची मुर्ती आहे, तसेच अजून काही देवदिकांच्या मुर्ती आहेत. त्याच कमानीवर कानिफनाथ महाराजांच्या जन्माचे चित्र रेखाटलेले आहे. कानिफनाथ हे एका हत्तीच्या कानात जन्माला आले, कानात जन्मले म्हणून "कानिफा".

अंगावर येत जाणा-या पाय-यांची चढण संपवून आपण गुहेच्या प्रवेशद्वारासमोर येऊन ठेपतो. आता प्रवेशद्वार म्हट्ले की एक भव्य दिव्य असे काहीसे समोर येते ना, पण थांबा, हे प्रवेशद्वार किती मोठे आहे हे जाणून घ्यायचे आहे? ८ इंच बाय १२ इंच!!!! होय, इतकेसे आहे हे प्रवेशद्वार!!! या द्वारातूनच आत जावे लागते तर कानिफनाथांच्या गुहेत आपण पोचू शकतो. आणि आत मध्ये हि गुहा कमीतकमी १२-१५ माणसांना सामावून घेवू शकते!

आम्ही तिथे पोचलो तेव्हा एक बुवा कुठल्या तरी श्लोकाचे निरुपण सांगत होते. काही भक्तजन ते ऐकत होते, एक पुजारीबाबा त्या पिटुकल्या दारापाशी बसलेले होते आणि काहि मंडळी गुहेच्या प्रवेशद्वारापाशी खोळंबली होती. गुहेच्या आत असणारी मंडळी बाहेर आली की हि मंडळी आत जाणार होती. मी आणि माझा मित्र ते सगळे पाहत होतो. आणि आत जायचे का? यावर बोलत होतो. आता इथवर आलोच आहोत तर जाऊच आत असे ठरविले आणि तयारीला लागलो.

या गुहेत जाण्याचे काही नियम आहेतः

१. स्त्रियांना गुहेच्या आत प्रवेश नाही

२. गुहेच्या आत जाताना, शर्ट, बनियान, कमरेचा पट्टा, पाकिट, घड्याळ आदि चीजवस्तू उतरवून ठेवाव्या लागतात.

३. आधी हात, मग डोके, मग धड आणि मग पाय या क्रमानेच तुम्हाला गुहेत प्रवेश करावा लागतो

४. बाहेर पडताना वरचा क्रम उलटा करुन बाहेर यावे लागते

एकंदर तो प्रकार जरासा भीतिदायक वाटतो. आणि त्या प्रवेशद्वाराच्यावर एक वाक्य लिहिलेले आहे, "ज्याच्या उरी असे श्रद्धा त्यासी दिसे हा कानिफा". मनाची तयारी केली आणि गुहेच्या तोंडावर जाऊन उभे राहिलो, आतील लोक बाहेर आले की आम्ही आत जाणार होतो. आणि तो क्षण आला, जेव्हा मी त्या गुहेत प्रवेश करायला सिद्ध झालो.

हातात एक हार आणि काही फुले होती देवाला वाहायला घेतली होती ती. आत प्रवेश करताना, नियमाप्रमाणे योग्यक्रमाने मी आत जाण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि हात गुहेच्या आत, मधल्या चिंचोळ्या जागेत धड आणि मागे गुहेच्या बाहेर पाय अशा विचित्र अवस्थेत अडकून पडलो. आणि काही झणातच धीर सुटायला सुरुवात झाली. असे वाटू लागले की बस्स इथेच आपला शेवट!! मग सुरु झाली ती जगण्यासाठीची तडफड! आत गुहेत एकही खिडकी नाही की जिथून हवा आत येईल, पाठीमागे सगळी जागा माझ्याच देहाने अडवलेली, आता थोड्या वेळाने हवा बंद होणार आणि आपण गुदमरणार अशी भीति मनाला सतावू लागली! किती विसंगती आहे ना, समोर सक्षात परमेश्वर असताना मी मृत्युच्या भीतिने स्वतःला पछाडून घेत होतो. मग तिथेच देवाबरोबर संवाद सुरू केला, त्याला म्हट्ले, कदाचित मी अजून तुमच्या दर्शनासाठी पात्र नाही, माझी लायकी इथवरच आहे, आता मात्र मला तुम्ही परत पाठवा! तुम्हांकरता आणलेली ही फुले आणि हा हार मी तुम्हाला इथूनच अर्पण करतो, त्याचा स्वीकार करा आणि मला निरोप द्या! मान खाली झुकवली आणि एकच क्षण त्याचे ध्यान केले आणि माझे जे करायचे ते आता तूच कर, असे म्हणून त्याला संपुर्णपणे शरण गेलो आणि तो हार त्यांच्या पादुकांकडे सरकवण्यासाठी हात जितका लांब करता आला तितका केला. त्याचवेळी मागच्या पुजा-याने मला धक्का दिला आणि माझा हात थेट पादुकांवर जावून भिडला! ही सगळी घटना केवळ २५-३० सेकंद घडत असेल, माझे अडकणे, परमेश्वराशी बोलणे, त्याला शरण जाणे आणि नेमका त्याचवेळी त्या पुजा-याने मला धक्का देणे आणि ज्या कारणाकरीता आलो त्या गुहेच्या आत मध्ये मी असणे, सारेच कल्पनातीत होते! आत आल्यावर पादुकांना हार, फुले वाहिली, प्रदक्षिणा केली आणि मग ध्यान लावून नामस्मरण सुरु केले. नामस्मरण चालू असताना, एकदम एक हळूवार संवाद कानावर येऊ लागला,
"बाळा, समोर मी असा बसलेलो असताना, तुला भय कसले वाटत होते?, माझ्यावर विश्वास नव्हता का?"
बस्स इतकेच ऐकू आले आणि विचारांची श्रुंखला सुरु झाली. खरच हा परमेश्वर असा इथे असताना, त्याच्यावर सगळे सोपवून त्याला शरण जाण्याचे सोडून मीच माझी व्यर्थ धडपड करीत होतो की मी आत कसा येवू आणि जेव्हा समजले, की आत येता येत नाही तेव्हा बाहेर कसा जावू याची काळजी करत बसलो! सगळ्या जगाची काळजी घेणारा माझ्यापासून केवळ १ फुट अंतरावर होता, त्याला मी पाहातच नव्हतो! "स्वतःच्या अहंकारात होतो, की मी इथे अडकूच कसा शकतो?" सदैव हाच विचार की "मी यातून कसा बाहेर पडू?" सगळीकडे फक्त "मी, मी आणि मी"...

विचार आला, की नेमक्या त्याचवेळी जेव्हा मी त्या परमेश्वरी शक्तिला पूर्णपणे शरण गेलो, त्याचवेळी त्या पुज-याला कशी प्रेरणा मिळावी आणि त्याने मला आत ढकलावे? त्या आधी का नाही? केवळ तो हार देवापर्यंत पोचावा म्हणून लांब केलेला हात थेट पादुकांपर्यंत कसा पोचावा? आणि आत मधे पोचल्यावर मला तो आवाज का यावा? या प्रश्नांची उत्तरे मला तिथेच मिळाली. देव सतत तुमच्या बरोबर असतोच, तुम्ही त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतच नाहीत, केवळ संकटातच त्याची आठवण येते, आणि तो जी मदत करतो, ती मदतसुद्धा आपण ओळखू शकत नाही! आपण फक्त म्हणतो ही परिस्थिती का आणलीस माझ्यावर? पण जर त्याने ही परिस्थिती आणलीच आहे तर तोच या परिस्थितीतून बाहेर पडायला आपल्याला सहाय्य करतोच करतो! आपण फक्त त्याला संपूर्ण शरण जायचे, सगळे काही त्याच्यावर सोपवायचे आणि त्याचे चिंतन करायचे!

लोक म्हणतात देव कधी दिसतो का कुणाला? देव कधी बोलतो का कुणाशी? देवाचा स्पर्श होतो का कधी कुणाला?, उत्तर आहे, हो देव दिसतो अगदी सगळ्यांना दिसतो, तो आपल्याशी बोलतो सुद्धा, आणि आपण त्याचा स्पर्श अनुभवू शकतो. मला जेव्हा हा अनुभव आला, तेव्हा ना कुठे वीज चमकली, ना सोसाट्याचा वारा सुटला, ना माझ्यासमोर खूप लख्ख प्रकाश पसरला! तरीही, होय मला देव दिसला!

"मनस्वीता" म्हणजे मनस्वीपणा, आपण नेहेमी म्हणतो, मी माझ्या मनासारखे आयुष्य जगणार, पण आपली मनस्वीता ही कधीच नसते, जी असते ती त्या परमेश्वराची! आपल्या आत्म्याची जी मानसिक घडण असते ती त्या परमेश्वराच्या पायी लीन होण्यासाठी धडपडत असते, आणि शरीराने आपण आपल्या आत्म्याला कशी साथ देतो त्यावर आपल्या आध्यात्मिक प्रगतीची रुपरेषा तयार होत असते! आणि जेव्हा जेव्हा परमेश्वराच्या प्राप्तीसाठी या देहाला थोडे कष्ट होतात, तेव्हा तेव्हा हा आत्मा देहाचे आभार मानत असतो. कारण शरीर हे आत्म्याने धारण केलेले वस्त्र आहे, जे तो सतत बदलत असतो, आणि मनुष्य-जन्म हा त्या परमेश्वर प्राप्तीसाठीचा सगळ्यात चांगला मार्ग आहे कारण इतर कठल्याही योनीत परमेश्वर प्राप्तीसाठीची विचारसरणी निर्माणच होत नाही, याचा विचार डोक्यात आला, आणि डोळ्यांत पाणी दाटले. भानावर आलो आणि त्या कानिफनाथांना नमस्कार करुन गुहेच्या बाहेर आलो! खूप शांत वाटत होते, जणू काही या जगण्यातील क्षणभंगुरतेच अंदाज मला आला होता आणि या मनुष्या योनी जन्माला आल्याचे कारण मला उमगले होते.

त्याच प्रसन्न मनस्थिती मधे आम्ही डोंगर उतरून खाली आलो, आणि घराकडे परतलो!

आजही तो प्रसंग मला जसाच्या तसा आठवतो आणि मला परमेश्वराच्या चरणी वारंवार लीन करतो!

हिमांशु डबीर
२०-मार्च-२००९

Wednesday, March 18, 2009

खिडकी - एक सिद्ध योगी

खिडकी - एक सिद्ध योगी
खिडकी एक खडबडीत आणि काहीसा रूक्ष असा पण हवाहवासा शब्द! तसा खिडकी बरोबर आपला संबंध रोजयेतोच, वयोमानापरत्वे खिडकीचे संदर्भ बदलत जातात. जणू काही एखाद्या कळीचे फूल बनावे इतके हळुवारपणे हे संदर्भ बदलतात. असाच एकदा खिडकीत उभा होतो तेव्हा काही मजेदार प्रसंग डोळ्यांसमोरून घरांगळत गेले, आणि वेगवेगळ्या वयामधे आलेले खिडकीचे संदर्भ एका मजेदार चित्रपटा सारखे समोर आले.
प्रत्येकजण याच खिडकीतून आपले स्वतःचे असे एक आकाश पाहतो, आपले स्वतःचे असे एक तारंगण सजावतो, आपले स्वतःचे असे एक विश्व उभरतो. आणि याच खिडकीत उभे राहून कितीतरी वेळा पुढच्या आयुष्याची वाटचाल नियोजित करतो!
प्रत्येक घराला एकतरी खिडकी हवीच, अलिखित नियम आहे तो! एक सेल्लुलर जेल सोडला आणि खासकरून त्यातील स्वा. सावरकरांची कोठडी सोडली तर खिडकी नाही अशी वास्तू या जगात कुठे सापडणे मुश्कील आहे!
लहान असताना आईच्या कडेवर बसून खिडकीत उभे राहून बाबांची वाट पहाणे किंवा बाबांच्या खांद्यावर चढून आईने दिलेला जेवणाचा घास नाकारणे या सगळ्या गोष्टींना जसे आई-वडील साक्षीदार असतात तसेच ती खिडकीसुद्धा साक्ष असतेचना!
दुसर्‍याच्या अंगणातून चोरून आणलेला मानिप्लँट खिडकीत एका काचेच्या बाटलीत लावायचा आणि त्याने खिडकीला पूर्ण वेढा द्यायचा आणि मग त्याच्या झुल्यावर बसून एखाद्या बुलबुलाने मोहक शीळ घालावी आणि असे वाटवे की ती खिडकीच जिवंत झाली! त्याच झुल्यावर बसून एका चिमणीने आपले घरटे सजवावे आणि खिडकी अचानक बोलू लागावी असे घडते, एखादे स्वप्नच जणू! मग हळूहळू त्या बुलबुलाची शीळशिकत शिकत आपण सुद्धा शीळ घालायच्या वयात येऊन पोचतो. त्याच खिडकीत उभे राहून आपण कधी कधी आपल्याच वयाच्या मुलींना पाहून ती
"ठराविक" शीळ घालतो. त्या आल्पया उपद्व्यापला कधी प्रतिसाद म्हणून सुंदरसे स्मितहास्य मिळते टेर कधी शिळा ब्रेड खावून आपचं झालेला चेहरा जसा दिसतो तसा कोणीतरी आपल्याला पाहून शिव्याशाप देऊन निघून जातो! काय करणार वय तसेच असते ना! पण हो सगळे ती खिडकी अगदी मूकपणे पाहत असते, आपल्याला मिळालेल्या प्रतिसदाची वाच्यता ती कुणाहीकडे कधीही करत नाही किंवा आपल्याबरोबर तो प्रतिसाद साजरा करत नाही. जसे आपले वय अजुन थोडे वाढते तसे आपले खिडकीमधे जाणे पण बदलते. पावसात भिजून मनसोक्त आनंद लुटणारी मुले पाहून आपण का नाही भिजत हा प्रश्ना नाही पडत पण असे वाटते की भिजून ही मुले आजारी तर नाही पडणार? पण अगदी खरे सांगा, उद्याचे ऑफीस बुडायला नको म्हणून आपणच त्या पावसात जाण्याचे टाळतो ना! त्यावेळी सुद्धा ती खिडकी आपल्या विचारांची साक्षीदार असते. काही ना बोलता, जे घडते आहे ते नीर्वीकारपणे पाहत असते ती.
ऑफीस मधून निवृत्त झालो की मग परत सोबतीला येते ती खिडकी. सारून गेलेल्या काळाचा ताळा मांडांताना , घरी परत येणार्‍या मुलांची वाट पाहाताना, पार्ट्नर बरोबर कधी वाद तर कधी संवाद साधताना खिडकीत बसून वेळ कसा जातो ते कळतच नाही.
या सगळ्या गोष्टींचे खरतर या खिडकीला काही सोयरे नसते की काही सुटक नसते, ती आपली तशीच मूकपणे सगळे काही पाहत असते.
प्रत्येकाला कधीतरी मन मोकळे करायला ही खिडकी हक्काची वाटते. एखाद्या योग्या सारखी ती आपली सारी सुख-दु:खे ऐकून घेते, आपल्याला धीर देते, आधार देते. घरातील जवळपास सगळ्या चीज वस्तुंबरोबर आपला जीव गुंततो, अगदी ताट, वाटी, पेला , फ्लॉवरपॉट इतकाच काय पण त्या घराच्या भिंतीवर पण आपला जीव जुळतो, पण ती खिडकी विसरली जाते. पण त्या विसरण्याचीही त्या खिडकीला खन्त नसते, ती खरच सगळ्यात असून त्रयस्था सारखी सगळे काही पाहत असते. मला खरच त्यामुळे खिडकी ही एका कसलेल्या योग्या प्रमाणे वाटते, एक असा योगी जो केवळ गेल्या जन्माचे काही भोग बाकी आहेत भोगायचे म्हणून या पृथ्वीतलावर आला आहे, सगळ्या भाव-भावना यांच्या मधे असूनही तो योगी त्यांच्यापासून आगळा आहे.
प्रत्येक माणसाला हवी असते ती एक खिडकी ज्यात तो मोकळा होईल, आपल्या अंतरंगात डोकवून पाहील! एक अशी खिडकी जी हृदयस्थ परमेश्वराला आपल्या समोर आणून दाखवेल. आणि ते साध्य करायला शिकवते ती खिडकी, एकदा पहा बसून या खिडकीत, नक्की सांगतो ज्या खिडकीतून परमेश्वर दिसतो ती खिडकी तुमच्यासाठी उघडली जाईल . मनाची खिडकी उघडी ठेवा, तो परमेश्वर बाकीचे सगळे तुमच्या ओंजळीत घालील!

हिमांशु डबीर
17 मार्च 2009

मनापासून मनापर्यंत

एक प्रयत्न