Thursday, May 28, 2009

स्वप्नांची मौने

स्वप्नांची मौने
ती:

तू म्हणतोस मला पाहताना शब्द वाक्यांना मिठी मारून बसतात अन् वाक्ये नजरेतून बोलू लागतात!
शब्दांचे महत्वच तू असे खोडून काढतोस,
सांग ना एकदा तरी मला, तू तरी शब्दांशीच का असा खेळतोस?

तो:

शब्द म्हणजे काय ग, एकत्र जोडली निरर्थक अक्षरे,
त्यांना आपण जोडली ती हवीती अर्थांतरे,
आपण म्हणू तीच त्यांची भाषांतरे,
मनाच्या खोलात रुजलेली, ती तर स्वप्नांची मौने,
नजरेतून जो संवाद चाले, सांग तो का शब्दांसाठी लाचारे???!!!

ती:

तू म्हणतोस, शब्द म्हणजे एकत्र जोडली निरर्थक अक्षरे,
शब्दांच्या अस्तित्वालाच तू एक शून्य करून ठेवतोस,
सांग ना एकदा मला, तरी तू मौनपणे असे शब्द का रंगवतोस??

तो:

शब्द म्हणजे काय ग, भावनांना जोडली रेशीम उपरणे,
सुंदरशा स्त्रीने ल्यालेली नक्षीदार आभूषणे,
नभी सजलेले ते नक्षत्रांचे देणे,
मनाच्या गाभा-यातील नंदादीप तेवणे,
जिथे जुळली मने, तिथे सांग कोण गातो या शब्दांचे तराणे??!!


ती:

अच्छा, म्हणजे शब्द तुझे, प्रेमाचे बहाणे!
शब्द म्हणजे, तुझे मला रिझवणे!
शब्द म्हणजे, तुझे मला सजविणे!
शब्द म्हणजे, तू मला कवितेत पहाणे!
शब्द म्हणजे, तू मला भुलवणे!
शब्द म्हणजे, तू सगळे नि:शब्दपणे सांगणे!
शब्द म्हणजे, मी तुला भान हरपून ऐकणे!!!


हिमांशु डबीर

7 comments:

  1. धन्यवाद आशाजी! इतका छान अभिप्राय कोणीच दिला नव्हता!

    ReplyDelete
  2. Himanshu, sundar kavita aahe. Pragalbha shabda!

    ReplyDelete
  3. पंत,
    माझी ही तू लिहिलेली सर्वात आवडती कविता आहे.

    खूपच सही आहे.

    -अभी

    ReplyDelete
  4. आवडली.शब्दांचे हे असे त्याला व तीला खेळवणे... :)

    ReplyDelete