Sunday, September 18, 2011

आनंदयात्रा - मंतरलेले दिवस!

आनंदयात्रा - मंतरलेले दिवस!

वर्तमानपत्रामधे "आनंदयात्रा" बातमी वाचली आणि उमेश यांना फोन लावायची धावपळ उडाली. घरी सर्वांना विचारले कि राखी-पौर्णिमेला मी घराबाहेर गेलो तर चालेल का? आईसाहेब म्हणाल्या "बाबासाहेब आहेत म्हणल्यावर, हा घरात कसला थांबतोय? तो जाणारच आणि त्याला जाउ द्या!" परवानगी मिळताच मन प्रसन्न झाले! बाबासाहेबांची मुर्ति नजरेसमोर तरळू लागली! उमेशरावांना फोन लागला आणि नाव नोंदणीसाठी "पुरंदरे वाडा येथे यावे असे समजले.

बाबासाहेब तेथे भेटतील का? हा प्रश्नच चेह-यावर हास्य फुलवून गेला! या प्रश्नाच्या नादातच मी पुरंदरे वाडा गाठला. दार वाजवून आत प्रवेश केला तो साक्षात बाबासाहेब सामोरे बसलेले! मी काय प्रतिक्रीया द्यावी हे न समजून पुरता गोंधळून गेलो होतो! बाबासाहेब प्रसन्नपणे म्हणाले "या ... या.. बसा". माझ्या मनातल्या प्रश्नाचे असे सुरेख उत्तर मिळेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते! बाबासाहेबांना नमस्कार केला. थोडेफार बोललो, खरतर आश्चर्याचा इतका सुरेख धक्का बसला होता, मी माझे स्वप्नच जगत होतो!

उमेशरावांकडे पैसे भरले. कार्यक्रमाचे स्वरूप काय आहे? आपण कुठे कुठे जाणार आहोत? कसे फिरणार आहोत? कुठे राहणार आहोत? हे असले प्रश्न मला पडलेच नाहित. बाबासाहेब आहेत आपल्यासमवेत.. मग काय कुठेही राहू, कुठेही जाऊ, पर्वा नाही! एक तास बाबासाहेबांच्या घरी कसा गेला ते उमगलेही नाही. मनात असे वाटत होते की इथेच राहावे, पण मग जराशी जाणीव झाली घरच्या जबाबदारींची, आवेग सावरला आणि बाबासाहेबांचा निरोप घेतला! बाबासाहेब म्हणाले, "आनंदयात्रेत भेटू!" माझी आनंदयात्रा तर आत्ताच सुरू झाली होती! १३ ऑगस्टची वाट पाहात पाहात आला दिवस आनंदाने पुढे जाऊ लागला! आणि १३ ऑगस्ट उगवलादेखील!

पहाटे ५:४५ ला मी सपत्नीक सिद्धि गार्डन जवळ पोहोचलो. थोड्याच वेळात बस आली. गणेशभाऊ, उमेशराव, अभिषेकराव यांच्यासमवेत गणपतीची आरती झाली आणि आमची बस भोरच्या दिशेने धावू लागली. वाटेत गार वा-याने झोप लागली. जाग आली ती थेट भोरच्या राजवाड्यासमोरच! सकाळचा नाश्ता करून आम्ही भोरचा राजवाडा पाहायला आलो. अवाढव्य राजवाडा आहे हा! राजा शिवछत्रपति, बालगंधर्व इ. यांचे शूटिंग येथेच झाले. आज या राजवाड्यात कोणीही राहात नाही. शूटिंगसाठी वगैरे हा वाडा उपलब्ध करून दिला जातो. राजवाडा पाहात असताना, एक विचार मनांत आला की त्या भकास आणि रिकाम्या खोल्यांमधून जर पूर्वीच्या काळात वापरांत असलेल्या वस्तूंची जर प्रतिकृति उभारली तर सर्वसामान्य माणूसही अगदी सहजपणे त्या काळात जाऊन येऊ शकेल. अमेरिकेमधे असे काही बंगले (खरतरं मॅन्शन्स) अजूनही तसेच्या तसे ठेवलेले आहेत! प्रत्येक खोलीचे प्रयोजन काय आहे, हे जर त्या खोलीजवळ नमूद केले तर राजवाड्याला भेट देणा-या प्रत्येकाला एक वेगळ्याच विश्वाचा अनुभव येईल. बाबासाहेबांनी सांगितलेल्या खाली लिहीलेल्या आठवणीचे महत्व या मुद्याला अधिक बळकटी देईल.

एकदा भोरच्या राजांनी एका मेजवानीचे आयोजन केले होते (१९५२ साल). या मेजवानीला बालगंधर्व उपस्थित होते, बाबासाहेब सुद्धा यावेळी तेथे उपस्थित होते. आज आम्ही ज्या सभामंडपामधे बसलो होतो त्याच्या बाजूने त्यावेळी पंगत लागली होती. पाठीला आणि बसायला पाट, समोर ताट ठेवायला पाट. सत्तर जणांची ती पंगत सजली होती. प्रत्येकाला चांदिचा ताट, वाटी, चमचे, फुलपात्र, तांब्या असे भव्य आयोजन होते त्या पंगतीचे! बाबासाहेब हि आठवण सांगताना जणू पुन्हा त्या पंगतीमधे जेवण करत होते आणि मलाही असे वाटले कि मी ती पंगत आत्ता पाहतोय! अनुभवतोय!

असा एखादा प्रसंग जर तेथे लिहून ठेवला तर खरंच किती मजा येईल! आज हा राजवाडा पाहायला येणा-या किती जणांना हे सगळे माहित असेल? नाव आहे "भोरचा ऐतिहासिक राजवाडा"... पण इथे "इतिहास" काय घडला हेच जर माहित नसेल तर त्याचे "ऐतिहासिकत्व" किती काळ टिकेल? पुढची पिढी कदाचित एक पुरातन वास्तू यापलिकडे या राजवाड्याला पाहणारदेखील नाही!

भोरच्या राजवाड्यात त्या देखण्या सभामंडपात बाबासाहेबांचे व्याख्यान झाले. सर्व आनंदयात्रींची ओळख झाली. "डबीर" आडनाव ऐकताच बाबासाहेबांनी माझ्या पत्नीला आमचे गोत्र विचारले. निकिताने गोत्र सांगितले आणि म्हणाली हिमांशु येऊन गेला होता, हे म्हणेपर्यंत बाबासाहेब म्हणाले "होय होय.. आले होते हे!" केवढा भाग्याचा क्षण होता तो! माझ्यासारखा सामान्य माणूस बाबासाहेबांच्या लक्षात होता! बाबासाहेबांनी "डबीर" घराण्याचा इतिहास सांगितला. कानांत प्राण आणून निकिता आणि मी तो ऐकत होतो. केवढी मोठी परंपरा, केवढा मोठा वारसा आपल्याला लाभला आहे, हे ऐकतानाच मनात एक संस्कार होत होता की हे सगळे आपण आणि आपणच सांभाळायचे आहे. नुसते आम्ही "सोनोपंत डबीर" यांचे वंशज असे चार-चौघांना सांगून नव्हे तर आपल्या आचरणातून ते तसे प्रतित झाले पाहिजे! बाबासाहेबांना नमस्कार करताना दरवेळी मी हेच मागणे मागत होतो कि "बाबासाहेब तुमचा आशीर्वाद असू द्या आणि हा वारसा समर्थपणे पेलण्याची आणि आचरण्याची ताकद आम्हांला असू द्या!" भोरच्या राजवाड्यामधे साक्षात "इतिहासपुरूषा"कडून मिळालेली हि ओळख आजही नजरे समोरून हटत नाही!

डबीरांचा इतिहास शोधताना मी १८३५ सालापर्यंत मागे पोहोचलो होतो, पण त्याच्याही मागे जाण्यात अडचणी येत होत्या. १८-एप्रिल-१६७८ (त्र्यंबकपंत डबीर यांची पुण्यतिथी) ते १८३५ (खंडेराव डबीर यांचे जन्मसाल) यांच्या मधील इतिहास सापडत नव्हता, पण बाबासाहेबांनी एका निमिषात सारी उत्तरे दिली! बाबासाहेब म्हणाले गोत्र हि अनेक कुलूपांची किल्ली आहे!

बाबासाहेब आम्हां सर्वांना भोर आणि परिसराची माहिती सांगू लागले, शिवरायांच्या अन् त्यांच्या सवंगड्यांच्या गोष्टी सांगू लागले! शिवरायांचे सरदार शिळीमकर यांची कहाणी तर फारच हृदयस्पर्शी आहे! बाबासाहेबांकडे विविध शस्त्रे आहेत, त्यांची माहितीही बाबासाहेबांनी आम्हांस करवून दिली. आनंदयात्रेमधे आमची पुढची वाटचाल कशी राहणार आहे याची माहितीही दिली. गणेशभाऊंसमवेत मग आम्ही भोरेश्वराचे मंदिर पाहिले. फार सुरेख मंदिर आहे हे! त्यानंतर बाबासाहेब पुण्याला एका पूर्वनियोजित कार्यक्रमाला निघाले आणि आम्ही वाईकडे वाटचाल करू लागलो. वाटेत भोर संस्थानाचा जुना राजवाडा पाहिला, मांढरदेवीचे आशीर्वाद घेतले आणि वाईत उतरलो.

गणेशभाऊ वाटेत दिसणा-या विविध ठिकाणांची माहिती आम्हाला देत होते, तो रोहिडा, तो पांडवगड! गणेशभाऊंचा अभ्यास थक्क करणारा आहे. साक्षात बाबासाहेबांची आठवण व्हावी अशी एक लकब आहे त्यांच्या बोलण्यात, एक आदब आहे वागण्यात! भविष्यात बाबासाहेबांनंतर जर कोणा इतिहासप्रेमी/संशोधकाचे नाव घ्यायचे झाल्यास ते नाव गणेशभाऊंचे असेल यात शंकाच नाही!

वाईमधे दुपारचे छानसे भोजन झाले. कृष्णेचे घाट, गणेश मंदिर (या मंदिराला मी लहानपणापासून "ढोल्या गणपती" मंदिर असे म्हणतो), काशी-विश्वेश्वराचे मंदिर असा सारा परिसर पाहिला आणि पसरणीच्या घाटाने महाबळेश्वराकडे सरकलो. गणेशभाऊ सांगत होते, "खान (अफजल) वाईतून पुढे गेला आणि रडतोंडीच्या घाटातून जावळीत उतरला! मला खरंच ती दहा हजारांची फौज पसरणीच्या उजव्या अंगाने दिसू लागली! त्या फौजेची रडतोंडीचा घाट चढता-उतरतानाची मौज पाहण्यात मी दंग होतो, त्या दहा हजार फौजेचा तो रडवेला तोंडवळा फार सुंदर दिसत होता! जणू सह्याद्रिचे एकूणएक दगड खानाच्या फौजेला म्हणत होते, "आमचा बाळ तुला कधीच गवसणार नाही, जिवंत वाचलास तरी असाच रडत खडत, तडफडत आणि ठेचाळत तू विजापूरला पळून जाशील!" त्या मंतरलेल्या अवस्थेत असतानाच आमची बस महाबळेश्वर मंदिरापाशी पोहोचली.

महाबळेश्वराचे दर्शन घेतले, तिथे बर्फाचा अभिषेक होता त्या दिवशी! याच मंदिर परिसरात कोठेतरी शिवरायांनी जिजाऊसाहेब आणि सोनोपंत डबीर यांची "सुवर्ण-तुला" केली होती. बाबासाहेबांच्या शब्दांचा आवश्यक तो परिणाम मनावर झाला होताच! आणि काय आश्चर्य मंदिरासमोरच एक भला मोठा मांडव दिसू लागला. खूप गर्दि जमली होती. प्रत्येकजण छान छान कपडे घालून आला होता! त्यांचा राजा आज आईची सुवर्ण-तुला करीत होता! केवढा मोठा प्रंसग होता आणि हे सारे जन त्या प्रसंगाचे साक्षीदार होते! मान वर करून थोडे पाहण्याचा प्रयत्न केला तर झेंडूच्या टपो-या फुलांनी सजवलेला एक भला मोठा तराजू दिसला, नेत्रांतून त्याचवेळी एक अश्रू ओघळला, आणि समोरचे ते दृश्य अंधूक अंधूक करून गेला! किती भव्य आणि दिव्य सोहळा असेल नाही तो! साक्षात शिवरायांची अन् जिजाऊसाहेबांची उपस्थिती! स्वराज्याच्या बालपणात सोनोपंतांनी केलेल्या स्वराज्य-सेवेचा केवढा मोठा ऋण-निर्देश आज त्यांचा राजा त्यांच्यासाठी करत होता! साक्षात राजाकडून आज सोनोपंतांची "सुवर्ण-तुला" होत होती! खरंच धन्य धन्य तो राजा आणि धन्य धन्य ते सोनोपंत! आजच्या जमान्यात केल्या कामाचा साधा धन्यवाद देतानाही मालकाची / मॅनेजरची जिव्हा अडखळते तिथे खुद्द राजा आज त्यांच्या एका सेवकाची "सुवर्ण-तुला" करीत होता! कोणत्याही मालकाकडून त्याच्या सेवकाचा असा ऋण-निर्देश, असा आदर-सत्कार ना या आधी झाला होता ना या पुढे कधी होईल! तो दिवस होता ६-जानेवारी-१६६५!

त्या सगळ्या प्रसंगात आणि बाबासाहेबांच्या शब्दांत असा काही गुंग झालो होतो कि अतिबळेश्वराचे, पंचगंगेचे आणि मारुतिरायाचे दर्शन घेण्याचे भानच राहिले नाहि! मन बाबासाहेबांच्या शब्दांतून आणि महाबळेश्वराच्या मंदिरातून बाहेर यायला कदापिही तयार होत नव्हते! सगळे आनंदयात्री परत येऊ लागले आणि गणेशभाऊंबरोबर परत बसकडे निघालो. बस आम्हाला आमच्या "वाडा" या मुक्कामाच्या गावी घेऊन आली. इथे महाबळेश्वर ते वाडा या प्रवासात आमच्या बसचालकाने कमाल केली या निर्देश करावाच लागेल नाहितर तो कृतघ्नपणा ठरेल. प्रचंड दाट धुक्यातून ज्या कौशल्याने त्यांनी गाडी चालवली त्याला खरच तोड नाही!

मुक्कामाच्या ठिकाणी प्रत्येक खोलीला एकेका गडाचे नाव दिलेले होते त्यानुसार आमची व्यवस्था "लोहगडावर" होती. आमच्या समवेत डॉ.राहूल क्षीरसागर, पवनराव आणि अविनाशराव हेही आनंदयात्री लोहगडावर उतरले होते. थोडे आवरून घेऊन आम्ही जेवणासाठी खाली आलो. गणेशभाऊंसमवेत दीर्घ काळ चर्चा झाली, अर्थातच चर्चेचा केंद्रबिंदू "शिवराय" होते! भरपावसात कितीवेळ चर्चा चालू होती याचे भानच नव्हते. भाऊंचा अभ्यास, त्यांची तळमळ आणि वास्तवात आलेले अनुभव हे सगळे भाऊ सांगत होते. भाऊंना म्हणालो, "मी तुमच्यासोबत सतत असेन, कधीही हाक मारा!" भाऊ फक्त हो म्हणाले. भाऊ इथे खरच सांगतो, मी जे बोललो ते खरेच आचरणात आणेन, इतरांचे मला माहित नाही, पण भाऊ तुमच्या हाकेला असेन तसा येईन, कधीही! तुमच्या या कार्यात मी खारीपेक्षा कमी वाटा जरी उचलू शकलो तरी भाऊ माझ्या जन्माचे सार्थक होईल!

गणेशभाऊंचे "किल्ले शिवनेरी" हे पुस्तक तिथे विकत घ्यायचे होते. प्रत्यक्ष बाबासाहेब यांनी या पुस्तकाची प्रस्तावना केली आहे! परंतू थोडे पैसे कमी पडल्याने, भाऊंचे पुस्तक भाऊंच्याच हस्ते स्विकारण्याचा योग साधता आला नाही याचे वाईट वाटले! पण हे पुस्तक मी नक्कीच विकत घेणार आहे!

रात्रीच्या भोजनाचा आस्वाद सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर घेतला. सगळेचजण भारावलेले आहेत, झपाटलेले आहेत. अभिषेकरावांनी "जाणता राजा" या महानाट्याच्या "धुळे" येथे झालेल्या गंमतीची आठवण सांगितली. ती गंमत त्यांच्याकडून ऐकण्यात जी मजा आहे, ती इथे लिहून आणि वाचून नाही येणार! अभिषेकराव हे "जाणता राजा" या महानाट्यात "शाहिरा"ची भूमिका करतात. रंगमंचावरचा त्यांचा विजेच्या वेगाने होणारा वावर त्यांच्या दैनंदिन आचरणातही दिसून येतो! जणू विजेचा लोळच! शाहिराची भूमिका करताना ते एक "मंडल" घेतात, तेव्हाचा त्यांचा वेग आणि अचूकता याला तोडच नाही!

असे सगळे हे एकसे एक मान्यवर आणि आज आम्हाला त्यांच्या पंगतीला जेवायला बसण्याचा मान मिळाला! सगळ्या कार्यकर्त्यांमधे कुठेही बडेजाव नाही, मोठेपणाचा आव नाही! खरंच बाबासाहेबांचे हे कार्यकर्ते म्हणजे बाबासाहेबांचे "चालते-बोलते" संस्कारच आहेत! आदब-मान-मर्यादा सा-या सा-या गोष्टी यांच्याकडून सातत्याने शिकून घ्याव्यात!

दुसरा दिवस पहाटे चार वाजताच उगवला. अविनाशरावांनी आधी आंघोळ वगैरे आटोपले आणि मग मी नंबर लावला! त्या थंड वातावरणात गारगार पाण्याने स्नान करण्याची मौज काही औरच होती! सलग दोन दिवस ती मौज अविनाशराव आणि मी लुटली!

आज प्रतापगडावर जायचे होते. सकाळी सकाळी गरमागरम बटाटेवड्यांचा नाश्ता अगदी भरपेट केला आणि आमची बस प्रतापगडाकडे दौडू लागली. वाटेत खूप सारे जण एका ठिकाणी उतरले, ते पायी चढून येणार होते. मी मात्र बसनेच जाण्याचा निर्णय घेतला, नुकतीच गुडघ्याला दुखापत झालेली आणि त्यामुळे मला रिस्क घ्यायची नव्हती म्हणून मग हा अप्रिय निर्णय घ्यावा लागला! बस वर पोहोचली आणि मग खानोलकर, मेहेंदळे कुटुंबियांसमवेत गप्पा झाल्या. सगळेच जण खूप उमद्या स्वभावाचे आहेत. थोड्याच वेळात पायदळ गडापर्यंत पोहोचले आणि त्यांच्यासमवेत आम्ही गडावर दाखल झालो. गणेशभाऊंचे पाठांतर, विषय खुलवून सांगण्याची हातोटी, आणि सगळ्यांना त्यात सहभागी करून घ्यायची कला खरोखर वाखाणण्याजोगी आहे! प्रतापगडाची त्यांनी करून दिलेली ओळख खूप छान वाटली. प्रतापगडाच्या चोरवाटा, बांधकाम कौशल्ये इत्यादी गोष्टी माहीत होत्याच पण त्याच पुन्हा गणेशभाऊंकडून ऐकताना एक प्रकारचे समाधान मिळत होते! ऐन धुक्यात प्रतापगडाचे सौंदर्य आम्ही न्याहाळत होतो. बालेकिल्ला, शिवरायांचा पुतळा, घोरपडीचे शिल्प, शिवरायांची सदर, केदारनाथ असा सगळा परिसर पाहिला, ऐकला आणि अनुभवलासुद्धा! खंडोजी खोपडे याला दिलेल्या शिक्षेची अमंलबजावणी होत असताना जाणवला तो शिवशाहीचा शिरस्ता, "गद्दारीला माफी नाहीच!" आणि वैषम्य वाटले आजच्या फोफावल्या भ्रष्टाचाराचे!

भवानी मातेच्या मंदिरामधे आलो. देवीचे दर्शन घेतले. स्फटिकाचे शिवलिंग, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार यांचेही दर्शन घेतले. आरती झाली आणि आम्ही गड उतरू लागलो. खाली येताना वाटेत थोडा वेळ खरेदी करण्यात गेला आणि आम्ही दुपारच्या भोजनाला पुन्हा आमच्या मुक्कामी परतलो.

रात्री पार या गावीच्या रामवरदायिनी देवीच्या मंदिरात दर्शनाला जायचे होते. बाबासाहेबांचे व्याख्यान, देवीचा गोंधळ असे कार्यक्रम तेथे होणार होते. देवीच्या देवळातच संध्याकाळचा नाश्ता झाला. देवीचे दर्शन, तिचा तो लाकडी सभामंडप खरोखर अवर्णनीय आहे. एक छोटीशी प्रश्न-मंजूषा तेथे आयोजित करण्यात आली होती. बाबासहेबांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारतानाचा आनंद हा पुणे विद्यापीठात एम्.सी.एम. या पदव्युत्तर पदवी परिक्षेत ऑरेकल या विषयात मिळविलेल्या प्रथम क्रमांकापेक्षा जास्त होता! माझे नाव घेताच पडलेली पहिली टाळी निकिताची होती!

रामवरदायिनी मंदिराचा इतिहास, त्या मंदिराचे बाबासाहेबांनी पाहिलेले आणि आज बुजवलेले तळघर, त्या तळघरात छत्रपति राजाराम महाराजसाहेबांनी औरंगजेबाच्या आक्रमण काळात लपविलेली प्रतापगडावरील भवानी मातेची मुर्ती! ती मुर्ती प्रतापगडावरून हलविताना राजाराम महाराजसाहेबांनी बोललेला नवस, हे सारे बाबासाहेबांकडून ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले होते! सारे प्रसंग एखाद्या चित्रपटासारखे नजरेसमोर दिसू लागले! परत वाटले कि हे सारे प्रसंग या मंदिरात कुठे लिहून ठेवले तर इतिहास जपला नाही का जाणार? एक मानस आहे कि हे सगळे मीच लिहीन आणि बाबासाहेब यांच्या नजरेखालून घालून ते या देवळात बसवता येतील का हे पाहीन? कोणी तरी करावे म्हणून विचार कर राहण्यापेक्षा आपणच ते केले तर जास्त चांगले नाही का?

आनंदयात्रींचे इथे एक छोटेखानी विविध गुणदर्शन झाले. श्री. अनंतराव कंटक आणि श्री. शंतनूराव पाटील यांनी बहारदार पोवाडे गायले, सौ. मंजिरीताई कंटक यांनी सुरेल गायन सादर केले. मग देवीचा गोंधळ झाला. मी बाबासाहेबांना म्हणालो, "बाबासाहेब आमच्या लग्नानंतर हा पहिलाच गोंधळ", मनापासून हसले बाबासाहेब! मी आणि निकिताने फुगडी घातली या कार्यक्रमात. रिंगण करून आम्ही सगळ्यांनी फेर धरला, मनमुराद नाचत होतो, आणि स्वप्न म्हणू कि भाग्य? भाग्यच असावे, खुद्द बाबासाहेब आमच्यासमवेत फेर धरून नाचत होते! वयाच्या नव्वदीतला त्यांचा तो जोष आमच्यात एक टक्का जरी आला तरी शिव-चरित्र अवघ्या जगात पोचेल, नाही का?

गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि आम्ही मुक्कामी परतलो. बाबासाहेब आमच्याच समवेत आमच्या मुक्कामावर आले होते! भोजनाचा आस्वाद घेतला आणि हळूच निद्रादेवीच्या कुशीत शिरलो.

तिस-या दिवशी आमचा मुक्काम हलला आणि परतीचा प्रवास सुरु झाला. नरवीर तानाजी मालूसरे यांच्या उमरठ या गावी जाऊन त्यांच्या आणि शेलारमामा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. गणेशभाऊंची प्रतिभा इथे सुरेख फुलून आली. भाऊंनी शिवराय आणि त्यांचे सहकारी यांचे वर्णन करताना एक अतिशय समर्पक वाक्य उच्चारले, "हौसेने संसार होतात. त्यागाने राष्ट्र उभे राहते, पण त्यागाचीच हौस निर्माण झाल्यावर इतिहास घडतात!"

तानाजी मालूसरे यांच्या समाधी दर्शना नंतर आम्ही जवळच असलेल्या एका धबधब्याला भेट दिली तिथला झुलता पूल पाहिला. बाबासाहेबही आमच्यासमवेत होते. मग आम्ही पोलादपूरला आलो. कविंद्र परमानंद यांची समाधी पाहिली, तिथे उभारलेली दुर्ग सृष्टी पाहिली. तिथे गणेशभाऊंनी आम्हाला निरनिराळ्या किल्ल्यांचा संक्षिप्त इतिहास सांगितला.

दुपारचे भोजन झाले. बाबासाहेबांनी निरोपाचे शब्द सांगितले. भावी काळात घोडेस्वारी, तंबूतील मुक्काम, रॉक-क्लायंबिंग अशी आनंदयात्रा काढायचा मनोदय व्यक्त केला. आनंदयात्रींनीदेखिल आपली मनोगते व्यक्त केली. खुद्द बाबासाहेबांच्या शेजारी स्टेजवर उभे राहून बोलणे म्हणजे काय आणि कसे वाटते याचा अनुभव मीही घेतला. सारे अंग रोमांचित झाले होते, असाच काहीसा अनुभव मी माझ्या "बाल शिक्षण मंदिर" या भांडारकर रस्त्यावरील शाळेतील माझ्याच बालपणीच्या शिक्षकांना संगणक शिकवताना घेतला होता!

बाबासाहेबांनी तिथे गणेशभाऊंचे हात बनून त्यांच्या भाषणावर हातवारे करुन कार्यक्रमात रंग भरला. अफाट गर्दिमुळे शिवथरघळीचा कार्यक्रम रद्द करावा लागला. थोडावेळ वरंध घाटात थांबलो, रात्रीचे जेवण वरंध येथील शाळेत घेतले आणि पुण्यात परतलो.

खरतर फक्त शरीरानेच पुण्यात आलो होतो, अजूनही मी त्याच परिसरात रमलो आहे. बाबासाहेबांचे शब्द ऐकतो आहे, संस्कारीत होतो आहे. गणेशभाऊंबरोबर चर्चा करत आहे, त्यांच्याकडून नविन नविन गोष्टी समजून घेत आहे, शिकत आहे!

आनंदयात्रा १५ ऑगस्टला संपन्न झाली असली तरी माझ्यातला मला सापडलेला आनंदयात्री अजूनही सह्याद्रितच बागडतोय, बाबासाहेबांचे बोट धरून!

हिमांशु यशवंत डबीर

ता. क. आज १८ सप्टेंबर २०११ रोजी साक्षात बाबासाहेब यांचे समोर "पुरंदरे वाडा" येथे या प्रवासवर्णनाचे वाचन केले. बाबासाहेब म्हणाले, "आनंदयात्रा परत घडली, छान लिहीले आहे!" गणेशभाऊही यावेळी उपस्थित होते, त्यांनाही लिखाण आवडले, त्यांनी या लिखाणाची प्रत त्यांचे जवळ ठेवून घेतली. खूप खूप आनंद झाला! भाऊंकडून त्यांचे " शिवरायांचा पाळणा - किल्ले शिवनेरी" हे पुस्तक त्यांच्या स्वाक्षरीसह प्राप्त झाले. धन्य झालो!

6 comments:

 1. खरच हिमांशु!!!!
  आनंदयात्रा हे नाव किति समर्पक आहे. आणि बाबासाहेबांचा सहवास लाभणे म्हणजे मणिकांचन योगच जणु.
  मला शल्य वाटत होते कि मी अमेरिकेत असल्यामुळे मला हि यात्रा अनुभवायला नाही मिळाली. पण तु या लेखाद्वारे मला फुल नाही पण त्याचा सुगंध अनुभवायची संधी दिलीस.
  मनापासुन आभार!!!

  - अभिजीत

  ReplyDelete
 2. अभिजीत मित्रा, अजूनही बाबासाहेबांचे शब्द न् शब्द माझ्या कानां-मनांत घूमत आहेत! बाबासाहेबांचा सहवास, डबीरांचा इतिहास, गणेश भाऊंबरोबर झालेल्या गप्पा, काय काय आणि किती किती लिहू! या सगळ्या प्रवासवर्णनांतून तो अनुभव पूर्ण होऊच शकत नाहिये! किती जगलोय मी ते सारे क्षण...नशिब नशिब म्हणतात ते हेच असावे! तू ये इकडे तुला एक अतिशय भारी गोष्ट दाखवायची आहे, आत्ता नाही सांगणार काय आहे ते! तू ये आणि पहा, तू आनंदाने वेडाच होशील, माझी खात्री आहे!

  ReplyDelete
 3. Hi Himanshu,
  Thanks a lot for sharing this with us.
  Mala Aanand yatra ghadvlya baddal dhanyavad.

  Pankaj

  ReplyDelete
 4. पुढल्या आनंदयात्रेला यायची तयारी करावीच अशी मनीषा आहे.
  तुझे झाले की "शिवरायांचा पाळणा - किल्ले शिवनेरी" मला हवे आहे. माझा नंबर पक्का :)

  कीर्तिवंत घराण्याचा भाग्यवंत आत्मा आहेस तू. तुला बाबासाहेबांचा साथ लाभतो, म्हणून तू भाग्यवान. आम्हाला तुझी साथ लाभते, आम्ही पण भाग्यवान. तुझ्या निमित्ताने आमची नेमाने राजांशी, इतिहासाशी, किल्ल्यांशी आणि बाबासाहेबांशी गाठ पड़तेच. 'धन्यवाद' म्हणणार नाही, पण कृतज्ञ रहावे असे तुझे देने आहे.

  ReplyDelete
 5. Hi, Himanshu,

  Very nice article.I liked it ,i too felt being part of the Anand Yatra.I realized i have missed this trip. Keep Writing.
  Best of Luck!
  Regards
  Rohini Vasant Mulay

  ReplyDelete
 6. नमस्कार! तुमचा अनुभव हा अभिप्राया पलीकडचा आहे. मला सर्वात जास्त भावाला तो ते व्यक्त करण्याचा प्रामाणिकपणा आणि निरागसता. असेच अद्वितीय अनुभव आपल्याला यावे आणि तुमच्या लिखाणातून व्यक्त व्हावे.

  ReplyDelete