Wednesday, September 10, 2014

वर्तमानात भूतकाळ जागविणारा तो क्षण


वर्तमानात भूतकाळ जागविणारा तो क्षण


त्या दिवशी खरतर त्यांना भेटायला जाताना मनात खूप भाव दाटून आले होते, जावे का नाही हेही कळत नव्हते! पण त्यांचे वय आणि आपले नाते-संबंध पाहता जाणे प्रशस्त दिसले नसते आणि शिवाय या दोघी छोट्या, त्यांनाहि "पणजी" पाहायला मिळेल आणि पणजी लाही यांना पाहता येईल म्हणून मनाचा हिय्या करून अखेर जायचे ठरले! खरंतर या छोट्या दोघींना काही कळत नाही, त्यामुळे पणजी म्हणजे काय हेही त्या बिचाऱ्यांना काय समजणार! पण निदान पणजी तरी यांना पाहिलं यासाठी म्हणून आम्ही म्हणजे मी, आई, मेधा आणि दोघी छोट्या निघालो!

उर भरून येतो तेव्हा विचार एकाच असतो कि "त्यावेळी" जे आपण पहिले निदान ते "तसेच्या तसे" सामोरे येवो! पण आपल्याला जे हवे असते ते नियतीला मंजूर असेलच असे नाही!

दुपारी चार वाजता आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये पोचलो. वाटले होते कि काही जुने दिसणार नाही, अर्थात ते आठवल्याशिवाय राहणार नव्हते हे जरी खरे असले तरीही! गेट मधून आत पाउल टाकले आणि समोरच "ती" उभी असेलेली दिसली! त्याच ठिकाणी, आणि अगदी तशीच जशी ती "त्यावेळी" होती! पाउल अडखळले! पाणी उभे राहिले डोळ्यात, पण दिसू द्यायचे नाही म्हणून "तिच्याकडे" तिरक्या नजरेने पाहत पुढे गेलो. आई तर "तिला" पाहून पार खचली होती! आईचा अस्फुट हुंदका मी ऐकला, पण काय करू.. तीच अवस्था माझीही होती! स्वतःला तसेच पुढे फरफटत नेले, पण "त्या" आठवणी आमच्या आधीच तिथे उभ्या ठाकल्या होत्या!

मेधाचे सासरे भेटले, पण मान वळवून मी आणि आई "तिच्या"कडेच पाहत होतो! तेवढ्यात तिथे एकाला घेऊन तिथले कर्मचारी "तिच्या" पाशी आले! काय दैव असते, आलेल्या आठवांचा एक तडाखा आम्ही कसाबसा परतवत होतो, तोच दुसरी लाट आमच्यावर आदळली! काय करू, कसे सावरू, मग जान्हवी आणि अनुष्का यांच्यात लक्ष गुंतवले!

तोवर तिथल्या कर्मचार्यांनी त्यांची कार्ये करून "तिला" पाठवून दिले होते!

आई "ती" रूम शोधत होती, आणि पाय जणू दगड झाल्याप्रमाणे थिजली होती… तिथेच! मेधाच्या सासऱ्यांच्या मागे मागे आम्ही पहिल्या मजल्यावर गेलो, आजींचे ओपरेशन झाले होते, पण त्या रिकव्हरी रूम मध्ये होत्या.. वेळ जाता जात नव्हता आणि बाबा, आम्ही  मात्र प्रत्येक क्षणाला भूतकाळात ओढले जात होतो!

अवघड असते हो हे सगळे! कोण म्हणते कि वर्तमानात भूतकाळ जगता येत नाही!

त्या दिवशी आई आणि मी "त्याच" संजीवनी हॉस्पिटल मध्ये "तिला" अर्थात त्याच अम्बुलन्सला पाहून भूतकाळ वर्तमानात जगत होतो! आणि बाबा अजून कडी म्हणजे आजींचे ओपेरेशन करणारा डॉक्टर सुद्धा तोच होतोहो!

वर्तमानात भूतकाळ जागविणारा तो क्षण, त्यानंतरही आम्हाला वर्तमानात येऊ देण्यासाठी शर्थ करत होता, पण समोरच्या दिसत असलेल्या जबाबदाऱ्या आणि नाविन्याची चाहूल यांनी त्या भूतकाळाला थोडेसे थोपवून ठेवेले आहे.. तूर्तास तरी!


हिमांशु डबीर
18-Aug-2014

No comments:

Post a Comment